होमपेज › Crime Diary › श्रीमंतीचं आकर्षण

श्रीमंतीचं आकर्षण

Published On: Aug 14 2019 12:10AM | Last Updated: Aug 14 2019 12:10AM
अवंती कारखानीस

श्रीमंतीचं आकर्षण नसलेला माणूस शोेधून सापडायचा नाही. कालच्यापेक्षा आज आणि आजच्यापेक्षा उद्या आपली सांपत्तिक स्थिती चांगली असलीच पाहिजे, या वेडानं आपल्याला झपाटलेलं असतं. या मानसिकतेला काही अंशी सामाजिक परिस्थितीही जबाबदार असते. भरपूर पैसा राखून असलेल्या माणसानं तो कसा कमावला, हे आपल्या द़ृष्टीनं आता तितकंसं महत्त्वाचं राहिलेलं नाही. पैसा आहे आणि येतोय एवढंच महत्त्वाचं मानलं जातं. आपल्या या मानसिकतेची लिटमस टेस्ट घ्यायची झाली तर टी.व्ही.वर आपल्याला काय पाहायला आवडतं, हा प्रश्न आपण स्वतःला विचारू शकतो. टी.व्ही.वरच्या मालिकांमध्ये आलिशान घरं, श्रीमंतीचं झगमगाटी प्रदर्शन, झकपक कपडे घातलेली माणसं, त्यांच्या मालकीच्या कंपन्या हे सगळं आपल्याला दिसतं. आलिशान घरात नातेसंबंध मोडकळीला आलेले असतात आणि भव्य कंपन्यांमध्ये अधिकारीपदासाठी साठमारी चाललेली दिसते. काळ्या, पांढर्‍या, करड्या रंगात रंगवलेल्या व्यक्ती वेगळीच मूल्यव्यवस्था आपल्याला बेमालूम देत असतात. टी.व्ही.वर आपल्या घरासारखं घर दिसलं, तर आपल्याला ते फारसं रूचत नाही. व्यवहारातसुद्धा आपल्याला पैसेवाल्या मित्रासोबत राहायला आवडतं. परंतु, त्याने तो पैसा गैरमार्गाने मिळवल्याचं जेव्हा सिद्ध होतं आणि तो अडचणीत येतो, तेव्हा एकेक मित्र त्याच्यापासून दुरावत जातो. जोवरी पैसा, तोवरी बैसा... दुसरं काय!

हेच पाहा ना, सोन्याचं नाव घेतल्यावर आपल्या डोळ्यांपुढं ग्रॅम आणि तोळा यापेक्षा मोठी परिमाणं येत नाहीत. परंतु, एखाद्याच्या घरात किलोच्या हिशेबात सोनं सापडलं तर त्या बातमीकडे आपण डोळे विस्फारून पाहतो. आय मॉनेटरी अ‍ॅडव्हायजरी म्हणजे आयएमए पॉन्झी घोटाळ्यातला मुख्य आरोपी मन्सूर खान दुबईहून दिल्लीत आला आणि त्याला अटक झाली. बंगळुरूतल्या त्याच्या घरावर छापा पडला तेव्हा तीनशे तीन किलो म्हणजेच तब्बल तीन क्विंटलपेक्षा जास्त सोनं सापडलं. या महाशयांनी ते कुठे लपवून ठेवलं असेल, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. पठ्ठ्यानं स्वीमिंग पुलाच्या तळाखाली हे सोनं लपवून ठेवल्याचं आढळलं. या मन्सूर खानवर तीस हजार लोकांना फसवल्याचा आरोप आहे. परंतु, बातमी पाहताना आपल्याला ही तीस हजार माणसं दिसत नाहीत. दिसतं ते फक्त सोनं. फसवणारा दोषी आहेच; परंतु फसणाराही तेवढाच दोषी ठरतो. फसवणूक करणारा आपले पैसे घेऊन फरार झाला की, मगच आपले डोळे उघडतात. तोपर्यंत फक्त झगमगाट आपल्याला दिसत असतो.

श्रीमंती पाहण्याची सवय एकदा जडली की, सुख आणि समाधान यातला फरक धूसर होतो. घराच्या बाबतीत आपण वन-बीएचके किंवा टू-बीएचकेची स्वप्नं रंगवत असतो; पण निक जोनास आणि प्रियांका चोप्रा यांनी त्यांचं पाच बेडरूमचं घर लहान पडतं म्हणून 6.9 दशलक्ष डॉलर्सला कसं विकलं आणि दोन कोटी डॉलर बजेट ठेवून आणखी मोठं घर ते कसं शोधतायत, याची बातमी आपल्या आकर्षणाचे केंद्र ठरते. नेमका इथंच घोटाळा होतो.