होमपेज › Crime Diary › वास आणि तपास

वास आणि तपास

Last Updated: Dec 04 2019 1:11AM
मारुती वि. पाटील, कोल्हापूर

‘साहेब, माझा भाऊ बेपत्ता होऊन आता महिना होत आला. काही पत्ता लागला का? आम्हीही त्याचा शोध घेतोय, पण काहीच शोध लागत नाही. साहेब, त्याची बायको सुमित्रा कोणालाच घरी येऊ देत नाहीय. दारातून हाकलून लावतेय. घरातून कसलातरी वास येतोय. मला शंका वाटतेय. साहेब, जरा माझ्या भावाच्याच घरात तपास करून बघा. खूप मेहेरबानी होईल साहेब.’ मोहनचा मोठा भाऊ माधव इन्स्पेक्टर चव्हाण यांना विनवणी करत होता...

‘ सुमित्रा, मला थोडे बोलायचे आहे? तू आवरून बस. कुठेतरी फिरायला जाऊ. मी आवरून लवकर घरी यायचा प्रयत्न करतो. बाय.’ म्हणून मोहनने फोन कट केला. मोहन मिश्रा. वय वर्षे 40. पेशाने वकील. व्यवसायावर चांगलाच जम बसवला होता. घरात सुमित्रासारखी सुस्वरूप पत्नी होती. घरी सुबत्ता होती. आई-वडील, मोठा  भाऊ गावी शेती करायचे. येऊन-जाऊन असायचे. मोहन आणि सुमित्रा यांनी नवा फ्लॅट बुक केला होता. दोन महिन्यांत त्याचा ताबा मिळणार होता म्हणून एका उपनगरात जरा जुन्या पठडीतील एका घरात ते भाड्याने राहत होते. घर जरा आडवळणी होते. पण कुठे इथे आयुष्य काढायचेय म्हणून त्यांनी आवश्यक गोष्टींची तजवीज करून नित्यक्रम चालूच ठेवला होता. सगळ्या सुखवस्तू कमीअधिक प्रमाणात पायाशी होत्या. पण सुखी संसाराच्या वेलीवर अजून फूल उमलले नव्हते. गेली दोन वर्षे त्यांनी दवाखान्यात उपचारासाठी बराच पैसा खर्च केला होता. पण अजून यश आले नव्हते. डॉ. सुगंधा पुराणीक वेळोवेळी या दाम्पत्याला धीर देत होत्या. पण का कुणास ठाऊक, मोहनचा आता स्वत:वरचा ताबा सुटू लागला होता.  

रात्रीचं जागणं, मित्रांबरोबर बर्‍याचदा पार्ट्यांमध्ये पिणे हे अलिकडे वाढले होते. त्यावरून सुमित्राशी वादावादी व्हायची. पण मोहन मिश्रांनी स्वत:ला सावरायचं ठरवलं. म्हणूनच आज बायकोची माफी मागून आजपासून पिणे सोडायचे आणि कुटुंबावर लक्ष द्यायचे, असा विचार करत ते ऑफिस आवरून घरी गेले.
दारावरची बेल वाजली. सुमित्राने दार उघडले. ‘तुम्ही आलात? पण...पण तुम्ही तर...’ 
‘अगं आत तर येऊ दे? मी तुला फोन केला होता ना... आपण बाहेर जाऊया म्हणून. तू आवर लवकर, मी फ्रेश होतो तोवर. बाहेर जाऊ.’ 
‘ठीक आहे. चहा करते. आवरा तोवर.’ म्हणून ती स्वयंपाकघरात गेली. 

मोहनला का कुणास ठाऊक कसलातरी बदल घरात जाणवला. पण आज आपला मूड चांगला असल्याने त्याने दुर्लक्ष करत आपले कपडे बदलले. फ्रेश होत तो पुढच्या खोलीत आला. पण सुमित्रा दिसत नव्हती. गॅसवर चहा करपलेला वास सुटला होता. त्याला काहीच कळेना. गॅस बंद करावा म्हणून तो स्वयंपाक घरात आला. चहा जळाला होता  पण गॅस चालूच होता. त्याने गॅस बंद केला आणि वळणार तोच कसल्यातरी दोरीचा फास त्याच्या गळ्याला पडला. काही कळायच्या आत तो तोल जाऊन जमिनीवर पडला. कुणीतरी मागून घट्ट हातांनी  त्याच्या गळ्याभोवती दोरीचा फास टाकून ताकदीने आवळत होते. त्याने धडपड केली. तेवढ्यात त्याला सुमित्रा समोर दिसली. पण ती शांतपणे उभी होती. त्याच्या डोळ्यांभोवती अंधारी येत होती. त्याने तिला मदतीसाठी हाक मारण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या तोंडून आवाजच फुटत नव्हता. शेवटी त्याची हालचाल हळूहळू बंद झाली. सुमित्राने मग ‘त्या’ला खड्डा खणायचे साहित्य आणून दिले. तास दोन तासांनी स्वयंपाक घरातच खड्डा खणून मोहनचा मृतदेह पुरला गेला. उरलेली माती तिने बाहेर रिकाम्या जागेत टाकली आणि सगळे काम संपल्यानंतर ‘त्या’ला ठरलेली रक्कम दिली. तो निघून गेला. मग काही घडलेच नाही, अशा मन:स्थतीत ती आपल्या झोपण्याच्या खोलीत गेली. 

दुसर्‍या दिवशी दुपारी सुमित्राने आपला पती मोहन मिश्रा कालपासून बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली. तशी वृत्तपत्रातही जाहिरात दिली. मग तपास सुरू झाला. त्याचा मोबाईल बंद होता. सगळ्या पै - पाहुण्यांकडे, आप्तेष्ठांकडे, मित्रांकडे चौकशी केली. पण काहीही ठोस हाती लागत नव्हते. दरम्यान, मोहनचा भाऊ माधव आईवडिलांसह त्या ठिकाणी आला. त्यांना आपल्या दारात पाहिले आणि अचानक सुमित्राने आपला पवित्रा बदलला. तिने सरळ त्यांना ‘तुमच्यामुळे माझा पती घर सोडून गेला.’ म्हणत घराबाहेर काढले. त्यांना सुरुवातीला काहीच कळेना. पण माधवने त्यांना समजावत सरळ पोलिस ठाणे गाठले आणि मोहनबद्दल चौकशी केली. पण अजूनही तपासात काहीच प्रगती नव्हती. आठवडा झाला, दोन आठवडे झाले, मोहनचा पत्ता नव्हता. हॉटेलवरून आता जवळच्या पाहुण्यांच्याकडे थोडे दिवस त्यांनी आसरा घेतला होता. सुमित्रा कोणालाही घरी येऊ देत नव्हती. चौकशीला येणार्‍या नातेवाइकांना उडवाउडवीची उत्तरे देऊन माघारी घालवत होती. 

आता चार आठवडे होत आले होते. माधवने पोलिस ठाण्याच्या चकरा मारूनही काहीही माहिती लागत नव्हती. विचार करून त्याच्या डोक्याचा भुगा झाला होता. आता माघारी गावी परतायचे. आईवडिलांना घरी सोडून मग मोहनला शोधायचे, असा तो विचार करत होता. 

असा विचार करत तो गाडीत बसणार तेव्हा त्याची आई त्याला म्हणाली, ‘तिने घरात तर कोंडून घातलेले नसेल? माधव बघ की काही बरेवाईट झालेय की काय...’ म्हणून तिने आपल्या अश्रूंना वाट करून दिली. तिला समजावत तो गाडीत बसला. त्यांना घरी पोचवून मी काही मित्रांकडे चौकशी येतो म्हणून पुन्हा माघारी आला. त्याने जरा अंधार पडतानाच मोहनचे घर गाठले तेव्हा मागच्या खोलीत सुमित्रा जेवण करत होती. तो पुढच्या खोलीजवळ आला. त्याच्या नाकाला कसलातरी उग्र वास जाणवला. पण तो मागच्या बाजूने येत होता. त्याला तिथे थांबू वाटेना. तो निघून आला. मित्राच्या एका रिकाम्या खोलीत राहिला पण रात्रभर त्याला झोप लागली नाही. शेवटी सकाळी सकाळी त्याने निर्णय घेतला. आपली शंका त्याने तडक पोलिस ठाण्यात फोन करून सांगायची, असे ठरवून त्याने फोन लावला. 

आज निवडणुकीची ड्युटी संपवून इन्स्पेक्टर चव्हाण पुन्हा रुजू झाले होते. जरा लवकरच ठाण्यातल्या महिन्याभराच्या कामाचा आढावा घेऊ म्हणून त्यांनी कारकुनाला आढावा द्यायला सांगितला. एवढ्यात टेबलवरचा फोन वाजला. त्यांनी उचलला.

‘साहेब, माझा भाऊ मोहन बेपत्ता होऊन आता महिना होत आला. काही पत्ता लागला का? आम्हीही त्याचा शोध घेतोय, पण काहीच शोध लागत नाही. साहेब, त्याची बायको सुमित्रा कोणालाच घरी येऊ देत नाहीय. दारातून हाकलून लावतेय. घरातून कसलातरी वास येतोय. मला शंका वाटतेय. साहेब, जरा माझ्या भावाच्याच घरात तपास करून बघा. खूप मेहेरबानी होईल साहेब.’ मोहनचा मोठा भाऊ माधव इन्स्पेक्टर चव्हाण यांना विनवणी करत होता.

त्यांनी लागलीच ती फाईल काढली. तपास पाहिला. मग सहकार्‍यांसोबत एक महिला कर्मचारी घेत त्यांनी सरळ सुमित्राचे घर गाठले. पोलिसगाडी दारात पाहताच ती थोडी चाचपडली. बाहेर येत तिने आपल्या पतीचा काही तपास लागला का हेही विचारले. पण चव्हाण साहेबांनी ‘मॅडम, सगळं घरात बोलू’ म्हणत घरात प्रवेश केला. घरातून कसलातरी दर्प येत होता. पोलिसी नाकाने तो ओळखला. त्या दिशेने तपास करत त्यांनी स्वयंपाकघर गाठले. त्यांनी घराची झडती घेण्यास सुरुवात केली तेव्हा स्वयंपाघरातून दुर्गंधी येत होती. घरातली जमीन खणून पुन्हा पूर्ववत केल्यासारखी दिसत होती. त्यांनी नजरेनेच खूण केली. सहकार्‍यांना इशारा कळताच त्यांनी सुमित्राला ताब्यात घेतले. एका कोपर्‍यात बसवले. आवश्यक साहित्य मागवून ती जागा खणायला सुरुवात केली. तेव्हा कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडला. सुमित्राला दरडावून विचारताच तिने तो पती मोहनचा असल्याचे सांगितले. त्यांनी लागलीच वरिष्ठांना कल्पना देत त्यांच्या नातेवाइकांनाही बोलावून घेतले. 

सगळे वातावरण भयानक होते. सुमित्रा गेले महिनाभर आपल्याच पतीचा खून करून तो मृतदेह आपल्याच स्वयंपाक घरात पुरून ठेवून त्याच ठिकाणी आपले जेवण बनवत होती. रितसर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. आता मृतदेह तर सापडला पण खुनाचे कारण काय? याचा उलगडा अपेक्षित होता. चव्हाण साहेबांनी सुमित्राला खोदून विचारले, विश्वसात घेतले आणि शेवटी कायद्याचा धाक दाखवला. मग ती बोलती झाली. तिला मूल हवे होते. मोहन घराकडे लक्षच देत नव्हता. एकटे घर खायला उठायचे. वैद्यकीय उपचार सुरू होते पण त्याला थोडा कालावधी लागणार होता. एकदा बाजारात भाजी आणण्यासाठी गेली असताना गावाकडचा एक मित्र तिला भेटला. तो टेम्पो चालवायचा. तिने आपली सलगी वाढवली. तिला घरी सोडण्याच्या बाहण्याने तो एक-दोनदा घरीही आला होता. 

तिने आपली व्यथा सांगितली. त्याने मदत करायचे कबूल केले; पण टेम्पोचे कर्ज फेडण्यासाठी पैसे मागितले आणि तिला हवे ते देण्याचेही कबूल केले. त्याच्याकडून आयुष्यभर सांभाळण्याचे वचन घेत तिने आपल्या मार्गात असलेला मोहनचा आधी काटा काढण्याचा बेत आखला. त्या दिवशी अनायासे तो लवकर घरी आला. पण तरीही शंका येऊ न देता आखलेल्या योजनेनुसार  त्याचा खून करण्यात आला होता आणि त्याचा नंतर सडलेला मृतदेह कुठेतरी जंगलात टाकून त्याची ओळख पटवून नंतर सगळी संपत्ती ती आपल्या नावावर करून घेणार होती. पण माधवची शंका आणि मृतदेहाला सुटलेला वास यामुळे त्यांचे बिंग फुटले. सुमित्रा आणि तिचा गावाकडचा प्रियकर सोनू यांना अटक झाली.