होमपेज › Crime Diary › चकवा

चकवा

Last Updated: Jan 22 2020 2:20AM
ज्ञानेश्‍वर म. कुलकर्णी, कोल्हापूर

इन्स्पेक्टर मोहितेंनी विचारले, “कोण तो? पटकन सांग पप्पू.” “तोच तो खुनी सापडत नसेल तर फाईल बंद करा म्हणणारा”
खेड्यातून शहरात शिक्षणासाठी आलेले ते सर्वजण होते. बबन आणि बाळू एका गावातील होते. त्यांनी भाड्याने खोली घ्यावयाचे ठरवले. खोली मिळाली; पण त्याचे भाडे दोघांना परवडण्यासारखे नव्हते. मग, त्यांनी आणखी पार्टनर शोधायला सुरुवात केली. त्यांना शेजारच्या कॉलेजमधील तिघे मिळाले. त्यांनासुद्धा स्वस्तात राहण्यास खोली पाहिजे होती. रमेश, सदाशिव आणि विलास यांची तोंडओळख होती. आता हे पाचजण रूमपार्टनर झाले होते. सहा महिने सारे काही सुरळीत चालू होते. कोणाचेही पालक आले, तरी सर्वजण त्यांचा आदर करीत होेते. त्यांची राहण्याची सोय करीत होते.

हे सारे व्यवस्थित सुरू असताना एके दिवशी चमत्कारिक घटना घडली. त्या दिवशी बबनचे आई-वडील आले होते. बबनची बहीण राधा होती. तिचे लग्‍न ठरले होते. दागिन्यांची खरेदी झाली होती. दोन लाख रुपयांचे दागिने त्यांनी खरेदी केले होते. ते दागिने खोलीमधील कपाटात ठेवून कपाटाला कुलूप लावून कपडे खरेदीसाठी ते बाहेर पडले होते. त्यांच्याबरोबर मदतीसाठी बबन आणि बाहू होते. त्या सर्वांनी थोडीफार खरेदी केली. नंतर जेवणासाठी ते एका हॉटेलात गेले. पोटभर जेवण झाल्यावर पुन्हा खरेदीसाठी ते बाहेर पडले. बराच वेळ त्यांची खरेदी सुरू होती. उन्हात हिंडल्यामुळे बाळूचे डोके दुखू लागले होते. एका कापड दुकानात खरेदी केलेल्या कापडावर लक्ष ठेवायला बाळूला सांगितले. त्याला डोकेदुखीवरील गोळी देऊन बबन उरलेली खरेदी करण्यास बाहेर पडला. बाळूला थोडावेळ विश्रांती घेण्यास त्याने सांगितले हेाते. अर्धा तासाने ते तिघे परत आले तेव्हा बाळू ढाराढूर झोपलेला होता. त्यांनी त्याला उठवले आणि खरेदी केलेला सर्व माल घेऊन ते खोलीवर परतले. तेथे आल्यावर त्यांना आश्‍चर्याचा धक्‍काच बसला. एक विपरीत घटना घडली होती. त्यांच्या खोलीत विलासचा खून झाला होता. पोलिस आले होते. पंचनामा सुरू होता. अचानक घडलेल्या घटनेमुळे सारेजण चकीत झाले होते.

इन्स्पेक्टर देसाई आणि इन्स्पेक्टर मोहिते यांच्याकडे या खुनाच्या तपासाची कामगिरी सोपवण्यात आली होती. त्या दोघांनी खोलीतील सर्वाकडे विचारपूस केली. शेजारी असलेल्या लोकांकडेसुद्धा चौकशी केली. परंतु, हाती काही लागले नव्हते.
तेवढ्यात बबनचे वडील पोलिस ठाण्यामध्ये आले आणि म्हणाले, “इन्स्पेक्टर साहेब माझे दोन लाखांचे दागिने आणि पन्‍नास हजार रुपये चोरीला गेले आहेत.”
इन्स्पेक्टर मोहितेंनी विचारले.
“कोठे ठेवले होेते पैसे आणि दागिने?”
“खोलीतील कपाटात ठेवले होते. मी कपाटाला कुलूप लावले होते. किल्‍ली माझ्याकडेच होती.”
“अहोपण आम्ही तपास केला तेव्हा त्या कपाटाला कुलूप लावलेलेच होते.”
“तुम्ही गेल्यानंतर रात्री मी कुलूप काढले. कपाट उघडले तेव्हा चोरी झाल्याचे कळले.”
“ठीक आहे आम्ही तपास करतो त्याचा.”
“साहेब माझ्या मुलीचे लग्‍न आहे. दागिने, पैसे परत मिळाले नाही, तर अडचण होईल.”
“आम्ही शोध घेतो. त्या विलासचा खुनीसुद्धा आम्ही शोधतो आहोत.”
“साहेब तो खुनीच चोर असावा.”
“तोच विचावर मी करतो आहे. त्याला आम्ही नक्‍की शोधून काढू.”
ते गेल्यावर देसाई म्हणाले.
“याचा अर्थ चोरानेच खून केला असावा; पण खून करण्याचे कारण काय? विलास गुणी मुलगा असल्याचे सगळे सांगत आहेत.”
“कदाचित विलासचे प्रेमप्रकरण असावे.”
“तसे काहीच नाही साहेब. मी ती चौकशी केली आहे.”
“विलासने चोराला पाहिले असावे. विरोध केला असावा. म्हणून त्याचा खून झाला असावा.”
“ती शक्यता आहे साहेब.”
“मग, त्या दिशेने तपास करू या.”

“साहेब त्या रमेश, सदाशिव यांची चौकशी केली. ते दोघे कॉलेजातच होते. त्यांच्यावर संशय घेण्याचे कारण नाही. विलासचा खून झालाय. बबन आणि बाळू बबनच्या आई-वडिलाबरोबर मार्केटला गेले होते. आणखी कोणाची चौकशी करायची?”
“देसाई शेजारी चौकशी पुन्हा करा. त्या रस्त्याला आपण पुन्हा हिंडूया. काहीतरी धागा मिळेल.”
इन्स्पेक्टर मोहिते आणि इन्स्पेक्टर देसाई पुन्हा तपास करू लागले होते. त्यांनी रस्त्यावरील हॉटेलात, दुकानात आणि शेजारी पुन्हा चौकशीस सुरुवात केली होती. काहीच हाती लागत नव्हते. बबन आणि बाळू पोलिसांच्या बरोबर हिंडत होते. त्यांना मदत करीत होते.
सायंकाळच्या वेळी पुन्हा इन्स्पेक्टर देसाई आणि इन्स्पेक्टर मोहिते चौकशीसाठी बाहेर पडले होते. ते एका पानपट्टीच्या दुकानात आले. दुकानदाराने विचारले, “साहेब का घिरट्या घालताय?”
“अरे समोरच्या खोलीत राहणार्‍या एका तरुणाचा खून झालाय. तपास सुरू आहे. गेल्या सोमवारची घटना आहे. तुला काय माहिती असली तर सांग.”

“साहेब मी माझ्या धंद्यात गुंतलो होतो. काय सांगणार? त्या पाच दोस्तांना जाता येताना बघत होतो मी. ते पान खात नव्हते की तंबाखू खात नव्हते. सिगारेटसुद्धा ओढत नव्हते. माझ्या दुकानात ते कशाला येतात?”
“त्या दिवशी काहीच गडबड दिसली नाही रस्त्यावर?”
काहीसे आठवून तो म्हणाला.
“साहेब त्यांच्यातला एकजण घाईत होता. ‘रिक्षाऽऽ रिक्षा’ असे ओरडत इकडे तिकडे पळत होता.”
“कोण होता तो?”
“त्याचे नाव मला काय ठाऊक”
“पुढे काय झाले?”
“त्याने एक रिक्षा थांबवली आणि रिक्षातून निघून गेला.”
“त्याच्या हातात बॅग होती.”
“नव्हती. पण खांद्याला सॅक अडकवली हेाती.” “तुझे नाव काय?”
“पप्पू पानवाला म्हणतात मला.”
“पप्पू तू आम्हाला मदत कर. तुला बक्षीस देऊ.”
“बक्षिसाची हाव नाही मला; पण खुनी सापडू दे.”
“मी संशयितांचे फोटो दाखवतो. तू त्याला ओळखून दाखव.”
“होय साहेब”.

दोन तासांनी संशयिताचे फोटो घेऊन इन्स्पेक्टर देसाई आणि मोहिते तेथे आले. सर्व फोटो दाखविले; पण पप्पूने नकारार्थी मान हालवली. तेवढ्यात बबन आणि बाळू तेथे आले. बबनने विचारले. “साहेब लागला की तपास.” इन्स्पेक्टर मोहिते म्हणाले, “शोध सुरू आहे.”
बाळू रागाने म्हणाला.
“साहेब खुनाची केस आहे. खुनी सापडत नसेल तर फाईल बंद करून टाका.”
ते दोघे निघून गेल्यावर पप्पूने विचारले,
“साहेब हे दोघे कोण?”
“त्याच खोलीत राहणारे पार्टनर.”
“साहेब अहो त्या दोघातला एकजण त्या दिवशी घाई घाईने धावत होता.”
“कोण तो? पटकन सांग पप्पू.”
“तोच तो ‘खुनी सापडत  नसेल तर फाईल बंद करा’ म्हणणारा.”
इन्स्पेक्टर देसाई म्हणाले.
“तो तर बाळू. तो तर खरेदीला बाहेर पडला होता. तो कसा असेल.”
“देसाई, तोच असणार. घेऊ या ताब्यात त्याला.”दोघांनी बाळून ताब्यात घेतले. पोलिसांनी प्रसाद दिल्यावर त्याने कबुली दिली. तो म्हणाला,
“होय साहेब, मीच चोरी केली. मीच विलासचा खून केला. मी डोके दुखत असल्याचे नाटक केले. ते सगळे जाताच मी रिक्षा करून खोलीवर आलो. डुप्लीकेट किल्‍लीने कुलूप काढून सोने आणि पैसे सॅकमध्ये घालून बाहेर पडलो; पण तेवढ्यात तेथे विलास आला होता. त्याने मला अडवले म्हणून मी चाकूने त्याचा खून केला आणि पळालो.”
“आता तुरुंगात खडी फोड. चकवा देण्याचा प्रयत्न केलास पण फसलास.” इन्स्पे. मोहितेंनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या.