मुलाखतीच्या बदलत्या पद्धती

Last Updated: Oct 08 2019 1:31AM
Responsive image


विजयालक्ष्मी साळवी

काही काळापूर्वी मुलाखत घेण्याची एक ठराविक पद्धत होती. सध्या मुलाखत घेताना उमेदवाराची शैक्षणिक कौशल्ये पाहिली जातातच शिवाय त्यांच्यातील व्यावहारिकताही जोखली जाते. कंपनीतील कार्य करताना आव्हानात्मक परिस्थिती कशी हाताळाल, कंपनीच्या वातावरणात स्वतःला कसे अ‍ॅडजेस्ट कराल या सर्व गोष्टी पारखून घेतल्या जातात.

मुलाखतीचे विविध प्रकार सध्या पाहायला मिळताहेत. नोकरीसाठी इच्छुक असाल तर प्रत्यक्ष मुलाखतीच्या या विविध पद्धती जाणून घ्या. 

कंपनीत मुलाखतीला गेल्यावर तिथले काम करण्यास उमेदवार सक्षम आहे का हे जाणून घेण्यासाठी कंपनी संचालक आपले म्हणजे नोकरी मिळवण्यास इच्छुक व्यक्तीची मुलाखत घेताना त्याचे व्यक्तिमत्त्व, विषम परिस्थिती आपण कसे वागतो, समस्या सोडवण्याची क्षमता आणि निर्णय क्षमता आजमावतात. त्यासाठी विविध प्रयोग केले जातात. थोडक्यात काय तर मुलाखतीच्या प्रक्रियेत बदल झाले आहेत. यशस्वी होण्यासाठी काळानुसार बदलणार्‍या मुलाखतीच्या पद्धती जाणून घेत स्वतःमध्ये बदल घडवून आणावे, त्यासाठी तयार ठेवावे. 

•व्यक्तिमत्त्वाची पारख : टॅलेंट असेसमेंट आणि अनालिटिक्समध्ये उमेदवाराच्या सवयी, पद्धती यावर लक्ष ठेवले जाते. उमेदवाराच्या व्यक्तिगत आयुष्याशी निगडित काही गोष्टींवर प्रश्न एका पाठोपाठ प्रश्न विचारतात. मुलाखतीदरम्यान चालू घडामोडी, नातेसंबंध, आरोग्य, आहार आणि कला या सर्वांविषयी प्रश्न विचारले जातात. उमेदवाराला त्याचा स्वतःचा सायकोमॅट्रिक रिपोर्ट तयार करायला सांगितले जाते. त्यानंतर कंपनीने तयार केलेल्या अहवालाशी त्याची तुलना करण्यास सांगण्यात येते. आस्थापनातील निवड करणार्‍या रिक्रूटर व्यक्ती उमेदवाराला बाहेरच्या बाजूला अर्धा तास बसवून ठेवतात आणि त्यांच्या वर्तणुकीचे निरीक्षण करतात. तिथल्या मेजावर पाच सहा पुस्तके, वेगवेगळी वृत्तपत्र आणि मासिकेही ठेवतात. तिथे ठेवलेल्या कोणत्या पुस्तकांची आपण म्हणजे उमेदवार निवड करतो याचेही विश्लेषण रिक्रूटर करतात. 

तणावपूर्ण मनःस्थिती : या अंतर्गत आपल्याला म्हणजे उमेदवाराच्या मनात ताण निर्माण होईल, असे प्रश्न विचारले जातात. द्विधा मनःस्थिती होईल असे प्रश्न विचारले जातात. उदा. आम्ही तुम्हाला नोकरीवर ठेवले पण काम समाधानकारक नाही म्हणून काढून टाकले तर आपण काय कराल? अशा प्रकारचे अपमान करणारे प्रश्न विचारून उमेदवार काय प्रतिक्रिया देतो हे पाहिले जाते. त्यामुळे उमेदवाराची वृत्ती, तणावामध्ये स्वतःला सावरण्याची कला, राग किंवा लाज यावर आपले नियंत्रण आहे की नाही त्या क्षमतेची चाचपणी केली जाते. अशा वेळी आपल्या विचारांचे संतुलन ठेवून अत्यंत तार्किक उत्तर दिले तर ही नोकरी नक्कीच आपल्या पदरात पडू शकते. 

•समस्या सोडवण्याचे कौशल्य

मोठ्या पदांवर नोकरीला ठेवताना कंपन्या हल्ली विशिष्ट केस घेऊन त्याआधारे मुलाखत घेतात. उमेदवाराची निर्णयक्षमता आणि वैचारिक क्षमता पारखून त्याला एखादी गुंतागुंतीची व्यावसायिक केस किंवा प्रकरण हाताळण्यास सांगितले जाते. त्यानंतर तिथे असणारे इतर सर्व मोठे अधिकारी, व्यवसाय विशेषज्ज्ञ आणि रणनीती ठरवणारे तो उमेदवार ते प्रकरण कसे हाताळतो ते पाहतात. त्यातून उमेदवाराचे नेतृत्व कौशल्य, सामान्य ज्ञान, तणावाच्या परिस्थितीत काम करण्याची क्षमता आणि स्ट्रॅटेजिक किंवा धोरणात्मक विचारसरणी कळते. अशा मुलाखतीदरम्यान घाईगडबड टाळावी किंवा अतिआत्मविश्वास दाखवू नये. शांतपणे लक्ष देऊन प्रकरणाची प्रत्येक बाजू बारकाईने समजून घ्यावी आणि आपल्या पूर्ण क्षमतेने दिलेले काम किंवा प्रकरण सोडवावे. 

शिष्टाचार आणि वर्तणुकीच्या पद्धती : कॉर्पोरेट ट्रेनर आणि करिअर स्पेशालिस्ट असेही सांगतात की हल्ली काही कंपन्यांमधून उमेदवारांना जेवणादरम्यान मुलाखत असा स्वरूपाने मुलाखतीला बोलावतात. जिथे आपण नोकरी करू शकतो किंवा जी व्यक्ती आपली वरिष्ठ अधिकारी असेल तिच्याबरोबर जेवत असताना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देणे वाटते तितके सोपे काम नाही. अशा प्रकारे जेव्हा मुलाखतीला जाता तेव्हा खूप महाग पदार्थांची किंवा खूप स्वस्त पदार्थांची मागणी नोंदवू नये. तोंडात घास असताना बोलू नये. शांतपणे जेवावे आणि बोलताना वरिष्ठांशी डोळ्यांनी पाहात संपर्क ठेवा. अशा मुलाखतींमध्ये आपल्या एटीकेटसवरही नजर असते. मुळातच जेवणामधील मुलाखतीला बोलवायचे कारण हेच असते की जेवताना व्यक्ती तणावविरहीत आणि अनौपचारिक होऊन गप्पा मारते. अशावेळी ती स्वतःविषयी मोकळेपणाने उत्तरेही देते. कंपनीच्या वरिष्ठांना हेच तर हवे असते. त्यांना मोकळेपणाने बोलणारी व्यक्तीच पारखून निवडायची असते. 

समारोप : मुलाखतकार आपल्याला नेमके काय प्रश्न विचारतील आणि त्याचे उत्तर काय द्यायचे या विचारात आपण मुलाखतीत पोहोचतो तेव्हा तिथे ऑफिसातील सर्व लोक व्यायाम करताना पाहतो. आपल्याला आश्चर्य वाटते; पण रिक्रूटर म्हणतो की कंपनीतील हा व्यायामाचा वेळ आहे, आपणही त्यात सामील व्हा. अशा वेळी दचकून जाऊ नका, आश्चर्यचकीत होऊ नका. 

आपण सहभागी झालो तर त्यातून आपण गोष्टी कशा सामावून घेऊ शकतो हे कळते. कनिष्ठ पातळीच्या मुलाखतीत उमेदवाराला गिटार वाजण्यास सांगितले जाते आणि अनपेक्षित परिस्थितीत उमेदवार काही शिकण्याचा प्रयत्न करतो की नाही, याची पारख या सर्व गोष्टींतून केली जाते.