Sun, Sep 20, 2020 03:54होमपेज › Edudisha › बारावीनंतर करिअरचे पर्याय

बारावीनंतर करिअरचे पर्याय

Last Updated: Aug 03 2020 7:39PM
सुनीता जोशी

सध्या बारावीनंतर बरेच करिअर ऑप्शन तुमच्यासमोर उपलब्ध आहेत. त्यातील कोणताही ऑप्शन तुम्ही निवडू शकता. तुम्ही सायन्समधून बारावीची परीक्षा दिली असेल आणि फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथॅमॅटिक्स हा तुमचा ग्रुप असेल तर तुम्ही इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊ शकता. शिवाय कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन हे पर्याय आहेतच.

बारावीनंतर पायलट होऊ इच्छिणारी मुले कमर्शियल एव्हिएशनमध्ये जाऊ शकतात. नॉटिकल सायन्स किंवा मरिन इंजिनिअरिंग हा पर्यायही उपलब्ध आहे. मात्र, त्यासाठी तुम्हाला गणित आणि भौतिकशास्त्र या विषयाची आवड असायला हवी. क्रिएटिव्ह क्षेत्राची आवड असणार्‍या मुलांनी सिरॅमिक टेक्नॉलॉजीचा अभ्यास करायला हरकत नाही. फिजिक्स, केमेस्ट्री, मॅथॅमॅटिक्स आणि बायोलॉजी ग्रुप असलेली मुले बी.एस्सी, मेडिसिन, पॅरामेडिकल सायन्स, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, फ़ार्मसी, मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, ऑप्टोमेट्री आणि इतर टेक्निशियन कोर्सही करू शकतात. 

बी.एस्सी.मध्ये झुओलॉजी, बॉटनी, बायोटेक्नॉलॉजी, लाईफ सायन्स, न्यूट्रिशिअन अँड डाएटिक्स, फ्रुड टेक्नॉलॉजी, फॉरेन्सिक सायन्स, मरीन बायोलॉजी, जेनेटिक्स, बायोकेमेस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, मॅथॅमॅटिक्स आदी विषयात डिग्री घेता येईल. 

मेडिसिनमध्येही एम.बी.बी.एस. डेंटिस्ट्री, व्हेटर्नरी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक, युनानी मेडिसिन हे पर्याय उपलब्ध आहेत. पॅरामेडिकल सायन्समध्येही फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्वीच अँड ऑडिओलॉजी, प्रोस्थेटिक आणि ऑर्थोटिक्स इत्यादी शाखा आहेत.

कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठीही अनेकविध पर्याय उपलब्ध आहेत. फायनान्सची आवड असणारे विद्यार्थी बी.कॉम. इन अकाऊंटस् अँड फायनान्स क्षेत्रामध्ये जाऊ शकतात. याशिवाय चार्टर्ड अकाऊंटन्सी, कंपनी सेक्रेटरी, आयसीडब्ल्यूएला प्रवेश घेऊ शकतात. विशेष म्हणजे हे सर्व कोर्स तुम्ही बी.कॉम. करता करता करू शकता. कला शाखा म्हणजे हलक्या प्रतीची शाखा असा एक गैरसमज सर्वांमध्ये असतो; पण कला शाखेतूनही सुपर-डुपर करिअर करता येऊ शकते, हे बर्‍याच जणांना माहीत नसते. आपण कोणत्याही विषयात स्पेशलायझेशन करू शकतो. ग्रॅज्युएशननंतर तुम्हाला जर्नालिझम करायचे असेल तर कला शाखा सर्वात प्रभावी ठरू शकते.

सर्व शाखा सारख्याच महत्त्वाच्या असतात; पण सायन्स तुलनेने थोडी अवघड शाखा असल्याने या शाखेला जास्त महत्त्व दिल जाते. करिअरचे काही ऑप्शन असे आहेत की तुम्ही आर्टस् कॉमर्स आणि सायन्स यापैकी कोणत्याही शाखेतून उत्तीर्ण झाला असाल तरी तुम्हाला यामध्ये करिअर करता येते. यातील पहिला म्हणजे बी.एम.एस. कोर्स. हा मॅनेजमेंट क्षेत्रातील पदवी कोर्स आहे. याशिवाय बी.एम.एम. कोर्समधून तुम्ही जर्नालिझम किंवा अ‍ॅडव्हर्टायझिंगमध्ये स्पेशलायझेशन करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना डिझायनिंगची आवड आहे अशा विद्यार्थ्यांनी इंटेरिअर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, इंडस्ट्रियल डिझायनिंग, ज्वेलरी डिझायनिंगसारखे कोर्स करायला हरकत नाही. 

कमर्शिअल आर्ट, फाईन आर्ट, डान्स म्युझिक या क्षेत्रातही तुम्ही पदवी संपादन करू शकता.सोशल वर्क हा तीन वर्षांचा कोर्सही आपण करू शकतो. तुम्ही कोणत्याही फिल्डमधील पदवी घेण्याचं ठरवलं तरी तुम्ही अ‍ॅनिमेशन अँड ग्राफिक्सचा कोर्स करू शकता. तुम्हाला वकील व्हायचं असेल तर बारावीनंतर पाच वर्षांचा किंवा ग्रॅज्युएशननंतर तीन वर्षांचा कोर्स उपलब्ध आहे. शिक्षकी पेशा निवडायचा असेल तर बी.एड.च्या मार्गाने जाण्यास काहीच हरकत नाही. शिवाय हॉटेल मॅनेजमेंट, टूर्स अँड ट्रॅव्हल्स मॅनेजमेंट, फॉरेन लँग्वेज ही क्षेत्रेही निवडायला काही हरकत नाही.

हे सर्व पर्याय झाले शिक्षणाच्या अंगाने; पण याव्यतिरिक्त काही प्रोफेशनल पर्यायही उपलब्ध आहेत. इथे तुम्ही कोणत्या शाखेतून बारावी केलं याला महत्त्व नसतं. सध्या फास्ट जनरेशन आहे. आर्टस्, कॉमर्स, मेडिकल, इंजिनिअरिंग या चौकटीत शिक्षणांचा या जनरेशनला कंटाळा आलेला असतो. त्यासाठी ही पिढी प्रोफेशनल कोर्सचा पर्याय स्वीकारत असते. हॉटेल मॅनेजमेंट हा एक चांगला पर्याय आहे. यातून तुम्हाला रेस्तराँ, एअरलाईन, क्रूझ, क्लब, केटरिंग, टुरिझम आदी सेक्टरमध्ये करिअर करता येतं. फॅशन इंडस्ट्रीतही डिझायनिंग, जर्नालिझम, मॉडेलिंग, मर्कंडायझिंग, फोटोग्राफी, मॅनेजमेंट यासारख्या सेक्टरचा समावेश होतो. तुमच्याकडे बिझनेस स्किल असेल तर बिझनेस कोर्स करा. ड्रॉईंगच्या विद्यार्थ्यांना डिझायनर होता येतं. अ‍ॅडव्हर्टायझिंग या क्षेत्रात क्लायंट सर्व्हिसिंग, कॉपी रायटर, व्हिज्युअलायझर, प्रोडक्शन अशा विविध विभागांत स्पेशलायझेशन करता येतं. व्हिज्युअलायझर आणि क्रिएटिव्ह आर्टिस्टसाठी बॅचलर ऑफ अप्लाईड आर्ट कोर्स करता येतो.

ज्वेलरी हे क्षेत्र डिझायनिंगपुरते मर्यादित नाही. इथे जेमॉलॉजी, डायमंड ग्रेडिंगपासून ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंगपर्यंतचे कोर्स आहेत. इंटेरिअर डिझायनिंग कोर्सनंतर तुम्हाला डेकोरेटर, थिएटर अँड सेट डिझायनर, एक्झिबिशन अँड विंडो डिस्प्ले डिझायनर म्हणून काम करता येतं. ब्युटी केअरचं शास्त्रशुद्ध ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्हाला ब्युटी थेरपिस्ट, कन्संल्टंट वा मार्केटिंग सेक्टरमध्ये करिअर करता येतं. स्किन, हेअर, बॉडी, मेकअप यापैकी एखादा विषय निवडून तुम्ही करिअरची दिशा निश्चित करू शकता.

अशाप्रकारे तुम्ही कोणत्याही फिल्डमध्ये जंप मारू शकता; पण फिल्ड निवडण्यापूर्वी तुमची आवड, आपण जे फिल्ड निवडणार आहोत त्यातील भविष्य आणि तुमचे मार्क्स या तीन बाबींचा मेळ घालायला विसरू नका!

 "