Wed, Jun 03, 2020 01:34होमपेज › Edudisha › विकास का गरजेचा?

विकास का गरजेचा?

Last Updated: Oct 08 2019 1:31AM
अपर्णा देवकर

आजकाल प्रत्येक क्षेत्रात आर्टिफिशीयल इंटेलिजिन्स, क्लाऊड कॉम्प्युटिंग यांसारख्या तंत्राचा वापर केला जात आहे. जुन्या कौशल्यात पारंगत असलेल्या नोकरदारांना नोकरी टिकवण्यासाठी क्षमता वाढवण्यावर भर देणे गरजेचे आहे. या आधारावर सध्याच्या काळात कोणत्या कौशल्याला अधिक मागणी आहे, ते पाहू या. 

कौशल्य काळाबरोबरच तंत्रज्ञान आणि बाजारातील गरजांमध्ये बदल झाला आहे. कंपन्या फायदा वाढविण्यासाठी, सेवेतील खर्च कमी करण्यासाठी, प्रॉडक्शन ऑटोमेशनसारख्या काही तांत्रिक कारणामुळे तंत्रविकासाकडे लक्ष देत आहेत. सध्याच्या कार्यक्षेत्रात ज्या कौशल्यांना मागणी आहे, ती मागणी भविष्यातही कायम राहीलच असे नाही. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आज टायपिस्ट, हँडकंम्पोजिंग यांसारख्या नोकरदारांची गरज असून नसल्यासारखी आहे. अर्थात कॉर्पोरेट कंपन्या या गोष्टी चांगल्या रितीने जाणून आहेत. आजघडीला गरजेचे असणार्‍या कौशल्यासाठी कंपन्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यासाठी कंपन्या मदत करत असल्याचे चित्र आहे. 

कौशल्य विकास कशासाठी? - युवकांना नवीन शिकताना संकोच बाळगण्याची गरज नाही. जर गरज असेल तर आपल्या कार्यक्षेत्राशिवाय वेगळे कौशल्य शिकण्याचाही प्रयत्न करायला हवा. तसेच आपल्या व्यवसायाशी निगडित नवीन माहिती आणि बदल जाणून घेण्याचा प्रयत्न करा. या आधारावरच आपण योग्य दिशेने वाटचाल करू शकता. सध्याच्या काळात मल्टिटास्किंगवर भर दिला जात आहे. पूर्वीप्रमाणेच नोकरदाराने विशिष्ट काम वेळेत पूर्ण पार पाडावे, असा दंडक राहिला नाही. नियमित कामाव्यतिरिक्त कर्मचार्‍यांनी वेगळे कौशल्य सिद्ध करून दाखवावे, अशी कंपनी आशा बाळगत आहे. त्यामुळे कायम शिकण्याची तयारी ठेवावी. नोकरीदरम्यान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम पूर्ण केल्यास करिअरला आणखी वाव मिळतो. 

प्रशिक्षणाच्या संधी : आजमितीला कोणताही युवक किंवा युवती ही कौशल्य विकासावर आधारित ऑनलाईन किंवा ऑफलाईन अभ्यासक्रम पूर्ण करू शकते. प्रशिक्षण संस्था आणि कंपन्या या अभ्यासक्रमाचा उपयोग कर्मचार्‍याच्या अंगी कौशल्य विकसित करण्यासाठी करून घेत आहेत. यापूर्वीही हायर अँड ट्रेंड मॉडेलचे अनुकरण केले जात होते. कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यासाठी एखादी शैक्षणिक संस्था, कन्सल्टंसी यांच्यासमवेत करार केला जात आहे. त्यामुळे सद्यस्थितीत कोणत्या कौशल्यावर अधिक भर दिला जात आहे, ते पाहू. 

इंजिनिअरिंगच सॉफ्ट स्किल्स : संबंधित कार्यक्षेत्राचे कौशल्य नसल्यामुळे बहुतांश इंजिनिअर पदवीधर युवकांकडे नोकरी नसल्याचे दिसून येते. जुना अभ्यासक्रम आणि तंत्रज्ञानाबाबत माहिती नसल्यामुळे नोकरीपासून वंचित राहवे लागत आहे. त्यामुळे एआयसीटीईने दहा हजार विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केला. हा ऑनलाईन अभ्यासक्रम एआयसीटीईने टीसीएस आयओएनच्या सहकार्याने सुरू केला. हा अभ्यासक्रम युवकांना करिअर कौशल्य जसे की कॉर्पोरेट मूल्य, प्रभावी ई-मेल लेखन, सादरीकरण यासह अन्य व्यक्तिमत्त्व विकासासाठी साह्यभूत ठरत आहे. इच्छुक युवकांनी करिअरशी निगडित कौशल्यविकास अभ्यासक्रम पूर्ण केल्यास त्यांना विकासाची संधी मिळते. हा अभ्यासक्रम युवकांना तंत्रज्ञानाचे प्रशिक्षणही प्रदान करते. 

सिस्टीम सिक्युरिटी : आयटी तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रयोगामुळे सायबर गुन्हेगारांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे प्रत्येक आयटी कंपन्या अशा प्रकारच्या नुकसानीपासून वाचण्यासाठी आपल्या कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देत आहेत. तसेच प्रशिक्षण देण्यासाठी प्रोत्साहनही देत आहेत. इच्छुक युवक यासाठी नेटवर्क +, सिक्युरिटी + आणि सर्टिफाईड अ‍ॅथिकल हॅकर (सीइएच) यासारखी प्रचलित ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करून नोकरीसाठी दावा करू शकतात. 

आयटी सर्टिफिकेशन : संगणक शास्त्राचे विद्यार्थी हे आयटी सेक्टरमधील नवनवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण प्राप्त करून नोकरीसाठी दावा अधिक मजबूत करू शकतात. सिस्को, मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल यांसारख्या खासगी कंपन्या या तंत्रज्ञानाशी निगडित प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे आयोजन करत आहेत. क्लाऊड कॉम्प्युटिंग, एसक्युएल सर्व्हर, माय एसक्यूएल आणि अ‍ॅनिमेशनशी निगडित अभ्यासक्रमाला मोठी मागणी आहे. 

फायनान्शियल मार्केटमधील अभ्यासक्रम : पदवीनंतर ज्या युवकांना फायनान्शियल मार्केटमध्ये करिअर करायचे आहे, त्यांच्यासाठी एनसीएफएम सारखे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. त्यानंतर स्टॉक अ‍ॅनालिस्ट, पोर्टफोलिओ मॅनेजर यांसारख्या पदावर नोकरी मिळू शकते. याशिवाय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट आणि आयसीआयसीआय डायरेक्ट सेंटर एकत्र येऊन फायनान्शियल मार्केटमध्ये अ‍ॅडव्हान्स्ड सर्टिफिकेेशन अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. याशिवाय व्यावसायिक फायनान्शियल मार्केट मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा आणि अ‍ॅडव्हान्सड डिप्लोमा कोर्स देखील करता येतो. 

डिजिटल मार्केटिंग : विशेषत: सेल्स आणि मार्केटिंगशी निगडित क्षेत्रात नोकरीचा शोध घेणार्‍या युवकांसाठी मार्केटिंगचे नवीन कौशल्य वेळोवेळी हस्तगत करणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारच्या सेल्स प्रमोशनमध्ये ऑनलाईन मार्केटिंगचे तंत्रज्ञान अधिक प्रभावी राहिले आहे. कोर्सेरा, उडेमी यांसारख्या असंख्य ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. 

व्हिडीओ गेम्स इंडस्ट्री : व्हिडीओ गेम्स इंडस्ट्रीचा कारभार हा अन्य क्षेत्रांच्या तुलनेत अधिक वाढला आहे, हे वाचून आश्चर्य वाटेल. मोबाईल गेमिंगची वाढती लोकप्रियता हे यामागचे कारण आहे. व्हिडीओ गेम डिझाईनमध्ये बॅचलर आणि मास्टर पदवीधारक युवकांना अभ्यासक्रम पूर्ण करण्याअगोदरच नोकरी मिळत आहे. जी मंडळी पूर्वीपासूनच गेमिंग इंडस्ट्रीत आहेत, त्यांच्यासाठी कौशल्याला आणखी वाढविण्याची गरज आहे. जी मंडळी कॉम्प्युटिंग आणि गेम्सची पायाभूत रचना जाणून आहेत, त्यांनी लेव्हल डिझाईन, स्टोरीलाईन डेव्हलपमेंटसह गेम डिझाईनच्या अन्य गोष्टींचे कौशल्य मिळवणार्‍या अभ्यासक्रमाचा विचार करायला हवा. इच्छुक विद्यार्थी गेम आर्ट आणि डिझाईनमध्ये डिप्लोमा आणि सर्टिफिकेट अभ्यासक्रम करू शकतात. 

इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांचे तज्ज्ञ : केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांवरून अनेक प्रकारच्या सवलती बहाल केल्या आहेत. त्यामुळे युवकांनी अशा प्रकारच्या वाहनांच्या तंत्रावर लक्ष देणे गरजेचे आहे. इच्छुक नोकरदार भारत सरकारच्या एनपीटीईएलच्या माध्यमातून प्रशिक्षण प्राप्त करू शकतात. त्याचवेळी इंट्रोडेक्शन टू हायब्रिड अँड इलेक्ट्रिकल व्हेइकल, इलेक्ट्रिकल व्हेईकल पार्ट व यासारखे अभ्यासक्रम पूर्ण करता येते. 

आव्हाने : दीर्घकाळापासून साचेबद्ध काम करणार्‍या मंडळींची मानसिकता सहजासहजी बदलणे शक्य नाही. 
विशिष्ट वयानंतर नवीन शिकण्याची जोखीम उचलणे काहींच्या स्वभावात नसते.
घर-कुटुंब आणि नोकरी यांच्या जबाबदार्‍या सांभाळत नवीन प्रशिक्षणासाठी वेळ काढणे कठीण. 
आर्थिक अडचणींमुळे कौशल्य विकास अभ्यासक्रमाची फी भरणे देखील आव्हानच मानले जाते.