आणखी एक पालखी

Last Updated: Nov 06 2019 1:57AM
Responsive image


ज्ञानेश्‍वर म. कुलकर्णी

जत्रेचे दिवस जवळ येऊ लागले होते. त्यामुळे गावात सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. यावर्षी पीकपाणी चांगले होते. शेतात डोलणारी हिरवीगार पिके पाहून शेतकरी खूश झाले होते. यावर्षाची जत्रा भव्य होणार होती. जत्रेत पंचक्रोशीतील लोक सहभागी होत असत. गावाच्या पटांगणावर मिठाईची, खेळण्यांची, कपड्यांची दुकाने मांडण्याची तयारी सुरू झाली होती. जत्रेत पाळणे येणार होते. त्याचीसुद्धा तयारी सुरू होती. सदा म्हणाला,
“ म्हादा, जत्रा गाजणार बघ आता. तयारी तरी बघ.”
“ सदा, जत्रेपरास पालखी गाजतीया बघ. जत्रेच्या अगोदर देवाची पालखी उचलण्याचा तिढा हाय. पाटलांची भाऊबंदकी तुला ठावं हाय. हंबीररावास्नी मान मिळतूया का भिकाजीरावास्नी मिळवूया देवास ठावं.” सदा गप्प बसला. पालखीवरून गावात वाद होत होते. वाद मिटवण्यासाठी गावपंचायत बोलावली होती. पंचांनी भिकाजीला पालखीचा मान दिला होता. हंबीरावांना हा अपमान वाटला होता.
देवाची पालखी भिकाजीने उचलली.त्यांच्या पोरांनी, दोस्तानी लाल फेटे बांधले. धनगरांनी जोरजोरांनी ढोल बडविले. गावभर पालखी फिरवली. हंबीररावांच्या वाड्यासमोर फटाके उडवण्यात आले होते. त्यानंर गावची जत्रा मोठ्या थाटात पार पडली होती.

आज भिकाजी खूश होता. दिवस मावळताना दिवसभराचे काम उकरून त्याच्या शेताच्या बांधारून आपल्या हिरव्यागार ऊस पिकाकडे पाहत तो आनंदाने घराकडे निघाला होता. आणि अचानक ऊसपिकात लपून बसलेले ते दोघे बाहेर आले. त्यांनी बेसावध भिकाजीच्या डोक्यावर काठ्या हाणल्या आणि भिकाजी खाली कोसळला.
   बांधावरून भिकाजीच्या मागून येणार्‍या विठूने हे पाहिले आणि तो ओरडत गावाकडे पळाला.  पारावर बसलेल्या नारूंनी त्याला थांबवले आणि विचारले,
“आरं झालं तरी काय? भूत बघितलंस काय?” 
“पाटील, घात झाला. भिकाजीरावांना आडवं केलंय कुणीतरी. ”
भिकाजीच्या शेत बांधावर सारे गाव जमले होते. पोलिसांना खबर मिळताच ते आले आणि त्यांनी पंचनामा उरकला. आता खुनाची चौकशी सुरू झाली होती.

इन्स्पेक्टर मोहिते आणि इन्स्पेक्टर चव्हाण ही हुशार जोडगोळी खुनाचा तपास करीत होती. गावकर्‍यांकडे चौकशी सुरू होती. चावडीसमोर बसलेले लोक कातावर हात ठेवत होते. नामा पुढे आला आणि म्हणाला, 
“मोहितेसाहेब, पालखी कुणी आणायची हा वाद कायमचाच होता. हा मान भिकाजींना मिळाला. त्यांनी  गावपंचायत बोलावली होती. अपमान झाला हंबीररावांचा. आता पुढचं तुम्ही बघा.”
“हे काम हंबीररावांच काय?”
“छ्या: छ्या: तो देवमाणूस खून कसा करेल?” 
सगळ्या गावकर्‍यांनी हंबीररावाची स्तुती केली होती. इन्स्पेक्टर चव्हाण म्हणाले,

“मोहितेसाहेब, हंबीररावाबद्दल कोणीच वाकडं बोलत नाही. हंबीररावांचा धाकटा भाऊ... परसू, तो भडक डोक्याचा आहे. त्या दोन भावात शेताच्या वाटणीवरून वाद सुरू आहे. त्याचे हे काम असावे.”
“चव्हाण, तसे असते तर त्याने हंबीररावाचा खून केला असता. तो भिकाजीचा खून  कशाला करेल?”
“हंबीररावर संशय जावा. त्यांना त्रास व्हावा या हेतूने तर नसेल?”
“पाँईट आहे, बघू या चौकशी करून.”
परसूची चौकशी केली. त्याला उलट सुलट प्रश्‍न विचारले पण हाती काहीच लागले नाही. तो म्हणाला,
“मी कशाला मारू हंबीररावाला?      आता भिकाजीचा पोरगा करेल माझं काम. त्यो न्हाई गप्प बसायचा. त्यो करणार हंबीररावाला आडवा.”
भिकाजीचा मुलगा दुःखात होता. त्याच्या बोलण्यातून, वागण्यातून काहीच शंका आली नाही. भिकाजीचा खुनी फरार होता. पोलिसांच्या प्रयत्नांना यश येत नव्हते. पोलिसांनी पुन्हा हंबीररावांना गाठले. पुन्हा त्यांची चौकशी सुरू केली. तेव्हा ते म्हणाले,
“इन्स्पेक्टरसाहेब, भिकाजी गाव पंचायतीकडे गेला. पालखीचा मान त्याला मिळाला याचं दुःख नाही वाटलं आम्हाला, पण त्याने आमच्या वाड्यापुढे येऊन ढोल बडविले, नंगानाच केला, फटाके वाजवून गुलाल उधळला. हा आमचा अपमान नको होता करायला.”
“आणि म्हणूनच तुम्ही आणि तुमच्या मुलाने-राजूने भिकाजीचा काटा काढला.”

“असा थेट आरोप नका करू. माझ्याविषयी गावात कोणालाही विचारा आणि काय पुरावा आहे हो तुमच्याकडे? मी सगळा अपमान गिळलाय. भिकाजीला मारण्याचा विचारसुद्धा केला मी. गुन्हा केला असता तर मी स्वतः कबुली दिली असती.”
“तुमच्या राजूचे हे काम असेल का?”
“तो आजारी होता. दवाखान्यात अ‍ॅडमिट होता. तालुक्याच्या डॉक्टर चौगुलेंना विचारा.”
तेवढ्यात राजू तेथे आला. त्याची चौकशी केली. इन्स्पेकटर चव्हाण म्हणाले, “असा अचानक कसा अ‍ॅडमिट झालास दवाखान्यात?”
“साहेब, आजार का वेळ सांगून येतो? जत्रेत नाचलो होतो. त्यात पावसात भिजलो. पडलो आजारी.”
“तू त्या दिवशी सायंकाळी होतास कुठे?”
“डॉ. चौगुलेंच्या दवाखान्यात अ‍ॅडमिट होतो. दोन दिवस तेथेच मुक्काम होता. डॉक्टरांना विचारा. कारणाशिवाय आळ घेऊ नका.”

इन्स्पेक्टर मोहिते आणि इन्स्पेक्टर चव्हाण यांना गप्प बसणे भाग पडले. त्यांनी डॉ. चौगुले यांची भेट घेऊन रेकॉर्ड तपासले. राजू दोन दिवस तेथे अ‍ॅडमिट असल्याचे स्पष्ट झाले. हताश होऊन इन्स्पेक्टर मोहिते आणि इन्स्पेक्टर चव्हाण परत फिरले होते.
“आता कुठं शोधायचं खुनी माणसाला? खुनाचं कारण तरी नक्की काय असावं? वाटणीचा वाद हे कारण असावं की पालखीचा मान हे कारण असावं?”
“ चव्हाण, मला वाटतं पालखीचा मान हेच कारण असावं.”
“पण हंबीरराव आणि राजू यांच्याविरुद्ध काहीच पुरावा नाही. तसे ते दोघे निर्दोष वाटतात.”
“चला, पुन्हा गावी जाऊ. पुन्हा चौकशी करू.”
इन्स्पेक्टर मोहिते आणि चव्हाण पुन्हा गावी आले. पुन्हा चौकशी सुरू झाली होती.

सर्वांची चौकशी करून कंटाळून ते भिकाजीच्या मळ्यात आले होते. तेथूनच ते तालुक्याला परत जाणार होते. तेथील शेतातील बांधावर बसून गप्पा मारीत असताना भिकाजीच्या शेतावर काम करणार्‍या मजुरांना त्यांनी बोलावले. त्यांच्याकडे सहज चौकशी केली तेव्हा हणमंता नावाचा एक मजूर गडबडला ते मोहितेच्या लक्षात आले. ते म्हणाले,
“मग काय हणमंता, यात्रा जोरात झाली म्हणायची?”
“व्हय साहेब, आमचं मालक भिकाजीराव लई चांगला माणूस व्हता.”
“कुणी मारलं असेल त्यांना?”
“काय ठावं? मी तर काय सांगणार साहेब.”
“तुला राजू कधी दिसला होता का त्या दिवशी मळ्यात?”
“ त्यो त्या दिवशी नव्हता दिसला पण त्याच्या अगुदर जत्रंच्या बी अगुदर त्याच्या मळ्यात भेटला हुता.”
“काय म्हणाला तुला?”
“मी म्हटलं, आता पालखी उठली की जत्रा जोमात हुणार.”
“मग तो काय म्हणाला.”
“काय म्हणणार?”
“तरीपण कायतरी म्हणाला असलंच की.”
“व्हय, जाता जाता म्हणाला, जत्रा झाल्यावर आणि एक पालखी उठतीया बघ.”

हे ऐकताच मोहितेंच्या डोक्यात प्रकाश पडला. ते थेट हंबीररावांच्या वाड्यावर आले आणि त्यांनी राजूच्या हातात बेड्या ठोकल्या. पोलिस स्टेशनमध्ये आणून प्रसाद दिल्यावर राजूने गुन्हा कबूल केला. तो म्हणाला, 
“होय, मी आणि माझा दोस्त सर्जानं मारलंय भिकाजीला.”
“पण तू तर अ‍ॅडमिट होतास ना?”
“आजारपणाचं ते नाटक होतं. मी दवाखान्यातच होतो. सारं काही मी ठरवलं होतं. सर्जाने आणि बिरूने पैशाच्या लोभाने हे काम केलं होतं. पालखीचा मान आमच्या बाबांचा होता, पण भिकाजी गावपंचायतीकडं गेला. मान त्याला मिळाला. आमचा अपमान त्या सगळ्यांनी केला म्हणून आम्ही त्याचा काटा काढला.”
राजू, सर्जाला आणि बिरूला पोलिसांनी पकडून त्यांची रवानगी तुरुंगात केली.