होमपेज › Edudisha › पर्याय ‘शॉर्ट टर्म ’कोर्सेसचा 

पर्याय ‘शॉर्ट टर्म ’कोर्सेसचा 

Last Updated: Dec 03 2019 1:19AM
विधिषा देशपांडे

अल्प मुदतीचे काही अभ्यासक्रम सर्वच विद्यापीठे, खासगी क्लास यांच्याकडे चालवले जातात. अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हे अभ्यासक्रम पूर्ण केले की व्यक्ती लवकर कमाईचे मार्ग अवलंबू शकते. त्यातूनही ज्या मुलांची शैक्षणिक पात्रता कमी आहे त्यांना अल्प मुदतीचे अभ्यासक्रम जरूर हात देतात, नाराज न होता हे अभ्यासक्रम केल्यास त्यांना रोजगार मिळण्यास मदत होते. 

अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमांचे महत्त्व सध्या वाढत आहे. कमी कालावधीत पूर्ण करता येण्याजोगे अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची पसंतीही मिळते आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हे अल्प मुदतीचे अभ्यासक्रम पूर्ण केल्यास विद्यार्थ्यांना लवकर रोजगार संधी प्राप्त होतात. ज्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी फारशी चांगली नाही त्यांना हे अभ्यासक्रम जास्त फायदेशीर ठरतात. 

अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमामुळे एखाद्या व्यक्तीला स्वयंरोजगारही करता येऊ शकतो किंवा जे आधीपासूनच स्वयंरोजगार करत आहेत त्यांना या अभ्यासक्रमांचा अधिक फायदा होऊ शकतो. हल्ली महाविद्यालयातील विद्यार्थी सुट्टीच्या काळातही काही ना काही रोजगाराचे साधने शोधत असतात, अशा वेळी असे अल्प मुदतीचे अभ्यासक्रम त्यांना खूप उपयुक्त ठरू शकतात. पर्यटन, फोटोग्राफी, हॉस्पिटल मॅनेजमेंट इत्यादी क्षेत्रात अल्प मुदतीचे अभ्यासक्रम उपयुक्त  ठरतात.

स्वयंरोजगारासाठीही उपयुक्त : अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमांना पदवीसारखे महत्त्व नसले तरीही त्याची उपयुक्तता अमान्य करता येत नाही. त्यामुळेच अल्प मुदतीचे अभ्यासक्रम निवडताना विद्यार्थ्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की हे अभ्यासक्रम पदवी शिक्षणाची जागा घेऊ शकत नाहीत, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिरिक्त पात्रता मिळवण्यासाठी आणि उत्तम नोकरीच्या संधी मिळवण्यासाठीही हे अभ्यासक्रम उपयुक्त आहेत. या अभ्यासक्रमांच्या मदतीने आपण स्वयंरोजगार सुरू करू शकतो. देशातील अगदी कोणत्याही सुदूर क्षेत्रातील विद्यार्थी असोत किंवा ग्रामीण, निमशहरी भागातील तरुण असोत, सर्वांसाठीच हे अभ्यासक्रम फायदेशीर आहेत. काही अभ्यासक्रम पत्रद्वारा करता येतात तर काही नियमित हजेरी लावून करता येतात. अनेक संस्था ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सुविधाही पुरवतात.