Fri, Nov 27, 2020 11:10होमपेज › Edudisha › भूगर्भ विज्ञानातील करिअर वाटा

भूगर्भ विज्ञानातील करिअर वाटा

Last Updated: Nov 03 2020 7:38AM
प्रा. पोपट नाईकनवरे

काही वर्षांपूर्वी अशी स्थिती होती की, आपला मुलगा किंवा मुलगी डॉक्टर किंवा इंजिनिअर झाली की, तिचे करिअर घडले असे समजले जात होते. अलीकडच्या काळात मात्र आता चित्र वेगळे दिसू लागले आहे. प्रत्येक तरुण किंवा तरुणी इतरांपेक्षा काहीतरी वेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याबाबत उत्सुक दिसून येतात.

माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे कोणत्याही क्षेत्राची किंवा अभ्यासक्रमाची माहिती आपल्याला चटकन मिळू शकते. वेगळ्या धाटणीचे करिअर आपल्याला समाधान देतातच परंतु वेगळ्या विश्‍वात काम केल्याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. आता पृथ्वीशी संबंधित अनेक क्षेत्र आहेत, की जेथे आपण प्राविण्य मिळवून करिअर करू शकतो. अशा अभ्यासक्रमाची निवड केल्यास आपल्या करिअरला आपण वेगळी दिशा देऊ शकतो. पुढीलप्रमाणे आपल्याला विविध क्षेत्रांची माहिती घेता येऊ शकेल.

ओशनोग्राफी : ओशनोग्राफीमध्ये समुद्र आणि समुद्रात आढळून येणार्‍या प्राण्यासंदर्भात अभ्यास केला जातो. विज्ञान शाखा निवडणार्‍या विद्यार्थ्यांना ओशनोग्राफीचा अभ्यासक्रम निवडू शकतात. हा अभ्यासक्रम साधारणत: तीन वर्षांचा असतो. त्यात जुलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, जिओलॉजी आणि वेदर सायन्सचा समावेश आहे. बहुतांशी कॉलेज आणि विद्यापीठात ओशनोग्राफी आणि मरिन बायलॉजीशी संबंधित पदव्युत्तर अभ्यासक्रमच उपलब्ध आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विज्ञान शाखेतील पदवीधर म्हणजेच बीएससी (जिओलॉजी, बॉटनी, केमिस्ट्री, फिशरिज सायन्स, अर्थ सायन्स, फिजिक्स, अ‍ॅग्रीकल्चर, मायक्रोबायलॉजी, अप्लाईड सायन्स यापैकी कोणताही एक) विषय असणे अनिवार्य आहे. या क्षेत्रात एमएससी ओशनोग्राफी, एमएससी मरिन बायलॉजी, एमटेक इन ओशनोग्राफी, एमएससी मरिन बायलॉजी, एम.फील मरिन बायलॉजी, एम.फील केमिकल ओशनाग्राफी किंवा ओशनोग्राफीमध्ये पीएच.डी. करू शकतो. सर्वसाधारणपणे या क्षेत्रात नमूने एकत्र करणे, सर्वेक्षण आणि अत्याधुनिक उपकरणातून डाटा गोळा करण्यासारखे काम केले जाते. या क्षेत्रात काम करण्यार्‍यास ओशनोग्राफर म्हटले जाते. यात पाण्याचा वेग, प्रवाहाची दिशा आणि त्याच्या फिजिकल आणि केमिकल तत्त्वावर लक्ष ठेवले जाते. 

ओशनोग्राफीच्या माध्यमातून आपल्याला समुद्र किनारा परिसर आणि परिसरावर होणार्‍या परिणामाची माहिती कळते. या क्षेत्रात अधिकाधिक केमिस्ट, फिजिस्ट, बायलॉजिस्ट आणि जिओलॉजिस्ट काम करतात.