एकाग्रता वाढवताना...

Last Updated: Nov 04 2019 9:48PM
Responsive image


प्रांजली देशमुख

प्रवेश परीक्षा असो किंवा अन्य कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा, यातील यश हे एकाग्रतेवर अवलंबून असते. अर्थात, अभ्यासादरम्यान एकाग्रता ठेवणे खूपच कठीण आहे; मात्र अशक्य नाही. एखादा विषय न आवडणे ही स्वाभाविक गोष्ट आहे; मात्र करिअरसाठी तो विषय महत्त्वाचा असेल तर त्यात रस निर्माण करणे गरजेचे आहे. आपण एकाग्रतेने त्या विषयाकडे लक्ष दिल्यास ती बाब निश्‍चितच उपयुक्‍त ठरू शकते. अभ्यासादरम्यान आपल्या डोक्यात असंख्य विचार येतात. तसेच विचलित करणार्‍या बाबीही आपल्या सभोवताली असतात; मात्र ते बाजूला ठेवून अभ्यासावर फोकस करणे गरजेचे आहे. अभ्यासादरम्यान एकाग्रता राखणे ही सोपी बाब नाही. स्वत:ला टाइमपास म्हणून कोणत्याही गोष्टीत अडकून राहणे हेदेखील धोकादायक ठरू शकते. म्हणून एकाग्रता राखण्यासाठी काही गोष्टींचे पथ्य पाळणे आवश्यक आहे. 

सकारात्मक वातावरण हवे : अभ्यासादरम्यान अनुकूल वातावरण असणे गरजेचे आहे. या काळात आपले लक्ष विचलित करणार्‍या बाबींपासून दूर राहिले पाहिजे. अभ्यासासाठी शांत, गोंगाटापासून दूर असणारी जागा निवडावी. यासाठी ग्रंथालय, अभ्यासिका उपयुक्‍त ठरू शकते. जर आपल्याला स्वच्छ हवेत अभ्यास करण्याची इच्छा असेल तर गडबड, गोंधळ नसणार्‍या जागेची निवड करावी. स्टडी रूम किंवा स्टडी टेबलवरच अभ्यास करण्याची सवय बाळगा. लक्षात ठेवा, अभ्यासाच्या खोलीत भरपूर उजेड असावा. अपुरा प्रकाश असलेल्या कोंदट जागेत अभ्यास करणे टाळावे. 

प्राधान्यक्रम लक्षात घ्या : अभ्यासासाठी जागा निवडताना अनेकांचा प्राधान्यक्रम वेगळा असू शकतो. काहींना शांत वातावरण हवे असते, तर काही जण मित्रांसमवेत अभ्यास करण्यास रूची बाळगतात. आपल्या सोयीनुसार आणि आवडीनुसार अभ्यासाची पद्धत निवडावी. जर आपल्याला अभ्यासासाठी जागेची निवड करताना अडचण येत असेल तर कधी गटाने, कधी ग्रंथालयात तर कधी एकट्याने अभ्यास करून पाहावा. याशिवाय शांत संगीताच्या मदतीनेदेखील अभ्यासाला मदत मिळते. यावरून आपल्याला वेगवेगळ्या वातावरणात अभ्यासाची एकाग्रता पारखण्याची संधी मिळते. 

एकाग्रता वाढविणार्‍या खेळाची निवड : जर आपण एखाद्या खेळाची निवड करत असाल तर एकाग्रता बळकट करणार्‍या खेळाला प्राधान्य द्या. विचाराला चालना देणारे, बुद्धीची कस लावणार्‍या खेळाचा विचार करावा. यासाठी पालकाचाही सल्ला घ्यावा. इलेक्ट्रॉनिक किंवा ऑनलाईन गेमपासून दूर राहावे. हे खेळ एकाग्रतेचे मारक मानले जाते. बुद्धिबळ किंवा शब्दकोडे सोडवणे यासारख्या खेळांची आणि सवयींची निवड करावी. बुद्धिबळातून एकाग्रता वाढते, तर शब्दकोड्यातून विचारशक्‍ती, शब्दसंग्रह वाढण्यास मदत मिळते. इंग्रजी, मराठी किंवा हिंदी भाषेतील कोडी सोडण्याबाबत सकारात्मक राहावे. 

आहाराबाबत दक्षता : अनेकदा अभ्यासादरम्यान आपण खाण्याकडे लक्ष देत नाही. आपल्या आहारात पोषक द्रव्याचा समावेश आहे की नाही, ते पाहणेदेखील महत्त्वाचे ठरते. आरोग्य आणि आहाराचा एकाग्रतेशी थेट संबंध आहे. आरोग्यवर्धक गोष्टींचा आणि पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा. अधिक तेलकट आणि मसालेदार जेवणापासून दूर राहावे. 

शिस्त बाळगणे : शिस्तीशिवाय कोणतीच गोष्ट शक्य नाही. अर्थात, केवळ शिस्त असूनही चालत नाही. शिस्तीबरोबरच त्यात नियमितता असणेही तितकेच आवश्यक आहे. जर या दोन्ही सवयी अंगवळणी पडल्या, तर आपण योग्य दिशेने जात आहात, असे समजा. या दोन्ही गोष्टींमुळे शारीरिक आणि मानसिक विकास होतो आणि तो एकाग्रतेला पूरक आहे. 

आराम आणि पुरेशी झोप : स्वत:ला योग्य दिशेने नेण्यासाठी नेहमीच तणावाखाली राहावे, असे नाही. यशासाठी कठोर परिश्रम आवश्यक आहे; मात्र जर स्वत:ला पुरेसा आराम देऊ शकलो नाही तर आपल्या एकाग्रतेवर नकारात्मक परिणाम होईल. त्यामुळे किमान सहा तास झोप घेणे गरजेचे आहे. तणावमुक्‍त राहून लक्ष्य गाठण्यासाठी वेळेवर झोप आणि आराम आवश्यक आहे. सतत जागरण आणि झोप कमी झाल्यास अभ्यासाकडे लक्ष लागत नाही. 

मोकळेपणाने बोला : पालकांना, शिक्षकांना मोकळेपणाने बोलणे गरजेचे आहे. जर मनातील विचार, अडचणी मोठ्यांसमोर मांडल्या नाही तर अनेक गैरसमज वाढू शकतात. काही प्रश्‍न अनुत्तरित राहतात. परिणामी, आपले अभ्यासात लक्ष लागत नाही. मनात प्रश्‍न ठेवून अभ्यास करणे चुकीचे आहे. शंकांचे निरसन करण्याची सवय वाढायला हवी. अभ्यास असो किंवा अन्य बाब असो, आपण मोकळेपणाने बोलावे. यातून नवीन मार्ग आणि मार्गदर्शनही मिळेल.