Sat, Apr 10, 2021 20:18होमपेज › Edudisha › MPSC २०२० : महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 

MPSC २०२० : महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 

Last Updated: Feb 25 2020 1:29AM
प्रा. सुजित गोळे

‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत’ घेण्यात येणार्‍या विविध स्पर्धा परीक्षांमार्फत महाराष्ट्र राज्य शासनाच्या अखत्यारीतील विविध पदे भरण्यात येतात. प्रस्तूत परीक्षेमार्फत राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या अखत्यारीतील महाराष्ट्र कृषी सेवेतील कृषी अधिकारी गट ‘अ’, कृषी अधिकारी गट ‘ब’ व कृषी अधिकारी गट ‘ब’ कनिष्ठ ही पदे भरण्यात येतात.

अर्हता - 

या परीक्षेसाठी शैक्षणिक अर्हता ही मान्यताप्राप्त संस्थेकडून कृषी अभियांत्रिकी किंवा कृषी अथवा उद्यानविद्या या विषयातील पदवी किंवा त्यास समतुल्य अर्हता पुढीलप्रमाणे -
1) B.Sc कृषी जैव तंत्रज्ञान     2) B.Sc कृषी व्यवसाय व्यवस्थापन
3) B.Sc गृह विज्ञान     4) B.Tec अन्नतंत्र    
5) B.F.Sc गृह विज्ञान     6)B.Sc उद्यानविद्या

पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारे उमेदवार हे पूर्व परीक्षेसाठी पात्र असतील, मात्र मुख्य परीक्षेसाठी अर्हताप्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असेल. 

परीक्षेचे टप्पे - प्रस्तूत परीक्षा ही एकूण तीन टप्प्यांत घेण्यात येते. 
1) पूर्व परीक्षा - 200 गुण
2) मुख्य परीक्षा - 400 गुण
3) मुलाखत - 50 गुण

1) पूर्व परीक्षा -

पूर्व परीक्षेचा मुख्य उद्देश हा उमेदवारांची संख्या विहित मर्यादेत सीमित करणे हा असतो. पूर्व परीक्षेचे गुण हे अंतिम निवडीच्या वेळी विचारात घेतले जात नाहीत म्हणूनच या टप्प्यांस चाळणी परीक्षा असे देखील म्हटले जाते. या टप्प्यांत उमेदवारास मिळालेले गुण हे आयोगाने विहित केलेल्या किमान सीमारेषा किंवा त्यापेक्षा जास्त असतील, तर असा उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र असतो. 

पूर्व परीक्षा ही एकूण 200 गुणांची असून त्यासाठी 100 प्रश्न विचारण्यात येतात. म्हणजेच एक प्रश्न हा दोन गुणांसाठी असतो. सर्व प्रश्न हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतात. व त्यासाठी एकूण एक तास वेळ असतो. 100 प्रश्न हे पुढील घटकांचे मिळून असतात. - मराठी भाषा (15 प्रश्न) इंग्रजी भाषा (15 प्रश्न, सामान्य अध्ययन (45 प्रश्न), कृषीविषयक घटक (25प्रश्न). पूर्व परीक्षा ही मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर या चार केंद्रांवर घेतली जाते. आयोग आवश्यकतेनुसार त्यात बदल करू शकतो. वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नांचे मूल्यांकन करताना प्रत्येक बरोबर उत्तरांनाच गुण प्राप्त होतात, तसेच प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतात.

2) मुख्य परीक्षा -

याचा मुख्य उद्देश हा उमेदवाराचे विषयातील सखोल ज्ञान तपासणे हा असतो. मुख्य परीक्षा ही दोन पेपरने बनलेली असते. 1) कृषी विज्ञान 2) कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी प्रत्येक पेपरमध्ये प्रत्येकी 100 प्रश्न, 200 गुणांसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकारात विचारतात. वरील पेपर क्र. 2 हा वैकल्पिक असून त्यामध्ये कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी या दोन विषयांमधून कोणताही एक विषय मुख्य परीक्षेची माहिती सादर करतेवेळी निवडणे अनिवार्य असते.
मुख्य परीक्षादेखील मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर या चार केंद्रांवर घेतली जाते. मुख्य परीक्षेत जे उमेदवार गुणांची किमान सीमारेषा किंवा त्यापेक्षा जास्त प्राप्त करतात, त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाते.

मुलाखत 

मुलाखतीमध्ये उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व व व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू तपासले जातात. या परीक्षेकरिता मुलाखत ही 50 गुणांसाठी घेतली जाते. 
अशाप्रकारे मुख्य परीक्षा व मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून गुणवत्ता यादी तयार केली जाते.
अशाप्रकारे मुख्य परीक्षा व मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून गुणवत्ता यादी तयार केली जाते व अंतिम निवड केली जाते. अंतिम यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होते.