बनावट नोटांचे आव्हान

Published On: Sep 11 2019 2:32AM | Last Updated: Sep 11 2019 2:32AM
Responsive image


जगदीश काळे

बनावट नोटा हे भारतीय अर्थव्यवस्थेपुढे आजही एक मोठे आव्हान आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बनावट नोटांचा बाजार सक्रिय राहिला आहे. वेळोवेळी केलेल्या कारवाईतून ही बाब सिद्ध झाली आहे. बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांतूनही बनावट नोटांच्या बाजाराचे प्रतिबिंब उमटले आहे. यावरून बनावट नोटांची व्याप्ती लक्षात येते. म्हणूनच केंद्र सरकारने काळा पैसा आणि बनावट नोटांचा बाजार संपविण्यासाठी 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्या. हा निर्णय घेताना काही युक्तिवाद करण्यात आले होते. त्यापैकीच एक म्हणजे, नवीन नोटांमध्ये वापरण्यात येणारे सिक्युरिटी फिचर्स ही नकली नोटा करणार्‍या मंडळींना अडचणीत आणणारी ठरू शकते, असा दावा करण्यात आला होता. प्रत्यक्षात देशातील अनेक भागात नवीन नोटांच्या बनावट नोटा आढळून येऊ लागल्या. महिनाभरातच पाचशे आणि दोन हजारांच्या बनावट नोटा बाजारात आढळून आल्या. आरबीआयच्या अहवालात म्हटले की, गेल्या काही वर्षांपासून200, 500 आणि 2000 च्या बनावट नोटांची संख्या वाढत आहे. 

आर्थिक वर्ष 2017-18 च्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षात बनावट नोटांचे प्रमाण 121 टक्क्यांनी वाढले. त्याचवेळी 2000 रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण 21.9 टक्के इतके आहे. यानुसार 10,20,50 रुपयांच्या बनावट नोटांही मोठ्या प्रमाणात पकडल्या जात असून त्याच्या संख्येत अनुक्रमे 20.2, 87.2 आणि 57.3 टक्के वाढ झाली आहे. यापूर्वीच्या एका अहवालात म्हटले की, यावर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत बँकिंग प्रणालीत 100 रुपये मूल्याच्या 1 लाखापेक्षा अधिक बनावट नोटा आढळून आल्या आहेत. बनावट नोटांची चाचपणी करताना तपास यंत्रणांची दमछाक होत आहे. 

2000 रुपये आणि 500 रुपयांच्या बनावट नोटांचे विश्लेषण पाहता त्याचा दर्जा अतिशय निकृष्ट आहे. त्याची नक्कल सहजपणे करता येते. एवढेच नाही, तर 100 रुपयांच्या मूल्यांच्या नोटांची नक्कल करणे तर खूपच सोपे असल्याने आरबीआयला गुप्तचर संस्थांनी दर्जा सुधारण्याचा सल्ला दिला आहे. गुप्तचर संस्थेच्या मते बांगलादेशच्या सीमेलगत सुमारे अर्धा डझनभर जिल्ह्यातील माल्दा, उत्तर दिनाजपूर, मुर्शिदाबाद आणि धुबरी व बारपेटा हे भाग बनावट नोटांचे प्रवेशद्वार बनले आहे. अनेक वर्षांपासून नेपाळ आणि पाकिस्तानातूनही बनावट नोटा भारतात दाखल होत आहेत. बनावट नोटांचा बाजार एवढा वाढला आहे की, आंतरराष्ट्रीय सीमेलगत असणार्‍या गावात चलनात येणार्‍या नोटा खर्‍या की खोट्या हे ओळखणे मुश्कील होत चालले आहे. हिस्सार येथे एका युवकाला नुकतीच अटक करण्यात आली आणि त्याच्याकडे एकूण 24.50 लाख मूल्यांच्या  500 आणि 200 च्या नोटा सापडल्या. रोहित नावाचा युवक हा बनावट नोट निम्म्या किंमतीत द्यायचा. यावरून बनावट नोटांचा व्यवसाय भारतात कशा प्रकारे हातपाय पसरत आहे, हे लक्षात येते. 

2016 च्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर पाकिस्तानकडून बनावट नोटांची तस्करी थांबली होती. मात्र यावर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात नेपाळ पोलिसांनी काठमांडू येथील त्रिभुवन विमानतळावर सुमारे 7.67 कोटींच्या भारतीय चलनातील नोटा पकडल्या. काठमांडूतील मोठ्या कारवाईनंतर भारतीय तपास यंत्रणा सजग झाल्या. या कारवाईदरम्यान आणखी एक गोष्ट उघडकीस आली, ती म्हणजे पाकिस्तानच्या म्होरक्यांनी बनावट नोटा नेपाळमार्गे न पाठवता कतारमार्गे पाठविण्याचा नवा मार्ग शोधला आहे. यामुळे भारतीय तपास यंत्रणांना या कारवायांचा थांगपत्ता लागणार नाही, असा कयास म्होरक्यांनी बांधला. महसूल माहिती संचालनालयाच्या एका अधिकार्‍याच्या मते, स्पेशल सेलकडून जप्त केलेल्या नोटा अधिक अपग्र्रेडेड व्हर्जनच्या एफआयसीएनच्या आहेत, हे विशेष. नोटांसाठी आवश्यक असणारी ऑप्टिकल व्हेरियबल शाई ही फेडरल सरकारलाच देणे बहुराष्ट्रीय कंपन्यांना बंधनकारक आहे. परंतु भारताची आर्थिकद़ृष्ट्या कंबर तोडण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने त्या कंपनीशी हातमिळवणी केल्याचे दिसते. ही बाब भारतीय अर्थव्यवस्थेला चिंताजनक आहे, अशी खंत या अधिकार्‍याने बोलून दाखविली. 

अन्य एका कारवाईत दिल्लीच्या नेहरू प्लेस येथून डी-कंपनीच्या एजंट अस्लम अन्सारीला पकडण्यात आले. त्याच्याकडे पाच लाख रुपयांच्या 2 हजारांच्या नोटा पकडल्या. अस्लम हा मूळचा नेपाळचा रहिवासी आहे. या छाप्यात जप्त केलेल्या नोटा पाहून तपास यंत्रणा चक्रावून गेली. एकवेळ त्यांना खोट्या नोटा समजून खर्‍याच नोटा पकडल्या की काय, असा संशय मनात निर्माण झाला होता. म्हणून स्वत:ला पडताळणी करता येत नसल्याने विशेष तपास पथकाला पाचारण करावे लागेल आणि त्यानुसार संबंधितावर कारवाई केली गेली. 

देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणार्‍या विघातक शक्तींना वेळीच पायबंद बसणे गरजेचे आहे. त्यामुळे बनावट नोटांचा बाजार करणार्‍या लोकांविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा खटला भरायला हवा, अशी मागणी होत आहे.