Wed, Aug 12, 2020 02:33होमपेज › Edudisha › करिअरसाठी स्टार्टअप!

करिअरसाठी स्टार्टअप!

Last Updated: Jan 18 2020 1:33AM
सत्यजित दुर्वेकर

आजचे तरुण हे नोकरी करण्यापेक्षा स्वत:चे स्टार्टअप सुरू करण्याबाबत अधिक विचार करत आहेत. अर्थात, जेव्हा पैशाचा विचार येतो; तेव्हा तरुण उद्योजक अडचणीत येतात. सरकारच्या मदतीने स्टार्टअप उभारणीला मदत मिळू शकते. मात्र काही बाबतीत सरकारी मदतीशिवाय देखील स्वत:चा उद्योग सुरू करणे शक्य आहे. कमी गुंतवणुकीतून स्टार्टअप सुरू करून लाखो रुपये कसे कमवावेत, याबाबत काही टिप्स इथे सांगता येतील. 

योग आणि मेडिटेशन सेंटर : ताणतणाव, कामाचे ओझे आणि व्यग्र जीवनशैलीमुळे आरोग्यदायी जीवन संकटात सापडले आहे. अशावेळी लोकांना दिलासा देण्यासाठी योग आणि मेडिटेशन सेंटर फायदेशीर ठरत आहेत. जर आपल्याला योग आणि मेडिटेशनबाबत जुजबी ज्ञान असेल तर आपणही योग आणि मेडिटेशन सेंटर सुरू करू शकता. हा खूपच फायद्याचा व्यवसाय आहे. यासाठी अधिक गुंतवणूक करण्याची गरज भासत नाही. या व्यवसायासाठी केवल चांगले लोकेशन असणे ही एकमेव अट आहे. 

जीम आणि फिटनेस सेंटर : कोणत्याही व्यक्‍तीला आरोग्यदायी आणि सुदृढ राहण्यासाठी वर्कआऊट करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे यंगस्टर्समध्ये जिमबाबत क्रेझ वाढत चालली आहे. या आधारावर जिमला दिवसेंदिवस मागणी वाढत चालली आहे. यंगस्टर्सची आवड लक्षात घेता आपण कोठेही कमी गुंतवणुकीतून जीमचा व्यवसाय सुरू करु शकतो. जीम सुरू करणे हा फायद्याचा व्यवसाय ठरू शकतो. एवढेच नाही तर पोहण्याची आवड असेल तर महानगरपालिकेच्या सार्वजनिक तलावात ‘स्वीमिंग इंस्ट्रक्टर’ म्हणूनही व्यवसाय सुरू करु शकतो. लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत पोहण्याचे प्रशिक्षण आपण देऊ शकतो.

ऑनलाईन टिचिंग : प्रोफाइलमध्ये फोटो, शैक्षणिक पात्रता, स्पेशलायजेशन, अनुभव, कामगिरी आदी गोष्टींचा समावेश करावा. याप्रमाणे पालक आणि मुले हे विषय किंवा श्रेणीच्या आधारावर निवड करून आपल्याशी संपर्क करतील. याप्रमाणे  शंकाचे निरसन केल्यानंतर विद्यार्थी जोडले जातील.

फूडशी संबंधित व्यवसाय: फूड रिलेटेट व्यवसायात ब्रेकफास्ट, लंच, डिनर, फूड कॉर्नर, फूड कोर्ट, फूड डिलिव्हरी, बेकरी शॉप, आईस्क्रीम पार्लर, मिनरल वॉटर सप्लाय, रेडी टू इट याचा समावेश होतो. यासाठी आपल्याला पैसा आणि ठिकाण या दोन्ही गोष्टी लागतात. मात्र कठोर मेहनत आणि दर्जेदार सेवा या आधारावर आपण चांगला फायदा मिळवू शकता. 

नृत्यकला शिक्षण वर्ग: जर आपल्या अंगी नृत्यकला असेल आणि त्याचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले असेल तर अपाणही डान्स अ‍ॅकॅडमी सुरू करू शकता. हा कमी बजेटमध्ये चांगला फायदा मिळवून देणारा व्यवसाय ठरतो. बहुतांश पालक हे आपल्या मुलांसाठी डान्सचा चांगला क्लास शोधत राहतात. आपण ती गरज पूर्ण करू शकतो. डान्स क्लाससाठी आपल्याला जागेची गरज भासते. त्याचबरोबर संगीतकला शिकवण्याचेही क्लास सुरू करू शकता. तबला, पेटी, गिटार आदी संगीत शिकवण्याचे वर्ग सुरू करू शकता. 

इव्हेंट मॅनेजमेंट कन्सल्टंसी : जर आपल्या अंगी कल्पकता असेल, तर इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्र चांगला पर्याय ठरू शकतो. या व्यवसायाची सुरुवात आपण कुटुंब, नातेवाईक, मित्र आदींपासून करू शकता. प्रारंभीच्या काळात अधिक पैसा गुंतवण्याची गरज नाही. एका लहान कार्यालयातूनही आपण काम सुरू करू शकता. यासाठी आपले नेटवर्क चांगले असणे गरजेचे आहे. नेटवर्क मजबूत असण्याबरोबरच कम्युनिकेशन स्किल असणेदेखील तितकेच महत्त्वाचे ठरते. 

सरकारी कर्जाची मदत : व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याकडे पैसा नसेल तर पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेनुसार आपण कर्ज घेऊ शकता. या योजनेनुसार दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. या योजनेनुसार तीन प्रकारचे कर्ज मिळते. कमी कालावधीसाठी 50 हजार, मध्यम कालावधीसाठी 50 हजार ते पाच लाख आणि दीर्घ कालावधीसाठी पाच ते दहा लाखांपर्यंतचे कर्ज देण्याची तरतूद आहे.