Mon, Sep 21, 2020 18:01होमपेज › Crime Diary › लैंगिक गुन्ह्यांचा भोवरा

लैंगिक गुन्ह्यांचा भोवरा

Last Updated: Feb 04 2020 8:28PM
माधव गवाणकर

वाईट संगतीमुळे, व्यसनांमुळे, उपजत विकृतीमुळे एखाद्या भोवर्‍यात व्यक्ती सापडावी तशी लैंगिक वासनांच्या  भोवर्‍यात म्हणा, जाळ्यात म्हणा आजची तरुण पिढी अडकलेली आहे. द़ृश्य माध्यमे सातत्याने युवकांना लैंगिक उत्तेजना देणारी नृत्यं, चित्रफिती, छायाचित्रं, भडक प्रसंग दाखवत आली. मुळात उष्ण वातावरणात लैंगिक वासना जास्त चाळवते. त्यात हा विकृत भडिमार. त्यामुळे मिळेल त्या मार्गाने वासनाशमन करण्याचा प्रयत्न कुमारवयातच सुरू होतो. अजाण मुली, अल्पवयीन विद्यार्थिनी हे कॉलेजकुमारांचं भक्ष किंवा शिकार बनू शकते. संधी आल्यास हा अत्याचार सामूहिक असू शकतो.

‘आयटम’, ‘पिस’ अशा शब्दांतूनही मुलींची लैंगिक अप्रतिष्ठाच केली जाते. स्वरक्षणाच्या प्रशिक्षणाबरोबरच स्वतःचा एक ‘पाठिंबा गट’ तयार करणे हा त्यावर एक योग्य उपाय म्हणता येईल. एकमेकींच्या ‘संपर्कात’ राहण्याचा हा काळ आहे. पोलिस तर मदतीला आहेतच. घटना जेव्हा किरकोळ असते, घटनेची सुरुवात असते तेव्हा मात्र पोलिसांचा वेळ घेऊ नये. तुम्हाला एक गट तयार ठेवून प्रकरण निस्तारता आले पाहिजे.

प्रौढ, जबाबदारी(!) व्यक्ती आपल्या हाताखालील महिलेचा/मुलीचा लैंगिक छळ करते, तेव्हा ते प्रकरण जास्तच गंभीर बनते. तो त्या विकृत माणसाच्या पदाचा गैरवापर असतो. अधिकाराचा माज असू शकतो. ‘पेजेला देणार तो शेजेला घेणार’ अशी एक म्हण आहे. पण तसा छळ, शोषणही सहन करता कामा नये. त्याची ‘तक्रार’ व्हावी! अर्थात लेखी. लैंगिक प्रकरणात दिलेल्या ‘धमक्या’सुद्धा रेकॉर्ड करणे अत्यावश्यक असते.

शारीरिक आकर्षणाला प्रिय समजून ते केले जाते. तेव्हा अपयश आल्यास त्यातूनही धमकीबाजी, सूड घेण्यासाठी काही अतिरेकी प्रकार घडू शकतो. ‘समुपदेशन केंद्रां’ची गरज आज महाविद्यालयीन पातळीवरही आहेच. आत्महत्या हा गुन्हा ठरत असल्यामुळे प्रेमप्रकरणातील छळांमुळेही मुलगी आत्मघात करून घेऊ शकते. प्रियकराऐवजी दुसर्‍या माणसाशी सक्तीने विवाह ठरवल्यास/झाल्यास ‘बेपत्ता’ होणार्‍या मुली आहेत. वैवाहिक एकनिष्ठता नसल्यामुळे अनैतिक संबंधातून झालेल्या हत्या तर किती तरी! कधी पतीचा काटा काढला जातो, तर कधी प्रियकराची ‘सुपारी’ दिली जाऊ शकते. खुनापर्यंत मजल गाठणारे, कामवासनेच्या या भोवर्‍यात सापडलेले स्त्री-पुरुष आपली विवेकबुद्धी गमावून बसतात. भय, लज्जा गमावतात. ‘पाप-पुण्य’ समजा भावनिक, काल्पनिक मानले तरी कायदाकानून आहेच की!

कलम 377 मधून एल.जी.बी.टी. समाजाला मुक्त करून ते ‘गुन्हेगार’ नाहीत, असे न्यायालयीन संकेत निर्णयरूपात जरी मिळाले तरी अठरा वर्षांखालील मुलाला/मुलीला समलैंगिकतेत गुंतवणे हा गुन्हाच आहे व या शोषणात/सक्तीत ‘पॉक्सो’ हा कायदा लागू करून दीर्घमुदतीची शिक्षा होऊ शकते. प्रौढ व्यक्तींच्या संदर्भातही अत्याचार, रँगिंग हा गुन्हाच आहे. आक्रमक स्त्रीकडून तरुणांचे लैंगिक शोषण ही घटनाही अशक्य नाही. ‘निम्फोमॅनिया’ या मनोविकारात त्या विशिष्ट स्त्रीचे लैंगिक समाधानच होत नाही. त्यामुळे ती अस्वस्थ व अनिर्बंध होत जाते. तिच्या कचाट्यात एखादा देखणा किंवा सुद़ृढ मुलगाही सापडू शकतो.

लैंगिक क्रियांबद्दल न्यूनगंड, भयगंड, आत्मविश्वासाचा अभाव, प्रत्यक्ष व्यंगदोष असलेली व्यक्तीही बलात्काराचा हिंस्र प्रयत्न करू शकते. हे अभ्यासक अ‍ॅबनॉर्मल सायकॉलॉजीत गुन्हेगारीचे मनोविश्लेषण करताना सांगतातच.

धार्मिक श्रद्धा व संस्कार, घरातील मनमोकळे, शुद्ध वातावरण, पालकांचे चांगले चारित्र्य, उत्तम छंद व कौशल्य यात व्यग्र असणे याचा सकारात्मक परिणाम वर्तनावर होतो. असे युवक गुन्हेगारीकडे न जाता रूळावर राहतात. तरीही ‘सोशल मीडिया’वर काही अधिक कायदेशीर निर्बंध असणे फायदेशीर ठरेल. इंटरनेट हे कोवळ्या, अविचारी वयातील ‘खेळणे’ ठरता कामा नये, यावर तुमचे मत तुम्ही मांडा.

‘सातच्या आत घरात’ हा नियम मुलींइतकाच मुलांनाही लागू करावा. विद्यार्थ्यांचे रात्री घराबाहेर काय काम आहे? ‘लैंगिक शिक्षण’ थेट शाळांमधून देण्यापेक्षा इतर माध्यमांतून पण सातत्याने दिले जाते. लैंगिक भोवर्‍यात न सापडता योग्य वयात विवाह करून सेटल होऊन प्रस्थापित व्हावे हे उत्तम!

 "