MPSC :  तयारी चालू घडामोंडींची

Last Updated: Oct 08 2019 1:31AM
Responsive image


प्रा. सुजित गोळे

आजच्या स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी एकच मंत्र महत्त्वाचा असतो, तो म्हणजे तुम्हाला इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहता येणे गरजेचे असते. आजकाल कोणत्याही क्षेत्राचा विचार केल्यास प्रत्येक व्यक्तीला आपल्या सभोवतालची परिस्थिती जाणून घेण्यासाठी चालू घडामोडी यांचा विचार करावा लागतो, तरच ती व्यक्ती 

स्पर्धेत टिकून राहते. स्पर्धा परीक्षा ही तर पूर्णपणे स्पर्धेवर अवलंबून असते. मात्र, स्पर्धा परीक्षा उमेदवाराला व्यापक द़ृष्टिकोन ठेवावा लागतो. प्रत्येक उमेदवाराकडे तयारीचा कालावधी हा खूप मर्यादित असतो. या वेळेच्या मर्यादेत राहून तयारी करणे अनिवार्य ठरते. आजच्या लेखात आपण याच विषयी चर्चा करुयात,

तसे बघता स्पर्धा परीक्षेतील चालू घडामोडी हा विषय तसा व्यापक स्वरुपाचा आहे. अधिकारी हा समाज्याच्या द़ृष्टीने विचार करणारा तसेच सामाजिक बांधिलकी जपून कल्याणकारी निर्णय घेणारा असावा, यासाठी प्रत्येक उमेदवाराने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य स्तरावरील घडामोडी यांचा अभ्यास करणे अपेक्षित असते. मात्र, चालू घडामोडींचा अभ्यास हा कमी वेळेत व परीक्षाभिमूख करावा लागतो. त्यासाठी प्रत्येक उमेदवाराकडे एक वेगळा द़ृष्टिकोन बाळगावा लागतो. 

चालू घडामोडींचा अभ्यास करताना सर्वच घडामोडींना सारखेच महत्त्व देणे उचित ठरत नाही त्यासाठी परीक्षेच्या अभ्यासाला केंद्रबिंदू मानावे, तसेच यापूर्वी विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण केल्यास असे निदर्षणास येते की, प्रश्नांचे दोन प्रकारांत वर्गीकरण होते.

अ) सामान्य अध्ययन विषयासंदर्भातील प्रश्न.

ब) केवळ चालू घडामोडी संदर्भातील प्रश्न.

म्हणजेच वर्तमानपत्राचे वाचन करताना सामान्य अध्ययन विषयांच्या मुद्द्यांशी सांगड करणे महत्त्वाचे ठरते, त्याचप्रमाणे याचा फायदा मुख्य परीक्षेमधील निबंध लेखन व शेवटचा टप्पा म्हणजे मुलाखत यासाठी होतो. नवीन उमेदवारांनी सर्वप्रथम प्रत्येक विषयांमधील मूलभूत संकल्पना समजावून घ्याव्यात त्यानंतरच वर्तमानपत्र किंवा इतर स्त्रोतांमधून चालू घडामोडींचा अभ्यास करावा यामुळे उमेदवाराचा वेळ वाचतो व सर्वात महत्त्वाचे मुद्दे/ संकल्पना योग्यरीत्या समजण्यास मदत होते. व चालू घडामोडींकडे बघण्याचा स्पर्धात्मक द़ृष्टिकोन प्राप्त होतो. चालू घडामोडी या सर्वसाधारणपणे राजकीय, सामाजिक, आर्थिक स्वरुपाच्या असतात, अर्थातच त्यांचा परिणाम मुख्य परीक्षांच्या विषयांवर पडतो यावरून त्यांचे ढोबळ वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येईल.

महत्त्वाचे कायदे, विधेयके, घटनादुरुस्त्या, महत्त्वाच्या परिषदा, संस्था, नवीन शोध, समित्या-आयोग त्यांचे अहवाल, महत्त्वाची कलमे, आर्थिक घटना व आकडेवारी, न्यायालयीन निवाडे नवीन योजना अंमलबजावणी इ. या व्यतिरीक्त फक्त चालू घडामोडी संबंधित-चर्चेतील व्यक्ती, नियुक्त्या, निधन वार्ता, ग्रंथ त्यांचे लेखक, पुरस्कार, क्रीडा इ. आणि अशाच प्रकारचे वर्गीकरण होय.

यासाठी उमेदवारांनी दररोजच्या वर्तमानपत्रांचे वाचन, महिन्यांची मासिके वापरावित तसेच आठवड्याच्या दर रविवारच्या वर्तमानपत्रांमधील पुरविण्या वाचाव्यात यामध्ये आठवडाभर घडलेल्या घटनांचा सविस्तर लेखाजोखा असतो. अशाप्रकारे अभ्यास केल्यास अभ्यासाला योग्य  न्याय मिळून परीक्षेमध्ये योग्य गुण प्राप्त होतात.