Tue, Sep 22, 2020 06:00होमपेज › Crime Diary › पारायण

पारायण

Last Updated: Jun 02 2020 9:59PM
पोलिसांनी बुवांच्या बायको-मुलांना पोलिस ठाण्याला आणले.  चांगलेच दमात घेतले. बाबाला पाहताच मुले विरहाने रडू लागली. तसे हवालदाराने त्यातल्या मोठ्या मुलाच्या पाठीत रपाटा घातला. ते सज्ञान होते; पण रपाटा बसला तसे ते पोर तळमळत खाली बसले. ही मात्रा लागू पडली...

झुंजूमुुंजू झाले, तसा नाना उठला. सूर्य ढगाआडून बाहेर येत होता. सोनेरी किरणे धरणी व्यापत होती. आठ दिवस भागवत सप्ताह सुरू होता. नानाला रात्री बारा ते तीन वाजेपर्यंत विणापाळी होती. कालच सप्ताह संपला होता. आज नानाला तांबडे फुटायला रानात जायची घाई झाली होती. त्याने थंड पाण्याने तोंड खंगाळले.  म्हातारीने दिलेला चहा घटाघटा पिऊन नाना बाहेर पडला.  ‘आठ दिवसात पाखरांनी काय जोंधळ्याची दैना केलीया कोण जाणे?’ असे म्हणत नाना डोंगराजवळ आला. पाखरांचा किलबिलाट ऐकू आला, तशी गोफणीत दगडं घालून त्याने गोफण फिरवली. त्याबरोबर पाखरांचा थवा उडून डोंगरात शिरला.
पाखरांनी नानाच्या जोधळ्याची भरड पाडली होती.  कणसं बघून नाना हळहळला.  ‘पांडुरंगाची कृपा’ म्हणून नाना शेतातल्या माळ्यावर चढून जोंधळ्याची राखण करू लागला.  ‘काय महाराजांचं कीर्तन, मधुर वाणी...’ असे म्हणत नाना  ‘कांदा मुळा भाजी। अवघी विठाई माझी॥’ हा  अभंग गुणगुणायला लागला. शेजारच्या गावच्या मंदिरातून स्पीकरवर छानच अभंग ऐकू येत होते. नानाचे कुटुंब तसे धार्मिक वृत्तीचे! आठ दिवस सगळे कुटुंबच भागवत सप्ताहात रंगले होते.
सूर्य आता तापत होता. नानाच्या पोटात कावळे ओरडायला लागले होते. पाखरे जोंधळ्याच्या शिवारातून दूर उडून गेली होती.  मग शेजारच्या रानात असलेल्या पांडबाला हाक दिली. मग दोघेही गावाकडे निघाले. थोडे अंतर गेले असतील, तेवढ्यात नानाची म्हातारी वाटेत झपाट्याने येताना दिसली. ती धापा टाकतच नानासमोर आली. ‘अहो, घोळ झालाय, चला घरला लवकर.’ 
‘अगं पर झालंय काय?’ मुंडाशाने घाम पुसतच नानाने विचारले.
‘अहो, सूनबाई रात्रीपासून गायब झालीया.’ नानाला आणखी घाम फुटला.
‘कुठं गेली असंल पोर?’ असे म्हणत तिघेही झपाट्याने गावाकडे निघाले. 
ऊन आता बरेच वर आले होते. तिघेही घरात आले. माणसांनी नानाचे घर भरून गेले होते. गावचे पोलिसपाटीलही आले. ‘भागवत सप्ताह झाला अन् हे काय इक्रीत घडलं’ म्हणून जो तो चर्चा करू लागला होता. नानाची नात ‘आई...’ म्हणून सारखी रडत होती. पाच वर्षांची चिमुरडी रडून बेजार झाली होती. तसा पांडबा पुढे होऊन म्हणाला,
‘नाना, थांबून चालणार न्हाय. शोधायला पायजे. गावाजवळली विहिरी-तलाव पालथी घालूया.’
 तसा त्याचा विचार सगळ्यांना पटला. लागलीच तरुणांनी विहिरींमध्ये गळ टाकून,  पाण्यात बुड्या मारून शोध सुरू केला.                                                 (पूर्वार्ध)

 "