Sat, Oct 24, 2020 08:01होमपेज › Edudisha › करिअर करा ‘फिट’

करिअर करा ‘फिट’

Last Updated: Oct 06 2020 2:27AM
 अनिल विद्याधर

युवकांमध्ये सध्या रोजगाराचा प्रमुख प्रश्न जाणवत आहे. अशा परिस्थितीमध्ये काही चाकोरीबाहेरचे करिअर पर्याय उपलब्ध आहेत.

साधारणत: दोन ते तीन दशकांपूर्वी फिटनेसशध्ये देखील करिअर करता येऊ शकते, असा विचार करणे म्हणजे वेडेपणा ठरू शकत होता. कारण महानगर किंवा क्रीडा क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी फिटनेसला फारसे महत्त्व देत नव्हते किंवा त्याबाबत जागरुकता नव्हती.  परंतु, आता काळ बदलला आहे. आज फिटनेसला विशेष महत्त्व आले आहे. फिटनेसच्या केंद्रस्थानी जीम आहे. देशात 40 लाखांहून अधिक युवकांना जीमच्या माध्यमातून थेट रोजगार मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते, 2030 पर्यंत या उद्योगात मंदी येणार नाही. याचाच अर्थ असा की, या क्षेत्रात करिअर करण्याची आपल्याला आवड असेल आणि आपण स्वत:ही फीट असाल तर फिटनेस ट्रेनर, जीम हे रोजगाराची चांगली संधी म्हणून पाहता येईल. निम्म्यापेक्षा अधिक फिटनेस सेंटरवर चांगल्या ट्रेनरचा वाणवा आहे. या कारणांमुळेच मंदी असतानाही देशात सुमारे 5 हजार कुशल ट्रेनरची तातडीची गरज आहे. फिजिकल ट्रेनरला वाढती मागणी लक्षात घेता देशातील अनेक विद्यापीठ, फिजिकल सेंटर तसेच अन्य शैक्षणिक संस्थांनी देखील मोठ्या प्रमाणात फिटनेस ट्रेनिंग अभ्यासक्रम सुरू केले आहेत. 

अभ्यासक्रम : बॅचलर इन फिजिकल एज्युकेशन म्हणजेच बीपीएड कोर्स हा लोकप्रिय आहे. सेंट्रल कौन्सिलिंग इन योगा अँड नॅचुरोपॅथीमध्ये देखील फिटनेस ट्रेनिंगचा एक वर्षाचा डिप्लोमा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. याशिवाय स्पोर्टस् अ‍ॅथोरिटी ऑफ इंडिया देखील स्पोर्टस् आणि अ‍ॅथलिट कोचिंग अभ्यासक्रम उपलब्ध करून देते. 

प्रवेश प्रक्रिया : कोणत्याही संस्थेत बॅचलर किंवा पीजी डिप्लोमा मिळवण्यासाठी उमेदवाराने किमान 50 टक्के गुणांसह पदवी प्राप्त करणे गरजेचे आहे. जर डिप्लोमा अभ्यासक्रम करायचा असेल, तर त्याची किमान शैक्षणिक पात्रता ही बारावी उत्तीर्ण आणि वय 18 असणे गरजेचे आहे. 

वैयक्तिक गुण कौशल्य : फिटनेस ट्रेनर होण्यासाठी इच्छुक उमेदवाराला शारीरिक संरचनेची चांगली जाण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तांत्रिक माहिती आणि कुशल वक्ता असणेही तितकेच महत्त्वाचे आहे.  

रोजगाराची संधी : जीम, हेल्थ सेंटर, नॅच्युरोपॅथी, योगा केंद्र, पर्सनल ट्रेनर म्हणून नोकरी करता येते. याशिवाय शाळा, क्रीडा संस्था आणि कॉर्पोरेट क्षेत्रात विशेषत: सेवा क्षेत्रातील कंपन्यादेखील आजकाल फिजिकल ट्रेनरची सेवा घेत आहेत. 
 

 "