Wed, Aug 12, 2020 03:23होमपेज › Crime Diary › मिस्टर  नटवरलाल!

मिस्टर  नटवरलाल!

Last Updated: Jan 22 2020 2:20AM
सुनील कदम, कोल्हापूर

आयुष्यातील कोणता प्रसंग माणसाला आयुष्याच्या कोणत्या वळणावर नेऊन पोहोचवेल ते सांगता येत नाही. 1912 साली बिहारच्या सिवन जिल्ह्यातील जिरादेई नावाच्या एका छोट्याशा खेडेगावातील सर्वसामान्य कुटुंबात जन्म झालेला मिथिलेशकुमार श्रीवास्तव हासुद्धा एक सर्वसामान्य मुलांसारखाच होता. शाळेत असताना त्याला फुटबॉल आणि बुद्धिबळ खेळण्याची आवड होती. आपल्या सवंगड्यांप्रमाणेच मिथिलेशकुमारच्या आयुष्याचा रहाटगाडा सुरू होता; पण एकेदिवशी अशी एक घटना घडली, की त्या घटनेनंतर त्याच्या आयुष्याने एक भलतेच वळण घेतले.

मिथिलेशकुमारच्या घराशेजारी एक वृद्ध गृहस्थ राहत होते. एकेदिवशी त्यांनी मिथिलेशकुमारला एक चेक देऊन बँकेतून पैसे घेऊन येण्यास सांगितले. हा चेक घेऊन बँकेत जात असतानाच मिथिलेशकुमारने त्या वृद्ध इसमाची सही हुबेहुब शिकून घेतली. त्यानंतर त्या इसमाच्या परस्पर त्याने त्याच्या बँक खात्यातून त्याची नकली सही करून परस्पर रकमा काढायला सुरुवात केली. त्यावेळी मिथिलेशकुमारचे वय अवघे दहा वर्षांचे होते; पण एवढ्या अल्पवयातच या बाळाचे पाय पाळण्यात नव्हे तर पार पाळण्याबाहेर लोंबायला सुरुवात झाली होती. ही अफरातफरीची भानगड तब्बल एक हजार रुपयांच्या घरात पोहोचल्यावर त्या वृद्ध माणसाच्या लक्षात ही बनवाबनवी आली आणि त्याने त्याबाबत मिथिलेशकुमारच्या वडिलांकडे कागाळी केली. त्या काळाच्या हिशेबाने एक हजार रुपयांची रक्कम म्हणजे भलीमोठी होती. त्यामुळे आपल्या सुपुत्राचे हे प्रताप कानावर पडताच मिथिलेशकुमारच्या वडिलांनी साहजिकच त्याला बेदम चोप दिला. यातून कोणताही धडा न घेता मिथिलेशकुमार घरातून पळाला आणि त्याने थेट कलकत्ता शहर गाठले. मिथिलेशकुमारचा नटवरलालच्या दिशेने प्रवास सुरू झाला तो हा असा!

कोलकात्यात आल्यावर त्याने शिक्षण मात्र थांबविले नाही. रस्त्याकडेच्या दिव्याच्या उजेडात बसून त्याने अभ्यास चालू ठेवला. त्याची ही जिद्द बघून कोलकात्यातील केशवराम नावाच्या एका सद‍्गृहस्थांनी त्याला आपल्या घरात आसरा दिला. तिथेच राहून मिथिलेशकुमारने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पुरे केले. दरम्यानच्या काळात आपल्या पैशाची गरज भागविण्यासाठी लोकांना छोटा-मोठा गंडा घालण्याचे त्याचे उद्योग सुरूच होते; मात्र हे सगळे उद्योग तो वेगवेगळ्या प्रकारचे वेषांतर करून करीत असल्यामुळे ते कुणाच्या फारसे लक्षात येत नव्हते. लोकांना ठकविणे, गंडा घालणे ही जणू काही त्याची जन्मजात सवयच बनून गेली होती. अखेर त्याने कोलकात्यात असताना आपले आश्रयदाते केशवराम यांनाच तब्बल पाच लाख रुपयांचा चुना लावला आणि कोलकात्यातून पोबारा केला. त्यानंतर दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, ओरिसा, राजस्थान, गुजरात, पंजाब आदी राज्यांमध्ये मिथिलेशकुमारने वेगवेगळ्या ठिकाणी आपले बस्तान बसविले. उद्योग मात्र एकच, लोकांना गंडा घालून त्यांच्याकडून पैसा उकळणे! दरम्यानच्या काळात त्याने वकिलीची खरीखुरी पदवीही मिळविली होती.वेगवेगळी वेषांतरे करण्यात माहीर असलेल्या मिथिलेशकुमारने प्रत्येकवेळी कुणालातरी गंडा घालताना नवे नाव धारण केलेले असायचे. त्या काळात त्याची जवळपास पन्नासभर नावे प्रचलित होती; पण सगळ्यात जास्त स्मरणात राहिले ते त्याचे नटवरलाल हेच नाव! कारण, या नावाचा महिमाच तसा तयार झाला होता.

त्या काळात देशाला नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते आणि देशात पर्यटन व्यवसायाला चांगलीच चालना मिळाली होती. देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात परदेशी लोक पर्यटनासाठी दिल्ली आणि आग्रा परिसरात यायचे. नटवरलाल याची राहणी अतिशय श्रीमंती दर्जाची असायची आणि मुद्दामहून तो लोकांना आपण उच्च पदस्थ शासकीय अधिकारी असल्याचे भासवायचा. एकदा त्याने सध्या भारताला पैशाची गरज असून त्यासाठी आग्य्राचा ताजमहाल विकणार असल्याचे काही परदेशी पर्यटकांना सांगितले. त्याची उंची राहणी आणि साहेबी पद्धतीचा पोशाख बघून काही पर्यटक त्याच्या बोलण्याला भुलले आणि त्यांनी त्याच्याकडून काही लाख रुपयांना चक्क ताजमहालच विकत घेतला. नटवरलालने ताजमहाल विकण्याची ही किमया एकदा नव्हे तर दोनदा करून दाखविली होती. गंमत म्हणजे या व्यवहारासाठी त्याने तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या नकली सहीचा वापर केला होता. नकली सह्या करण्यात नटवरलालचा कुणी हात धरू शकत नव्हते, एवढी हुबेहुब नकली सही तो करायचा. ताजमहालच्या विक्री प्रकरणानंतर मात्र नटवरलालच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागला.

मात्र, गप्प बसेल तर तो नटवरलाल कसला? ताजमहालच्या विक्रीनंतर त्याने भारताचे संसद भवन आणि लाल किल्लासुद्धा परदेशी पर्यटकांना विकून टाकण्याची किमया करून दाखविली. हे कमी होते म्हणून की काय या बहाद्दराने  एकदा तर चक्क भारताचे राष्ट्रपती भवनच पर्यटकांना विकून टाकले होते. हे झाले नटवरलालचे फार पूर्वीचे कारनामे, अगदी अलीकडे त्याने दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने एका घड्याळ व्यापार्‍याला लाखो रुपयांचा चुना लावला होता. दिल्लीच्या कॅनॉटप्लेस भागातील एका घड्याळ व्यापार्‍याकडून नटवरलालने राजीव गांधींच्या पाहुण्यांना भेट देण्यासाठी म्हणून अत्यंत महागडी अशी शहाण्णव घड्याळे खरेदी केली. नोकराकडे घड्याळाच्या किमतीचा चेक किंवा डीडी देतो, असे सांगून तो त्या दुकानदाराच्या नोकराबरोबर दुकानातून बाहेर पडला आणि वाटेतच कुठेतरी त्या नोकराला गुंगारा देऊन पसार झाला. 

या घड्याळांची किंमत जवळपास एक कोटी रुपयांच्या घरात होती.उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा पीए, स्व. पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांचा पीए म्हणून सांगूनही अलीकडच्या काळात त्याने अनेकांना करोडो रुपयांना गंडा घातला होता. देशातील अनेक बड्या बड्या उद्योगपतींना त्याने वेगवेगळ्या मंत्र्यांच्या नावाने करोडो रुपयांचा गंडा घातला होता. देशातील आठ राज्यांमध्ये नटवरलाल याच्याविरुद्ध फसवणुकीचे शेकडो गुन्हे दाखल झाले होते. नटवरलालला त्याच्या आयुष्यात वेगवेगळ्या गुन्ह्याखाली एकूण नऊ वेळा अटक झाली; पण प्रत्येकवेळी तो पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाला. एका फसवणुकीच्या प्रकरणात 1996 साली त्याला शेवटची अटक झाली, त्यावेळी त्याचे वय होते 84 वर्षे!  या वयातही बहाद्दराची फसवण्याची ‘उमेद’ मात्र कायम होती. त्याला अटक करून पोलिस त्याला दिल्लीला घेऊन जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर उभा होते. तेवढ्यात नटवरलालने दम्याची उबळ आल्याचे जोरदार नाटक केले आणि बंदोबस्तासाठी असलेल्या तीनपैकी एका पोलिसाला औषध दुकानातून औषध आणायला म्हणून पिटाळले. दुसर्‍याला पाणी आणायला पाठविले. तिसरा पोलिस नटवरलालच्या बेडीला बांधलेली दोरी हातात धरून उभा होता; पण नटवरलालने कधी आणि कशी दोरी सोडवून घेऊन पोबारा केला, त्याचा बिचार्‍याला थांगपत्तासुद्धा लागला नाही. त्यानंतर मात्र नटवरलाल कधीही पोलिसांच्या हाती लागला नाही.

त्याचवर्षी बिहारमधील दरभंगा रेल्वेस्थानकावर एका पोलिसाला नटवरलाल दिसला. त्याला पकडण्यासाठी म्हणून त्या पोलिसाने आपल्या सहकार्‍यांना हाक मारली; पण तोपर्यंत नटवरलाल रेल्वे गार्डचा गणवेश अंगावर चढवून पसार झाला होता. पोलिसांना नटवरलालचे झालेले हे शेवटचे दर्शन! वेगवेगळ्या फसवणुकीच्या आरोपाखाली वेगवेगळ्या राज्यांतील न्यायालयांनी नटवरलालला तब्बल 113 वर्षांची शिक्षा सुनावली होती; पण शेवटपर्यंत कोणत्याच राज्याचे पोलिस नटवरलालला कारागृहापर्यंत मात्र पोहोचवू शकले नाहीत.

नटवरलालची राहणी अतिशय श्रीमंती थाटाची असायची. बोलणे तर अतिशय मिठास असायचे. त्यामुळे पाहता क्षणीच समोरच्यावर त्याची छाप पडायची आणि तो माणूस त्याच्या शब्दावर चटकन विश्‍वास ठेवून जायचा. एकदा तर भर न्यायालयात नटवरलाल थेट न्यायाधीशांनाच म्हणाला होता, की ‘महोदय माझ्या बोलण्यातच अशी जादू आहे की तुम्ही जर फक्त दहा मिनिटे माझ्याबरोबर बोलला, तर मी खात्रीने सांगतो की तुम्ही माझ्या बाजूनेच निकाल देणार!’ इतका त्याचा त्याच्या बोलण्याबाबत आत्मविश्‍वास होता. नटवरलाने केलेले सगळे गुन्हे रक्तविहीन आणि अहिंसक स्वरूपाचे होते. तो म्हणायचा, की मी श्रीमंतांना लुबाडतो आणि ती संपत्ती गोरगरिबांना वाटतो. एकाअर्थी ते खरेही होते. कारण, नटवरलालच्या गावातील सर्वसामान्य लोक त्याला रॉबीनहूडचा अवतार समजायचे, त्याचा आदर करायचे. एवढेच नव्हे, तर त्यांनी गावात चक्क नटवरलालचा एक पुतळाच उभा केला होता. मात्र शासनाने एका गुन्हेगाराचा पुतळा म्हणून तो नष्ट करून टाकला. नटवरलालने एकदा तर थेट केंद्र शासनालाच एक ‘ऑफर’ दिली होती. तो म्हणाला होता, की मला नुसता आदेश द्या, मी हुबेहुब नकली सह्या करून देशावर असलेले अन्य देशांचे कर्ज रातोरात फेडून टाकतो आणि उलट त्या देशांच्या नावावरच आपल्या देशाच्या कर्जाचा बोजा चढवतो. अर्थात, सरकारने नटवरलालची ही ‘ऑफर’ धुडकावूनच लावली होती. त्यातून नटवरलालच्या अफाट आणि अफलातून भामटेगिरीची झलक मात्र बघायला मिळते.

अशा या मुलुखावेगळ्या नटवरलालने मृत्यूनंतरही जगाला चकवा दिलाच. 2009 साली नटवरलालच्या वकिलांनी दिल्लीच्या न्यायालयात असा अर्ज केला होता, की नटवरलाल आता मरण पावला असून त्याच्यावरील सगळे खटले काढून टाकण्यात यावेत. मात्र, नटवरलालच्या मृत्यूचे पुरावे मात्र ते वकील सादर करू शकले नव्हते. नटवरलालच्या भावाच्या म्हणण्यानुसार 1996 साली नटवरलालचा मृत्यू झाला होता; पण त्याच्याकडेही त्याबाबत कोणताही पुरावा किंवा कसल्या नोंदी नव्हत्या. त्यामुळे शेवटपर्यंत आणि अगदी आजपर्यंतसुद्धा नटवरलालचा मृत्यू एक गूढ बनूनच राहिलेला आहे. आयुष्यभर लाखो लोकांना गंडविणार्‍या या ठकसेनाने आपल्या मरणाबाबतही जगाला संभ्रमात ठेवून अंतर्धान पावावे, हाही एक विलक्षण योगायोगच समजायला पाहिजे.