Fri, Apr 23, 2021 13:58
डाटाबेस अ‍ॅडमिनिस्ट्रेटर व्हायचंय?

Last Updated: Apr 05 2021 8:38PM

संदीप म्हैसकर

ग्राहकांच्या वाढत्या मागण्या आणि अपेक्षा लक्षात घेता प्रत्येक कंपनीला आपलं वेगळेपण दाखवणं गरजेचं झालं आहे. त्यासाठी मार्केटमधल्या बदलांकडे नजर ठेवून आपल्या कंपनीच्या धोरणांमध्ये बदल करत त्याबद्दलची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि ती वेळेत अपडेट करण्यासाठी प्रत्येक छोट्या-मोठ्या कंपनीला डाटाबेस अ‍ॅडमिनिस्ट्रेटरची आवश्यकता असतेच; पण यात करिअर कसं करता येईल..?

डाटाबेस अ‍ॅडमिनिस्ट्रेटरची कंपनीतील भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचं महत्त्वाचं काम म्हणजे कंपनीच्या कामाची सर्व महत्त्वपूर्ण माहिती व्यवस्थितपणे सांभाळणं आणि ती माहिती वेळच्या वेळी अपडेट करीत रहाणं. अनेकदा डाटाबेस अ‍ॅडमिनिस्ट्रेटरने अपडेट केलेल्या माहितीच्या आधारेच कंपनीचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. कंपनीच्या विकास आणि विस्तारासाठी डाटाबेस अ‍ॅडमिनिस्ट्रेटरचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यासाठी मार्केटमधल्या सगळ्या घडामोडींवर अ‍ॅडमिनिस्ट्रेटरचे लक्ष असणे आवश्यक असते. कंपनीचा महत्त्वपूर्ण डाटा सांभाळण्याची जबाबदारी अ‍ॅडमिनीस्ट्रेटरला पार पाडावी लागते. आपल्यालाही डाटा व्यवस्थितपणे सांभाळून ठेवण्याची आवड असेल, तर ती आवड तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही उतरवता येऊ शकते.

* डाटाबेस अनॅलिस्टही व्हा...

डाटाबेस अ‍ॅडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करण्याची इच्छा असेल, तर काही गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. त्यासाठी मुख्य म्हणजे कॉम्प्युटर लँग्वेजची माहिती. ओरॅकल सर्टिफाईड असोसिएट (ओसीए) सर्टिफिकेशनबरोबर या क्षेत्रामध्ये फ्रेशर्सनाही सहज प्रवेश मिळू शकतो. सुरुवातीला अडीच ते चार लाखांपर्यंत वर्षभराचं पॅकेज मिळू शकते. साधारणत: दहा ते पंधरा  डेव्हलपर्ससाठी एका डाटाबेस अ‍ॅडमिनिस्ट्रेटरची आवश्यकता असते. आज जशा जिऑग्राफिकल, इन्फर्मेशन सिस्टीम, तसेच 

इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रांचा विकास होताना पाहायला मिळताहेत, तशा या क्षेत्रातल्या रोजगाराच्या संधी दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळताहेत. याशिवाय आपल्याला डाटाबेस अनॅलिस्ट म्हणूनही काम करता येऊ शकते. वाढत्या तंत्रज्ञानामुळे मार्केटमध्ये रोज मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहेत. त्याचबरोबर ग्राहकांच्या आवडीनिवडीही बदलत आहेत. त्यामुळे कंपनीचा डाटा कलेक्शन करून ठेवणं ही आजची गरज बनली आहे. तो डाटा सांभाळण्याची जबाबदारी ही डाटाबेस अ‍ॅडमिनिस्ट्रेटरची असते. 

* कुठं शिकता येईल?

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुडकी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गुवाहाटी, मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कर्नाटक अशा काही महत्त्वाच्या संस्था याचं प्रशिक्षण देतात.

* तुम्हाला काय करावे लागते?

ओरॅकल पीएलची माहिती असणे आवश्यक, चांगले कम्युनिकेशन आणि मॅनेजमेंट स्कील असणे गरजेचे. अशाप्रकारच्या महत्त्वाच्या पात्रता असल्यास डाटाबेस अ‍ॅडमिनिस्ट्रेटर हे करिअर तुम्हाला  कुठल्या कुठे घेऊन जाईल.