Tue, Jul 14, 2020 13:06



होमपेज › Edudisha › सेवाव्रती करिअरवाट

सेवाव्रती करिअरवाट

Last Updated: Jun 01 2020 8:30PM




 प्रियांका जाधव

बिगर सरकारी संघटना अर्थात एनजीओ स्थापन करताना एक विशिष्ट सामाजिक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेले असते. समाजातील काही समस्या सोडवण्यासाठी आणि काही क्षेत्रांचा विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणे हा साधारण हेतू असतो आणि यासाठी या बिगर सरकारी संघटना अर्थात एनजीओ प्रयत्नशील असतात. बिगर सरकारी संघटना या विविध क्षेत्रात कार्यरत असतात. जसे शेती, शिक्षण, पर्यावरण, संस्कृती, मानवाधिकार, आरोग्य, महिलांच्या समस्या, बालविकास आदी कोणत्याही क्षेत्राची निवड कामासाठी करू शकतो. 

बिगर सरकारी संघटना अर्थात एनजीओ हे एक असे क्षेत्र आहे, जिथे मानसिक समाधान आणि प्रतिष्ठा दोन्ही गोष्टी मिळू शकतात. एनजीओ या क्षेत्राला आता खूप प्रतिष्ठा आणि वलय लाभते आहे. पूर्वी स्वतःचा पैसा, संसाधने, समाजाकडून मिळणारी मदत, दान यांच्यावर अवलंबून राहून समाजसेवा केली जात असे, संघटना चालवल्या जात असत. सध्याच्या एनजीओ या रोजगार संधी देऊ करतात. इतर क्षेत्रांच्या तुलनेत एनजीओमध्ये वेतनही चांगले मिळू शकते. एखाद्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील एनजीओ मध्ये नोकरी मिळाली तर करिअर उत्तम आकार घेऊ शकते आणि समाजासाठी कार्यरत राहिल्याचे समाधानही मिळतेच. अर्थात या क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी शिक्षणाबरोबर समाजसेवेची, समाजहिताची भावना असणे देखील महत्त्वाचे आहे. ज्या व्यक्‍ती सामाजिक समस्यांविषयी संवेदनशील असतात, सामाजिक प्रश्‍नांच्या विविध पैलूंविषयी आस्था, निष्ठा, कामाप्रति आस्था असणार्‍या व्यक्‍तींना या क्षेत्रामध्ये खूप वाव आहे. अर्थात केवळ पैसा मिळवणे हा उद्देश मात्र इथे पूर्ण होऊ शकत नाही. 

एनजीओमधील करिअर विस्तार 

आपल्या देशात सध्या सक्रिय असलेल्या एनजीओची संख्या 33 लाखांच्या आसपास असल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे. म्हणजेच एनजीओ प्रति लोकांना किती आकर्षण वाटते हे त्यातून स्पष्ट होते आहे. सुमारे 365 भारतीयांपाठी एक एनजीओ आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक एनजीओ आहेत सुमारे 4.8 लाख. त्यानंतर दुसर्‍या क्रमांकावर आहे तो आंध्र प्रदेश. तिथे 4.6 लाख एनजीओ आहेत. उत्तर प्रदेशात 4.3 लाख एनजीओ आहेत. इतरही राज्यात मोठ्या प्रमाणावर एनजीओ काम करत आहेत. जगभरात भारतातच सर्वाधिक एनजीए सक्रिय आहेत. एनजीओंना मिळणार्‍या पैशाचे स्रोत विविध आहेत. दान, सहकारी संस्था आणि विविध फंडिंग एजन्सी यांच्याकडून या बिगर सरकारी संघटनांना अब्जावधी रुपये मिळतात. 

सध्याच्या काळात विविध सामाजिक समस्यांचा चढता आलेख पाहता, भविष्यातही बिगर सरकारी संघटनांचे अस्तित्व आणि त्यांचे काम महत्त्वाचेच ठरणार आहे. त्यामुळे पदवीधर आणि समाजाप्रति काही करण्याची इच्छा असणार्‍या विद्यार्थ्यांनी हा मार्ग जरूर निवडता येईल. एनजीओमध्ये उत्तम वेतन मिळत असले तरीही सामाजिक प्रश्‍नांची जाण आणि समाजासाठी काही ठोस करण्याची तळमळ असणेही महत्त्वाचे असते. त्यामुळे दोन्ही गोष्टींचा मेळ घालून या क्षेत्रात मानसिक समाधान आणि करिअर दोन्ही साधता येईल.