Wed, Feb 19, 2020 01:44होमपेज › Crime Diary › दहा गोट्यांची पैज

दहा गोट्यांची पैज

Last Updated: Feb 04 2020 8:22PM
ज्ञानेश्वर म. कुलकर्णी, कोल्हापूर

साधारण पन्नास वर्षांपूर्वीची घडलेली ही गोष्ट आहे. त्यावेळी मी इयत्ता चौथीत शिकत होतो. तेव्हा खेडेगावात राहत होतो मी. आमच्या मळ्यातच आमचे मोठे कौलारू घर होते. घरासमोर मोठे अंगण होते. त्यापुढे गावापर्यंत एका तळाला आमची अकरा एकर शेती होती. पुढे हिरवीगार शेती, घराच्या पाठीमागे मोकळी जागा आणि त्या पलीकडे सतत वाहणारा स्वच्छ पाण्याचा ओढा होता. त्या ओढ्याकाठूनच असलेल्या पाऊलवाटेने आम्ही खाकी हाफ पँट आणि पांढरा हाफ शर्ट घालून, हातात पाटी-पेन्सिल घेऊन अनवाणी पायांनी चिखल-पाण्यातून, थंडीवार्‍याची, पावसापाण्याची, उन्हाची पर्वा न करता दोन दोन मैल चालून शाळेत जात होतो.

मार्च महिना सुरू होता. सकाळची शाळा सुरू झाली होती. शाळा सुटल्यावर आम्ही मुले वाटेत असलेल्या विहिरीत पोहायचो. मौजमस्ती करायचो. त्या वेळी विहिरीच्या तळाला जाऊन गाळ काढण्याचा पराक्रम काही मुले करायची. मी आणि माझ्या भावाने तसा प्रयत्न केला होता, पण यश आले नव्हते. आमच्या वर्गातला निवृत्ती म्हणाला,
‘अरे, त्यासाठी नळी खावी लागते. तूप -पोळी खाऊन ताकद येत नाही. तुम्ही गाळ काढून दाखवा. दहा गोट्या देतो तुम्हाला. लावता का पैज?’

मी आणि माझ्या भावाने पैज जिंकायचे ठरविले. अंगातला शर्ट  काढून दोघांनी विहिरीत उड्या मारल्या. विहीर फार खोल होती. कडक उन्हात विहिरीचे पाणी चमकत होते. आम्ही दोघे विहिरीच्या तळाला गेलो तो तळाचा गाळ घेऊनच वर आलो. माझ्या नाका-तोंडातून रक्त आले होते. निवृत्तीने पुढे होऊन मला हात दिला आणि काठावर आणले. एक थोराड पोरगं ओरडलं,
‘आज निवृत्तीने ज्ञानेश्वराला वाचवले.’
मी कासाविस होतो. घाबरलो होतो. निवृत्तीने विचारले, ‘अरे काय झाले तुला?’ मी धापा टाकतच म्हणालो,
‘विहिरीच्या तळाला गाळात एक बाई रुतली आहे.’
पोरं काठावर आली आणि त्यांनी बोंब मारली. शेतात काम करणारे मजूर धावत तेथे आले. त्यांनीही विहिरीत उडी मारून खात्री करून घेतली आणि मग एकच कालवा झाला.
गड्याने धावत जाऊन धाकल्या मालकांना ही बातमी सांगितली. मग गावातले अनेक लोक विहिरीच्या काठावर जमले. पोलिस पाटील आले होते. मृतदेह बाहेर काढण्यात आला. तो देह धाकट्या मालकांच्या बायकोचाच होता. त्यांना सगळे वहिनी म्हणायचे. त्यानंतर पोलिस आले. पंचनामा झाला आणि पुढील तपास सुरू झाला.

‘वहिनींनी आत्महत्या केली’ अशीच चर्चा गावात सुरू झाली होती. पण ‘माझी बहीण कधीच आत्महत्या करणार नाही. तिचा घात झालाय.’ असे तिच्या भावाचे म्हणणे होते. लोकांना उलट-सुलट बोलायला वाव मिळाला.
 पोलिसांनी गावातील लोकांकडे चौकशी सुरू केली. धाकल्या मालकाविरुद्ध कोणीही वाईट सांगत नव्हते. ‘त्या कुटुंबात सगळेच चांगले होते. काहीच भांडणतंटा नव्हता.’ असेच लोकांचे म्हणणे होते. पोलिसांनी धाकल्या मालकांना विचारले,
 ‘तुमची बायको घरातून कधी बाहेर गेली होती? कशासाठी गेली होती?’
‘माझे जेवण घेऊन आली होती अकरा वाजायच्या सुमारास. फिरत फिरत कधी विहिरीच्या काठावर गेली आणि खाली कोसळली ते आम्हाला समजलेच नाही.’
‘तुम्ही काय करीत होता?’
‘गडीमाणसं शेतात काम करीत होती. मी उसाला पाणी पाजत होतो. अजून जेवणाची सुट्टीसुद्धा झाली नव्हती. तेवढ्यात विहिरीवरच्या पोरांनी बोंब मारली म्हणून आम्ही तिकडे पळालो. तर हे असे झाले होते.’
‘तुम्हाला कोणाचा संशय?’
‘आमचा कोणी शत्रू नाही. कोणी आमच्या वाईटावर नाही. हा घातपात नाही मानेसाहेब. पाय निसरून ती खाली पडली असावी.’

 इन्स्पेक्टर मानेंचे समाधान होत नव्हते. धाकल्या मालकांचे आणि त्यांच्या शेजार्‍यांचे पटत नव्हते. शिवाय भाऊबंदकीचा दावा कोर्टात होता. आता पोलिसांनी शेजारी जयसिंगरावांना गाठले. त्यांना अनेक प्रश्न विचारले तेव्हा जयसिंगराव म्हणाले,
‘मानेसाहेब, तुम्हाला माझा संशय येतोय काय?’ 
‘तुमचे भांडण आहे वाटणीवरून. कोर्टात दावा आहे.’
‘हे बघा, मी बबनचा मोठा भाऊ आहे. आमचा कोर्टात दावा आहे. भांडणतंटा बाहेर आहे, घरात नाही. मी कशाला कोणाला मारू?’
पोलिसांनी तपास केला, पण त्यांच्याविरुद्ध काहीच पुरावा सापडेना.  तपासाची दिशा सापडत नव्हती. वहिनींचा भाऊ ‘तपास करा’ म्हणून पोलिसांच्या मागेच लागला होता. तो म्हणाला,  
‘माझ्या ताईने आत्महत्या केली नाही. ती पाय निसटूनसुद्धा पडली नाही. तिचा घात झालाय.’
‘तुम्हाला कोणाचा संशय येतो किसनराव?’
‘मोठं घराणं बघून ताईचं लग्न थाटात लावून दिलं होतं, पण तिला सुख नाही मिळालं तिथं.’
‘तिच्या सासरकडच्या लोकांवर तुम्ही संशय घेताय. पण तसं काही सापडलं नाही. पुरावा असल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही.’
‘बंद करून टाका मग केस.’

किसन रागाने निघून गेला. पोलिसांना त्याचे दुःख कळत होते. ते त्याला दोष देत नव्हते. त्या दिवशी शाळेतून परत येताना धाकल्या मालकांच्या शेतात पुन्हा पोलिस आल्याचे आम्ही पाहिले. गडीमाणसांबरोबर पोलिस बोलत होते. पोलिसांनी मारुतीला विचारले,
‘मारुती, तू जुना नोकर आहेस. किती वर्षे काम करतोस गडी म्हणून?’
‘जलम गेला की साहेब. घरचे आणि शेतातले काम मीच करतो.’
‘घरातले वातावरण कसे आहे? काही भांडणतंटा?’
‘भांडणतंटा काही नाही, पण घरात धुसफुस असायचीच.’
‘काही कारण?’
‘वहिनीसाहेबास्नी मूलबाळ होत नव्हतं. वंशाला दिवा म्हणून मुलगाच पाहिजे होता धाकल्या मालकांना.’
‘मारुती, त्या दिवशी नक्की काय घडले?’
‘धाकल्या मालकांनी सांगितलंय तुम्हाला सारं.’
‘तुला वाटते का वहिनीसाहेब पाय निसटून पडल्या असे?’
‘मला नाही तसं वाटत.’
‘मग त्यांनी आत्महत्याच केली काय?’

‘कधीच तसे करणार नाहीत त्या. धाडसी होत्या. गडीमाणसांचीसुद्धा नेहमी विचारपूस करायच्या मायेने.’
‘मग हे असं कसं झालं?’
‘साहेब, वहिनीसाहेबांच्या पोटाला मूलबाळ असतं तर असं झालंच नसतं. त्यांना वांझ म्हणून त्रास दिला समद्यांनी.’
‘समद्यांनी म्हणजे? नाव सांग त्यांचं.’
‘नाव कसं घ्यावं? त्यांचं मीठ खातुया.’
इन्स्पेक्टर मानेंचा संशय बळावला. त्यांनी विचारले, 
‘मारुती, धाकले मालक काय करीत होते तेव्हा?’
‘पाणी पाजत होते उसाला.’
‘पाणी पाजायचे सोडून कोठे गेले होते काय?’
‘असतील बी. माझं ध्यान नव्हतं तिकडं.’

‘मारुती, खरे बोल जरा. अरे तिचा जीव गेलाय. एका निष्पाप गरीब बाईचा जीव गेलाय.’
मारुती तोंड उघडणार तेवढ्यात धाकले मालक तेथे आले. मारुतीला रागाने म्हणाले, 
‘काय बोलत बसला आहेस? तुला काम नाही. कामचोर लेकाचा. काम न करता फुकटचं बसून खातोय.’
हे बोलणे मारुतीच्या जिव्हारी लागले. तो रागाने लाल झाला आणि म्हणाला,
‘साहेब, यांनीच मारलंय वहिनीसायबांना. वहिनीसाब विहिरीच्या काठावर उभ्या होत्या. हे हातातलं काम टाकून तिकडं गेलं आणि त्यांनी धक्का मारला. वहिनी खाली कोसळल्या.’
बबन मारुतीच्या अंगावर धावून गेला. तेवढ्यात इन्स्पेक्टर मानेंनी त्याला मागे खेचले आणि बेड्या ठोकल्या. बबन ओरडला,
‘मारुत्या, आता तुला जिवंत ठेवत नाही.’
‘मरणाला मी न्हाय घाबरत.’
‘खाल्ल्या घरचं वासं मोजलंस तू.’

‘घाम गाळलाय मी. फुकटचं नव्हतो खात. आतापर्यंत लई बोलून घेतलं तुमचं.’
‘माझ्याविरुद्ध बोलतोस?’
‘बोलणारच आता. मी खरं बोलणार. चाकरी नको मला तुमची. कुठंबी  जाऊन पोट भरीन.’
‘माझ्यावर आळ घेतलास तू. सोडत नाही तुला आता.’
‘तुम्ही मारलं वहिनीसायबांना. ढकलून दिलं विहिरीत. माझ्या डोळ्यांनी बघीतलंय मी. ’
इन्स्पेक्टर माने म्हणाले,
‘यापूर्वी विचारले तेव्हा का गप्प बसलास मारुती?’
‘काय सांगू साहेब, मला ठार माण्याची धमकीच दिली होती त्यांनी.’
इन्स्पेक्टर मानेंनी मान वळवून बबनला विचारले,
‘का रे मारलेस आपल्या बायकोला?’
‘वांझ बायको कशाला जिवंत ठेवायची?’
‘तुझ्यात दोष नसेल कशावरून? खून केलास तू. चल आता तुरुंगात.’
 पोलिस बबनला घेऊन निघून गेले.