Mon, Jul 06, 2020 03:28होमपेज › Edudisha › बना भूकंप अभियंता 

बना भूकंप अभियंता 

Last Updated: Dec 03 2019 1:19AM
अपर्णा देवकर

किल्लारीसारखा भूकंप जमिनीवरचे सगळे उद्ध्वस्त करून टाकतो. भूकंपामुळे आजवर हजारो जणांचा बळी गेला आहे. त्यामुळेच भूकंपाचा अभ्यास होणे महत्त्वाचे आहे. भूकंपाचा स्रोत, स्वरूप आणि आकारमान या सर्वांवरून त्याची तीव्रता लक्षात येते. या सर्व गोष्टीचे मापन केल्यानंतर मगच त्याच्या नुकसानाचा अंदाज आणि केंद्रबिंदूचा अंदाज लावून भूकंपप्रवण क्षेत्र ओळखण्यासही मदत होते. 

भूकंपाचे हादरे बसले की सर्वच जण हवालदिल होतात. काही भूकंप शास्त्रज्ञाचे काम असते ते भूकंपीय घटनांचे स्रोत, स्वरूप आणि आकारमान यांचा शोध घेणे. त्यांच्या या अभ्यासाचा वापर इतर विविध एजन्सी अभ्यासासाठी करतात. 

भूकंप विज्ञान हा तसा अलीकडील नवा विषय आहे. भूगर्भीय हालचाली होऊन भूकंप होतो हे जरी खरे असले तरीही भूकंप नेमका काय होत, याविषयी मानवाला गेली अनेक वर्षे रुची आहे. मात्र, भूकंप विज्ञानाला इतिहास आहे आणि तो शंभर वर्षे जुना असल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट होते. भूकंपाच्या लहरी मोजणारे उपकरण हे सिस्मोमीटर तयार झाले तेव्हापासूनच या विषयाची सुरुवात झाली, असे मानले जाते. 

20 व्या शतकामध्ये भूकंप विज्ञानाच्या क्षेत्राचा अधिक विस्तार झाला. पृथ्वीच्या अंतरंगाची तपासणीचा भागही यामध्ये समाविष्ट करण्यात आला. भूकंप विज्ञान आणि भूकंप अभियांत्रिकी याअंतर्गत भूकंप आणि पृथ्वीच्या अंतरंगातून येणार्‍या लहरींचा वैज्ञानिक द़ृष्टीने अभ्यास केला जातो. या विषयांतर्गत समुद्रात होणारे भूकंप, ज्वालामुखी तसेच पृथ्वीच्या थरांच्या संरचनेतील बदल आदींचा अभ्यास केला जातो. 

भूकंप कसा होतो : पृथ्वीच्या अंतर्भागात अचानक होणार्‍या तीव्र हालचाली झाल्या की भूकंप येतो. पृथ्वीच्या कवचामध्ये ऊर्जा निर्माण झाल्याने भूकंप होतो. पृथ्वीच्या पोटात दगड तुटल्याने अटातन निर्माण झालेल्या ऊर्जेमुळे हे तरंग निर्माण होतात. भूकंप ही एक विनाशकारी नैसर्गिक आपत्ती आहे. भूकंपामुळे निर्माण होणार्‍या अडचणींचा संबंध मातीची स्थिती, भूवैज्ञानिक संरचना आणि संरचनात्मक हालचाली यांच्याशी निगडित आहे. त्याचा अभ्यास स्थानिक पातळीवर केला जातो. 

भूकंप वैज्ञानिकांचे काम : भूकंप वैज्ञानिकांचे काम फार महत्त्वाचे असते, भूकंपीय घटनांचे स्रोत, स्वरूप आणि आकार यांचा शोध घेणे, निष्कर्ष काढणे. विविध एजन्सी त्याचा वापर करतात. भूकंप विज्ञान आणि भूकंप इंजिनिअरिंग ही दोन्ही क्षेत्रे एकमेकांशी निगडित आहेत. त्यामध्ये भूकंप वैज्ञानिकांसमवेत तंत्रज्ञ, तसेच कॉम्प्युटर, भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार आणि सिव्हिल तसेच संरचना अभियांत्रिकी या विषयात पारंगत असणारे व्यावसायिक लोकही सामील असतात. 

वैज्ञानिक आणि भूकंपाच्या दुष्परिणामांपासून बचाव व्हावा अशी अपेक्षा असणारे लोक यांच्यातील दुवा म्हणजे भूकंप अभियंता. ज्याची जबाबदारी असते की नवीन इमारतींची निर्मिती करताना भूकंपामुळे त्या इमारतीचे काहीही नुकसान होणार नाही याची ठोस व्यवस्था करणे किंवा तशी काळजी घेणे. भूकंप अभियंत्याचे कामाचा संबंध जागतिक पातळीवर असतो. 

एकीकडे जगातील विविध भागांमध्ये भूकंपाचा आकार आणि प्रकार यांचे अनुमान भूकंप वैज्ञानिकांसमवेत लावायचे असते तर दुसरीकडे वास्तुशास्त्रज्ञ, आर्किटेक्ट, निर्मिक आणि विमा कंपन्या यांच्याशी त्याच्या कामाचा संबंध असतो. भूकंप विज्ञान आणि भूकंप अभियांत्रिकी या दोन्हीचे अभ्यासक्र भूगोल आणि भौतिकशास्त्र या दोन्हींचे मिळून तयार होतात. भूकंपाचा अभ्यास करणारे क्षेत्र हे वैज्ञानिक क्षेत्र असल्याने यामध्ये करिअरचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यासाठी बारावीला भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय घेणे अनिवार्य आहे. भूकंप अभियंता म्हणून अभ्यासक्रमास प्रवेश घेताना प्रवेश परीक्षाही उत्तीर्ण करावी लागते. 

नोकरीच्या संधी कुठे : 

भूकंप विज्ञान आणि भूकंप अभियांत्रिकी हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सरकारी संस्था, संघटना तसेच उद्योग क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळतात. जर याविषयीच्या संशोधन क्षेत्रात जाण्यात रुची असेल तर सरकारी आणि खासगी दोन्ही क्षेत्रांमध्ये भरपूर रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. अनेक केंद्रीय संस्थांमध्ये भूकंप वैज्ञानिक, भू-वैज्ञानिक, वैज्ञानिक सहायक आदी पदांवर भरती केली जाते. या संस्थांतर्गत राष्ट्रीय भू-भौतिक संशोधन संस्था, तेल आणि नैसर्गिक गॅस निगम, हवामान खाते, भारतीय भू सर्वेक्षण विभाग आदींमध्येही रोजगाराची संधी उपलब्ध होते.