होमपेज › Editorial › महिलांना रणभूमीवर संधी

महिलांना रणभूमीवर संधी

Last Updated: Dec 18 2019 1:16AM
   - प्रा. शुभांगी कुलकर्णी

लष्करात अधिकारी म्हणून सामील होऊ इच्छिणार्‍या महिलांसाठी नवीन वर्ष मोठी संधी घेऊन येत आहे. त्यावेळी ज्या महिला अधिकार्‍यांची नेमणूक होईल, त्यांना लष्करात 54 वर्षे वयापर्यंत सेवा करण्याची संधी मिळेल. प्राचीन काळापासूनच आपल्या युद्धकौशल्याने अनेक महिलांनी युद्ध क्षेत्रात शत्रूला हतप्रभ केले आणि आपल्या दुर्दम्य साहसाची प्रचिती जगाला दिली. आजच्या आधुनिक म्हटल्या जाणार्‍या जमान्यात स्त्रियांकडे या कौशल्याचा अभाव आहे का? अजिबात नाही. मग तरीही मातृत्वाची रजा, नेतृत्वाचा प्रश्न अशी कारणे पुढे करून भेदभाव का करावा?

लष्करात अधिकारी म्हणून सामील होऊ इच्छिणार्‍या महिलांसाठी नवीन वर्ष मोठी संधी घेऊन येत आहे. त्यावेळी ज्या महिला अधिकार्‍यांची नेमणूक होईल, त्यांना लष्करात 54 वर्षे वयापर्यंत सेवा करण्याची संधी मिळेल. महिला अधिकार्‍यांच्या दहा शाखांमध्ये कायमस्वरूपी नेमणुका (कमिशन) मिळतील. एप्रिल 2020 नंतर ज्या महिला अधिकार्‍यांना लष्करात कमिशन मिळेल, त्यांना दहापैकी एका शाखेची निवड करायची आहे. त्यासाठी त्यांना तीन ते चार वर्षांचा कालावधी दिला जाईल. नंतर त्या विशिष्ट शाखेच्या क्षेत्रातील प्रशिक्षण त्यांना दिले जाईल. सशस्त्र सैन्यदलांत शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून नियुक्त झालेल्या महिला अधिकार्‍यांना त्यांच्या समकक्ष पुरुष अधिकार्‍यांप्रमाणे पारदर्शक निवड प्रक्रियेद्वारे कायमस्वरूपी कमिशन दिले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात केली होती. सध्या सैन्यदलांत शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या (एसएससी) माध्यमातून महिला अधिकार्‍यांची भरती केली जाते. एसएससीद्वारे सैन्यदलांत आलेल्या पुरुष अधिकार्‍यांना सेवेची दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर कायमस्वरूपी कमिशन दिले जाते. महिला अधिकार्‍यांसाठीही हा पर्याय उपलब्ध असतो; पण सध्या केवळ लीगल ब्रँच आणि आर्मी एज्युकेशन कोअर या शाखांमध्येच त्यांना कायमस्वरूपी कमिशन मिळते. दुसरीकडे, सर्व लढाऊ शाखा वगळून त्या शाखांना सहकार्य करणार्‍या सर्व विभागांत महिला अधिकारी एसएससीच्या माध्यमातून निवडल्या जातात. सध्या त्या सिग्नल, इंजिनिअरिंग, इंटेलिजन्स ब्रँच अशा शाखांमध्ये काम करतात. परंतु अजून त्यांना कायमस्वरूपी कमिशन दिले जात नाही.

सैन्यदलांमध्ये महिलांची हिस्सेदारी, त्यांची खूपच कमी असलेली संख्या आणि महत्त्वपूर्ण मोहिमांमध्ये त्यांना मिळणारी नगण्य भूमिका याविषयी बर्‍याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. भारतीय सैन्यदलात महिला सैनिक भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे. त्याबरोबरच लढाऊ सैनिक म्हणून करिअर करू इच्छिणार्‍या महिलांना सैन्यभरतीचे दरवाजे उघडले आहेत. अर्थात, पहिल्या टप्प्यात केवळ शंभर पदांसाठी भरती करण्यात येत आहे; परंतु प्राप्त माहितीनुसार, भविष्यात महिला जवानांची श्रेणीबद्ध प्रकारे भरती केली जाईल. गुन्हेगारी प्रकरणांचा तपास करण्यापासून लष्कराच्या संचालनात सहकार्य करण्यापर्यंत अनेक जबाबदार्‍या त्यांना देण्यात येतील. 1990 च्या दशकात महिलांनी लष्करात भरती होण्यास सुरुवात केली होती; परंतु तीन दशकांनंतरही महिलांची लष्करातील संख्या नगण्यच आहे. आपल्या सशस्त्र सैन्यदलांमधील एकूण संख्या 14 लाख असून, 65 हजार अधिकारी आहेत. एवढ्या अफाट सशस्त्र दलांमध्ये महिलांची संख्या वायुदलात 1610, लष्करात 1561 आणि नौदलात अवघी 489 इतकी आहे. वस्तुतः, आतापर्यंत महिलांना लष्करात केवळ अधिकारी म्हणूनच समाविष्ट केले जात आहे आणि त्यांची भरती वैद्यकीय, कायदेविषयक, शैक्षणिक, सिग्नल, इंजिनिअरिंग अशा क्षेत्रांमध्येच केली जाते. सैनिकांकडून होणारा नियमभंग रोखणे, शांती काळात आणि युद्ध काळात रसद सैनिकांपर्यंत पोहोचविणे, युद्ध कैद्यांवर लक्ष ठेवणे, अशी कामे त्यांना दिली जातात.

शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून निवडल्या जाणार्‍या महिला अधिकारी सैन्यदलांत 14 ते 15 वर्षे एवढीच सेवा करू शकतात. कायमस्वरूपी कमिशन मिळालेल्या अधिकारी महिलांची संख्या नगण्यच आहे. युद्ध मोहिमांचा विचार केल्यास जगातील अनेक समृद्ध देशांमध्ये महिलांचा समावेश युद्ध मोहिमांमध्ये केला जातो. अमेरिकेत तर अण्वस्त्रसज्ज क्षेपणास्त्रे असलेल्या पाणबुड्यांवरही महिलांची नियुक्ती केली जाते. मलेशिया, श्रीलंका, बांगलादेश असे देशही युद्ध मोहिमांमध्ये महिला सैनिकांना पाठवितात; परंतु आपल्याकडेच युद्ध मोहिमांपासून महिलांना दूर ठेवले जाते. आपल्या वायुदलातील महिला अधिकार्‍यांना हेलिकॉप्टर आणि मालवाहू विमाने चालविण्याचीच अनुमती दिली जाते आणि अलीकडे प्रायोगिक तत्त्वावर त्यांना लढाऊ जेट विमानाच्या उड्डाणाची परवानगी मिळू लागली आहे. भारतीय वायुदलात सध्या सुमारे शंभर महिला वैमानिक आहेत; परंतु युद्ध क्षेत्रात, पाणबुडीवर किंवा संकटग्रस्त क्षेत्रांत त्यांची नियुक्ती करण्याची कोणतीही तरतूद अद्याप नाही. परदेशांतील सैन्यदलांत असणार्‍या महिलांच्या संख्येशी भारतीय लष्करी महिलांच्या संख्येची तुलना केल्यास, या बाबतीत भारत अद्याप पिछाडीवर आहे. अर्थात, सैन्यदलांत महिलांना वीस टक्के प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि तो स्वागतार्ह आहे. चीनमध्ये सर्वाधिक अडीच लाख महिला सैनिक आहेत. त्यातील दीड लाख महिला सशस्त्र सैन्यदलांमध्ये आहेत.

अमेरिकेत 1775 पासूनच महिला सैन्यदलात सहभागी होऊ लागल्या आणि सध्या अमेरिकी सैन्यदलांत दोन लाख महिला आहेत. सुमारे चार वर्षांपूर्वी तेथील महिलांना युद्ध मोहिमांमध्ये सहभागी होण्याची परवानगीही देण्यात आली. फ्रान्समध्येही 1860 पासूनच सैन्यदलांत महिलांचा समावेश केला जाऊ लागला. इस्रायलच्या महिला सैनिक या जगातील सर्वाधिक खतरनाक महिला सैनिक मानल्या जातात. तेथे लष्करात महिला आणि पुरुष सैनिकांची संख्या जवळजवळ एकसमान आहे. रशियाच्या सैन्यदलांतही सुमारे दोन लाख महिला सैनिक आहेत. या देशांव्यतिरिक्त ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, युक्रेन, युनान, चेक गणराज्य, पोलंड, पाकिस्तान, रोमानिया आदी देशांमध्येही महिला सैन्यदलाचा भाग बनून लढाऊ आणि प्रशासकीय अशा दोन्ही जबाबदार्‍या कौशल्याने पेलत आहेत. वास्तविक, भारतीय सैन्यदलात महिलांची संख्या अत्यंत नगण्य राहण्यात आणि सैनिक म्हणून त्यांची नियुक्ती न होण्यात पुरुषी मानसिकतेचाच दोष सर्वाधिक आहे. या मानसिकतेचा अंदाज काही उच्चपदस्थ अधिकार्‍यांच्या विचारांमधूनच लावता येऊ शकतो. भारतीय सैन्यदलांत बहुतांश जवान ग्रामीण भागातून येतात आणि ते महिलांचे नेतृत्व स्वीकारण्यास तयार होणार नाहीत, असे काही उच्चपदस्थांचे म्हणणे आहे. महिलांना युद्धक्षेत्रात तैनात केले आणि त्यांनी मातृत्वाची रजा मागितली तर काय होईल, असाही मुद्दा पुढे आणला जातो. 

महिला कमांडरच्या नेतृत्वाखाली एखाद्या प्रदीर्घ मोहिमेवर सैन्याची तुकडी पाठवायची झाल्यास महिला अधिकार्‍यांची झोपण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी लागेल आणि त्यांच्यासाठी कपडे बदलण्याची जागाही तयार करावी लागेल, असे तर्क काही जण देतात. आधुनिक काळातही अशा मानसिकतेत वावरणारे पुरुष अधिकारी कदाचित विसरले असावेत की, भारताच्या इतिहासात युद्ध क्षेत्रात अनेक वीरांगनांनी पराक्रम केला आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई, कित्तूरची राणी चेन्नम्मा, चाँदबीबी, गोंडची राणी दुर्गावती, झलकारी बाई, उदादेवी पासी अशी अनेक नावे सांगता येतील. पुरुष सैनिकांनी त्यांचे नेतृत्व स्वीकारणे किंवा गर्भवती असणे अशा अडथळ्यांचा त्यांना बिलकुल सामना करावा लागला नाही. युद्धकौशल्याने अनेक महिलांनी युद्ध क्षेत्रात शत्रूला हतप्रभ केले आणि आपल्या दुर्दम्य साहसाची प्रचिती जगाला दिली. युद्धक्षेत्रात जर शत्रूपक्षाकडून महिला जवानांना कैद करण्यात आले, तर त्यांच्याशी अत्यंत क्रूर वर्तन केले जाईल, असाही एक तर्क दिला जातो. अशा अनेक तर्कांच्या आणि प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आपण अन्य देशांच्या सैन्यदलांतील महिलांच्या संख्येकडे पाहिल्यास तेथे मात्र महिलांचे मोठे संख्याबळ दिसते. अमेरिकेत तर महिलांना युद्धभूमीवर थेट पाठविले जाते. काही महिला शहीद होतात तर अनेक महिलांना युद्धकैदी म्हणून पकडलेही जाते; परंतु तेथे अशा प्रकारची मानसिकता किंवा तर्कवितर्क दिसत नाहीत. वास्तविक, भारताला एक आधुनिक राष्ट्र म्हणून विकसित करताना आपल्याला महिलांकडे पाहण्याचा जुनाट दृष्टिकोन आता बदलावाच लागेल. महिलांना युद्धभूमीवर पराक्रम गाजविण्याची संधी आता तरी द्यावीच लागेल.