Tue, Jul 14, 2020 13:24होमपेज › Edudisha › काळजी कशाला करता?

काळजी कशाला करता?

Last Updated: Jun 01 2020 8:33PM
विनिता शाह

जर आपल्याला जीवनात शांतता आणि यश मिळवायचे असेल तर चिंता सोडून केवळ कामावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. हाच यशाचा महत्त्वाचा मंत्र आहे.

आपण कधी गावाकडील नदीवर बांधलेल्या पुलाखालून वाहणारे पाणी पाहिले आहे का? पाणी वाहणे हे आपल्या जीवनाला चिंता आणि काळजी यापासून दूर ठेवण्यासाठी प्रेरणादायी ठरते. पुलाखालून वाहून जाणारे पाणी परत येत नाही, असे म्हटले जाते. पुलाखाली असणारे पाणी हे प्रत्येकवेळी नवीन असते. आपल्या जीवनातील दु:खदायक, क्लेषदायक आठवणी पुलाखालील पाण्याप्रमाणे जाऊ द्यावे आणि ते विसरून जावे. सध्याच्या काळात योग्य मार्गाने जगले पाहिजे.

यशाला मर्यादा आखून द्या : सिकंदरच्या बाबतीत म्हटले जाते की, ते जेव्हा जग जिंकायला निघाले होते, तेव्हा त्यांच्या गुरूने विचारले की, तू जर जगाला जिंकले तर पुढे काय करणार? कारण जग तर एकच आहे आणि पुन्हा दुसरे जग जिंकण्यासाठी ते कोठून आणणार? या प्रश्‍नाने सिकंदरचे डोळे उघडले. वास्तविक आपल्याकडे जे काही आहे, त्यातूनच जीवनासाठी आनंद शोधण्याचा प्रयत्न करावा. अशा कृतीमुळे आपण चिंता, काळजीपासून दूर राहू शकतो.

परिस्थितीनुसार बदला : साहित्यिक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी आपल्या पुस्तकात मॅन अँड सुपरमॅन लिहिले आहे. चिंतारहित जीवनासाठी व्यक्‍तीने नेहमीच काळानुसार बदलण्याची तयारी ठेवायला हवी, असे म्हटले जाते. एखादी व्यक्‍ती वातावरणानुसार राहण्याचा प्रयत्न करते. तो अपयशी ठरल्यास गंभीर समस्या निर्माण होतात. त्यामुळे स्वत:ला काळानुसार बदलण्याची तयारी ठेवायला हवी. दुसरीकडे परिस्थिती ही माणसाच्या इशार्‍यानुसार बदलत नाही. शेवटी परिस्थिती बदलण्याच्या नादात व्यक्‍ती अकारण तणावाखाली येते. म्हणूनच स्वत:ला काळजीच्या गर्तेत लोटण्यापेक्षा परिस्थितीनुसार राहण्याचा प्रयत्न करा. 

दुसर्‍याच्या दु:खातून शिकणे : जगात अशी कोणतीही व्यक्‍ती नाही की, ती दु:खी नाही. प्रत्येक व्यक्‍ती ही चिंता आणि काळजीने ग्रासलेली असते. शेवटी हा निसर्गाचा नियम आहे. जीवनातील प्रत्येक पातळीवर तणावमुक्‍त राहण्याचा प्रयत्न करायला  हवा. 

दु:ख खूप काही शिकवते : अमेरिकी कवी हेन्री वर्डस्वर्थ लाँगफेलो यांनी एकदा म्हटले की, प्रत्येक व्यक्‍तीचे स्वत:चे दु:ख असते. ते दु:ख जगाला माहीत नसते. परंतु जेव्हा हे दु:ख समजून घेण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केले जाते, तेव्हा दु:खात भर पडते आणि औदासिन्य वाढत जाते. म्हणूनच आपण संकटात अडकून राहण्यापेक्षा त्यावर तोडगा काढण्याचे शिकायला हवे. आप्तेष्टांशी चर्चा करायला हवी. वेदना, दु:ख सांगितल्याने त्याचा मनावरचा ताण हलका होतो. म्हणून आनंदाच्या क्षणाप्रमाणेच दु:खही शेअर केले पाहिजे. प्रश्‍न, अडचणींबाबत  लोकांशी मनमोकळेपणाने बोलावे. प्रत्येक काळात सोबत राहणारे मित्र देखील आपल्याला असायला हवेत.