Mon, Jul 06, 2020 04:38होमपेज › Crime Diary › कोडवर्ड

कोडवर्ड

Last Updated: Dec 04 2019 1:11AM
डी. एच. पाटील, म्हाकवे, कोल्हापूर

सूर्य वर आला होता. सकाळची कोवळी किरणे दवबिंदूंवर पडल्यामुळे ते मोत्याप्रमाणे चमकत होते. गुलाबी थंडी अंगाला बोचत होती. उंच चिंचेच्या झाडाच्या शेंड्यावर कोवळ्या किरणांसाठी सारस पक्षी बसला होता. थंडीमुळे झाडाखाली एक कुत्रं पाय दुमडून झोपलं होतं. नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी रामू लवकर उठला होता. इनामदारांच्या गुर्‍हाळावर तो ऊसतोडणी मजूर म्हणून काम करत होता. पहाटेला उठून ऊस तोड करून, तो ट्रॅालीमध्ये भरून गुर्‍हाळ घरावर आणण्याचं काम करायचा. दुपारी विश्रांती घेतल्यानंतर तो पुन्हा कामावर जायचा.

आज लवकर उठून तो शेताच्या बांधावर पोहचला. हातातला कोयता त्यानं बांधावर ठेवला. खांद्यावरचा टॉवेल डोक्याला बांधून ऊस तोडणार, एवढ्यात त्याला उग्र वास येऊ लागला. नाकाला टॉवेल धरतच तो वास येणार्‍या दिशेकडे वळला. जरा अंतरावर एका तरुण महिलेचा मृतदेह पडलेला होता. मृतदेह पडून चार-पाच दिवस झाले असावेत. त्यामुळे उग्र  वास येत होता. रामू तसाच पळत गुर्‍हाळघरावर आला. तेथूनच मालकाला फोन केला. बाकीचे ऊसतोडणी मजूरही गोळा झाले. सगळे मजूर गावचेच होते. पण कोणीही त्या महिलेस ओळखत नव्हते.

गुर्‍हाळ मालकाने पोलिसांना माहिती दिली. पोलिस माहिती मिळताच घटनास्थळी पोहचले. एका 20-22 वर्षांच्या तरुणीचा तो मृतदेह होता. तिच्या डोक्यामध्ये वार करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसत होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. उसाच्या फडामध्ये काही सापडते का, हेही पाहिले. मात्र  पोलिसांना तिथे काहीच सापडले नाही. तरीसुद्धा त्या जमीनदाराच्या शेताचा परिसर पोलिसांनी पिंजून काढला. शेतात शोधत असताना पोलिसांना एक कागद सापडला. त्या कागदावर शिल्लक फरसाण्याचे अवशेष सापडले होते. तो कागद पोलिसांनी ताब्यात घेतला. कागदाच्या पाठीमागील बाजूस इंग्रजीमध्ये काहीतरी लिहिले होते.  तो कागद पोलिसांनी जप्त केला. सापडलेल्या तरुणीच्या कपड्यांवरून ती शहरातील असल्याचे दिसत होते. पोलिसांनी गुर्‍हाळघरावरील सर्व मजुरांचे जबाब घेतले. त्यावेळी त्यांनी आपण या महिलेस ओळखत नसल्याचे सांगितले. 

आता गावात पोलिसांनी महिलेची ओळख पटविण्यासाठी तपास केला. गावात दिवसभर फिरूनही तरुणीची ओळख पटली नाही. पोलिसांनी खबर्‍यांनाही कामाला लावले. दोन दिवस फिरूनही पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली नव्हती. त्यामुळे पोलिसांना तपास करणे अवघड झाले होते.

पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पाच-सहा दिवस घालवले. मात्र त्यानां यश येत नव्हते. खबर्‍यांनाही यश येत नव्हते. पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. गुर्‍हाळघरावर गेल्या दोन महिन्यात आलेल्यांची ओळख कोणाला लागली का ? याची चाचपणी करत असताना मृतदेहाचे चित्र बनवून मजुरांना दाखविण्यात आले. ही मात्रा लागू पडली. एक महिन्यापूर्वी ती तरुणी गुर्‍हाळघरावर आली होती. सोबत दोन तरुण होते. पनवेलमधून आल्याची शक्यता त्यांच्या बोलण्यातून जाणवत असल्याचे मजुरांनी सांगितले.

त्यामुळे पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पनवेल गाठले. पोलिसांनी तेथील पोलिसांना कल्पना देऊन ओळख पटविण्यात सुरुवात केली. दिवसभर ओळख पटत नव्हती. मात्र रात्री एका डान्सबारमध्ये पोलिस गेले, तिथे रेखाटलेले चित्र बारमधील कर्मचार्‍यांना दाखविताच ‘ये तो सपना है साब।’ असे उत्तर मिळाले. त्यामुळे पोलिसाना हायसे वाटले. पोलिसांनी मॅनेजरकडून तिचा बंगालमधील घरचा पत्ता घेतला.

पोलिसांनी बंगालच्या दार्जिलिंग भागात तिच्या घरचा शोध घेतला. तिच्या घरात अठराविश्व द्रारिद्य्र  होते. पहाडी भाग, आई-वडील आजारी, दोन बहिणी, एक लहान भाऊ, असे कुटुंब होते. घरातील मंडळींनी तिचा फोटो ओळखला. सगळ्या घरात रडारडी सुरू झाली. पोलिस  तिच्या वडिलांना घेऊन इकडे स्टेशनला आले. तिचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. 

‘साहब, विकीने मेरी बेटी को मुंबई लाया था। बहुत पैसा कमाती थी और हमारा सारा घर उनके उपर चलता था।’ असे म्हणून त्याला थोडी धाप लागली. पोलिसांनी मुंबईतून विकीला ताब्यात घेतलं. त्यानं मात्र सांगितलं, ‘आपण तिला डान्सबारमध्ये काम दिलं. त्यानंतर आपण तिच्या संपर्कात नव्हतो.’ त्यामुळे पोलिसांनी त्याला सोडून दिलं. पोलिसांनी सपनाच्या डान्सबारमध्ये चौकशीसाठी पाळत ठेवली. अनेक कर्मचार्‍यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र त्यामधूनही काहीच धागा पोलिसांना मिळत नव्हता. मॅनेजरकडूनही समाधानकारक उत्तरे मिळत नव्हती. ती कुठे राहत होती. त्याचा पत्ता पोलिसांना सापडत नव्हता. त्यामुळे पोलिसानी रिक्षावाल्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. यात पोलिसांना यश मिळाले. 

दररोज  सोडायला येणार अरिफखान हा  रिक्षावाला होता. त्यानं ती राहत असलेली खोली पोलिसांना दाखविली. पोलिसांनी खोलीची झडती घेतली. त्यावेळी खोलीत असणार्‍या कपाटावर  एक इंग्रजी शब्द लिहिला होता. पोलिसांना सापडलेल्या कागदामध्येही तोच शब्द होता. त्यामुळे हा कसलातरी कोडवर्ड असावा आणि तोच सपनाच्या खुनातील मुख्य धागा होता.

पोलिसांनी त्या कोडवर्डचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला; मात्र यश येत नव्हते. सायबर गुन्ह्याशी संबंधित असणार्‍या तज्ज्ञांचा यावेळी सल्ला घेण्यात आला. दरम्यान शवविच्छेदनचा अहवाल आला. त्यामध्ये डोक्यात अवजड वस्तूचा प्रहार करून खून; शिवाय धक्कादायक बाब म्हणजे ती तीन महिन्यांची गरोदर होती अन् खून होण्यापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला  होता.

सायबर गुन्हे तज्ज्ञांनी कोडवर्डचा तपास केला, त्यामध्ये एक फोन नंबर दडला होता. पोलिसांनी तो फोन डायल केला. मात्र तो उचलला गेला नाही. त्या फोनचे लोकेशन पोलिसांनी गाठले. तेव्हा एक तरुण पोलिसांच्या हाती लागला. त्याला ‘प्रसाद’ दिला. मात्र हा फोन आपल्याला सापडला होता, जिथे सापडला ते ठिकाण एका कॉलेजवळ होते, त्या कॉलेजमध्ये पोलिसांनी मग चौकशी केली.

पोलिस तपास करत असताना दोघे जण संशयितरीत्या फिरताना पोलिसांना वाटले. त्यांना उचलले. तपास करताना सपना म्हणजे काय होती हे पोलिसांना कळले. डान्सबारच्या नावाखाली सपना गांजा विक्री करत  होती. या दोन तरुणांच्याकडून बरेच पैसे तिने उकळले होते. शिवाय या दोघांनाही तिने शारीरिक संबंधाची सवय लावली होती. ते तरुण तिच्या जाळ्यात पुरते फसले होते.कॉलेजला दांड्या मारून ते तिच्याच भोवती फिरायचे.

या कोडवर्डच्या आधारेच पोलिसांना खुन्यांपर्यंत पोहचायचे होते. मात्र फोन  नंबरचे रजिस्ट्रेशन पाहून पोलिस चक्रावले. त्या दोन तरुणांपैकी एकाचा हा नंबर होता पण ते हा नंबर वापरत नव्हते. तो नंबर वापरत असणार्‍यापर्यंत पोलिस पोहचले. तो सपनाच्या खोली शेजारी राहणारा राजू होता. त्याला पोलिसांनी उचलले. चांगलाच फोडला. मग मात्र त्याने आपणच सपनाचा खून केल्याचे सांगितले.

‘सपना व मी दोघे शेजारी राहत होतो.सपनाला माझ्या धंद्यात ओढून घेतली. तिलाही भरपूर पैसे मिळू लागल्याने तीही  फसत गेली. त्यामध्ये त्या दोन तरुणांना तिने जाळ्यात ओढले. ती श्रीमंत बापाची मुले होती. त्यामुळे ती तिच्यावर भरमसाट पैसे  उधळत होती; मात्र मला त्यामधील ती कसलाच वाटा देत नव्हती. त्यातील एका तरुणाचे सिमकार्ड माझ्याकडे होते. त्या सिमला नंबर न देता कोडवर्ड टाकला होता, त्यावरून आम्ही तरुणांना माल पुरवत होतो. सपनाचा खून करून तरुणांच्यावर आळ येण्यासाठी मी कोडवर्ड लिहिलेला कागद तिथे टाकला. गुर्‍हाळघरावर आम्ही पूर्वी एकदा गेलो होतो म्हणून तेच ठिकाण निवडले. माल पोहोचवण्यासाठी म्हणून तिला सोबत घेऊन तिकडे गेेलो. त्या दिवशी तिचा तिथेच खात्मा केला...’

‘हो, तिचा खात्मा केलास, पण दुसर्‍याला फसविण्याच्या नादात तूच फसलास.’ त्याला अटक झाली.