Tue, Jun 15, 2021 12:37
कौशल्यपूर्ण करिअर वाटा

Last Updated: May 31 2021 9:06PM

विजयालक्ष्मी साळवी

सर्वसाधारणपणे विज्ञान शाखेत बारावी करणारे विद्यार्थी हे मेडिकल आणि इंजिनिअरिंगची निवड करतात. अशी काही मुले असतात की, त्यांना हे / दोन्ही क्षेत्र नको असतात. मात्र त्यांना अन्य पर्याय दिसत नसल्याने ते गोंधळलेले असतात. प्रत्यक्षात विज्ञान ही मोठी आणि व्यापक शाखा आहे. याठिकाणी विज्ञान शाखेतील अन्य पर्यायांची माहिती देता येईल, जेणेकरून करिअरला पूरक ठरू शकेल. 

नॅनो टेक्नॉलॉजी  

सध्या नॅनो टेक्नोलॉजी इंडस्ट्रीला चांगले दिवस आहेत. आगामी काळात या क्षेत्रात लाखो प्रोफेशनल्सची गरज भासणार आहे. बारावीनंतर नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये बीएस्सी किंवा बीटेक आणि त्यानंतर याच विषयात एमएस्सी किंवा एमटेक करून चांगले करिअर करू शकतो. 

स्पेस सायन्स  

हे एक व्यापक क्षेत्र आहे. याअंतर्गत कॉस्मोलॉजी, स्टेलर सायन्स, प्लॅनेटेरी सायन्स, अ‍ॅस्ट्रोनॉमीसारख्या अनेक शाखा येतात. यात तीन वर्षांचे बीएस्सी आणि चार वर्षांचे बीटेकपासून पीएचडीपर्यंत अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. हे अभ्यासक्रम इस्रो संस्थेत शिकवले जातात.

अ‍ॅस्ट्रो फिजिक्स  

जर आपल्याला अंतराळाची, अवकाशाची आवड असेल तर बारावीनंतर अ‍ॅस्ट्रो फिजिक्समध्ये करिअर करू शकता. यासाठी आपल्याला पाच वर्षांचा रिसर्च ओरिएंटेड प्रोग्रॅम आणि चार किंवा तीन वर्षांच्या बॅचलर प्रोग्रॅमला प्रवेश घ्यावा लागेल. हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंंतर अंतराळ संशोधन केंद्रात शास्त्रज्ञ होऊ शकता. 

पर्यावरण विज्ञान 

या शाखेत पर्यावरण आणि मानवी व्यवहारावर होणार्‍या परिणामाचा अभ्यास केला जातो. यानुसार इकोलॉजी, डिझास्टर मॅनेजमेंट, वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट, पोल्युशन कंट्रोलसारख्या विषयाचे अध्ययन केले जाते. 

वॉटर सायन्स  

पाण्याशी निगडित शास्त्र विषय आहे. यात हायड्रोमिटियोरोलॉजी, हायड्रोजिओलॉजी, डे्रनेज बेसिन मॅनेजमेंट, वॉटर क्वालिटी मॅनेजमेंट, हायड्रोइन्फॉर्मेटिक्स यांसारख्या विषयाचा अभ्यास करावा लागतो. आपत्ती व्यवस्थापनामध्ये अशा पदवीधरांना चांगली मागणी आहे. 

मायक्रोबायोलॉजी  

या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी आपल्याला बीएससी इन लाइफ सायन्स किंवा बीएससी इन मायक्रोबायोलॉजी करावे लागेल. यानंतर आपण मास्टर पदवी आणि पीएचडी देखील मिळवू शकता. याशिवाय पॅरामेडिकल, मरिन बायोलॉजी, बिहेव्हियरल सायन्स, फिशरीज सायन्स यांसारखे अनेक क्षेत्र करियरसाठी उपलब्ध आहेत. 

डेअरी सायन्स  

दुग्धजन्य पदार्थ उत्पादनाच्या क्षेत्रात भारताची जगात आघाडी आहे. भारताचा नंबर अमेरिकेनंतर लागतो. डेअरी टेक्नॉलॉजी किंवा डेअरी सायन्सअंतर्गत मिल्क प्रॉडक्शन, प्रोसेसिंग, पॅकेजिंग, स्टोअरेज आणि डिस्ट्रिब्युशनची माहिती दिली जाते. त्यामुळे या क्षेत्रात प्रशिक्षित उमेदवारांची मागणी वाढत चालली आहे. बारावीनंतर प्रवेश परीक्षा दिल्यावर चार वर्षांचा डेअरी टेक्नॉलॉजीच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकता. काही संस्था डेअरी टेक्नॉलॉजीत दोन वर्षांचा डिप्लोमा कोर्सही उपलब्ध करून देतात.

रोबोटिक सायन्स  

हे क्षेत्र विकसित आणि लोकप्रिय होत चालले आहे. त्याचा वापर प्रत्येक क्षेत्रात होत आहे. जसे की हार्ट सर्जरी, कार असेम्बलिंग, लँडमाइन्स आदी.