Mon, Sep 21, 2020 17:04होमपेज › Edudisha › करिअर कौन्सिलिंग कधी घ्यावे?

करिअर कौन्सिलिंग कधी घ्यावे?

Last Updated: Feb 11 2020 1:24AM
कमलेश गिरी

बहुतांश मंडळी करिअर कौन्सिलिंगचा अचूक काळ शोधण्यास उशीर लावतात. परंतु, जेव्हा मुलं माध्यमिक शाळेत जातात, तेव्हाच करिअरचा मार्ग निवडायला हवा. साधारणत: आठवीनंतर विद्यार्थ्याचा कल समजू लागतो आणि त्यानंतर त्याला आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. त्याचबरोबर विद्यार्थ्याला जेव्हा स्ट्रिम बदलायची असते, त्याचवेळी करिअर कौन्सिलरचा आधार घ्यायला हवा. यामुळे आपल्याला मुलाचा कोणत्या विषयात रस आहे, फक्त हेच समजत नाही तर तो कोणत्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवू शकतो हेदेखील लक्षात येते. जर अकरावीला योग्य विषयांची निवड केली नाही तर संपूर्ण करिअरला यू टर्न मिळतो. प्रोफेशनल कौन्सिलर हे मानसिक आधारावर विद्यार्थ्यांशी चर्चा करतात. मानसोपचार तज्ज्ञ हे ‘सायकोमेट्रिक टेस्ट’च्या आधारावर विद्यार्थ्यांचे कौशल्य हेरतात. 

समुपदेशनाचे महत्त्व : पालकांना मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचवेळी त्यांच्या गरजादेखील ओळखता आल्या पाहिजे. मुलांचा कोणत्या विषयाकडे ओढा अधिक आहे आणि तो कोणत्या विषयात अधिक लक्ष देतो, हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरते. त्यानंतरच समुपदेशक हे विद्यार्थ्याला करिअरविषयक योग्य मार्गदर्शक करू शकतात. मात्र, आजच्या धावपळीच्या जीवनात पालक मुलासाठी किती वेळ काढतात, हे सर्वांनाच ठाऊक आहे. मुलांचा निकाल पालकांना माहित असला तरी मुलाची आवड कशात आहे, हे ओळखण्यास पालक चुकतात. केवळ विषयात चांगले मार्क मिळवणे म्हणजे त्याच विषयात तो भविष्यातही प्रावीण्य मिळवेल, असे म्हणणे चुकीचे ठरेल. 

आपल्या पाल्यांनी मेडिकल आणि इंजिनिअरिंग करण्यावर पालकांचा भर राहतो. परंतु, मुलांना जर त्यांच्या मनाप्रमाणे शिक्षण दिले नाही तर ते अकारण तणावाखाली येतात. याच ठिकाणी मुलांना म्हणजेच विद्यार्थ्यांना समुपदेशनाची गरज भासते. पाल्य, पालक आणि कौन्सिलर हे तिघे एकत्र आल्यावर करिअरची अचूक दिशा निवडण्यास हातभार लागू शकतो. विज्ञान शाखेत 90 ते 100 टक्के गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्याने पुढे विज्ञान शाखेतच जायला पाहिजे असे काही नाही. कदाचित त्याला गणितात फारसा रस नसेल, कारण दहावीनंतर शिक्षणाचा दर्जा एकदम वाढतो आणि जर विद्यार्थ्याला त्यात रस नसेल तर त्याच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. कौन्सिलिंगमध्ये याच गोष्टी पालकांना समजून सांगितल्या जातात. काहीवेळा पालकांचेच कौन्सिलिंग करण्याची गरज भासते. 

नवीन क्षेत्राची माहिती : कौन्सिलिंगचा सर्वात मोठा लाभ म्हणजे कौन्सिलर हे पारंपरिक क्षेत्राबरोबरच नावीण्यपूर्ण आणि नवख्या क्षेत्राची माहितीदेखील देतात. काही वेळा आपण त्या क्षेत्राकडे पाहिलेले देखील नसते. मार्केट ट्रेंड (देश-विदेश) बाबत सांगितले जाते आणि त्यात आपल्याला चांगली संस्था निवडण्यासाठी कौन्सिलर मदत करू शकतात. या मदतीने आपण  गळेकापू स्पर्धेत चांगल्या संस्थेची निवड करून अन्य मुलांच्या पुढे बाजी मारू शकता. आजमितीला मॅनेजमेंटमध्ये अनेक विषयांचा प्रवेश झाला आहे. याचप्रमाणे कायदा (लॉ) चे क्षेत्र देखील वाढले आहे. फॅशन टेक्नॉलॉजीचा ज्वर तर सर्वत्र आहे. क्रीडा क्षेत्रातही सुधारणा होत असून उत्पन्नाच्या दृष्टीने आणखी काही पर्याय समोर येत आहेत. याठिकाणी कौन्सिलरचा सल्ला हा मोलाचा ठरतो. 

 "