अंधश्रद्धेचे बळी

Last Updated: Nov 06 2019 1:57AM
Responsive image


विजयालक्ष्मी साळवी

श्रद्धा आणि अंधश्रद्धा या गोष्टी व्यक्‍तीच्या विश्‍वासावर अवलंबून असतात. अंधश्रद्धेचा पगडा कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत, कायदे केले जात आहेत. शिक्षणाचा प्रसार झाल्यानंतर हा प्रकार कमी होईल, अशी अपेक्षा असते परंतु जाणिवांचा विकास झाल्याशिवाय अंधश्रद्धेचे बळी जाणे थांबणार नाही. ओडिसातही गंजाम जिल्ह्यात झालेल्या घटनेतून यावरच प्रकाश टाकला जातो आहे की शिक्षण आणि जाणिवांचा विकास झाल्याशिवाय कायदा करूनही अंधश्रद्धेला रोखणे शक्य होत नाही. 

ओडिसाच्या गंजाम जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. त्यामध्ये सहा ज्येष्ठ नागरिकांबरोबर ज्या प्रकारचे वर्तन करण्यात आले त्यामधून हीच गोष्ट स्पष्ट होते की विकासाच्या कितीही गप्पा मारल्या तरीही सामाजिक पातळीवर मात्र आपण आजही खालच्या पायरीवर उभे आहोत. ओडिसाच्या गंजाम जिल्ह्यात गोपूरपूर गावात तीन महिलांचा मृत्यू झाला तर सात जणी आजारी होत्या. त्यामुळे काही लोकांच्या मते जादूटोणा करणार्‍या लोकांमुळेच हे सर्व घडते आहे. त्याच संशयातून लोकांना गावातील सहा वृद्ध व्यक्‍तींवर माणुसकीला तिलांजली देत अत्याचार केला आहे. या लोकांना घरातून बाहेर खेचून काढले, निदर्यीपणे त्यांना मारहाण केली, त्यांचे दात उचकटले आणि त्यांना मानवी विष्ठा खाण्यास भाग पाडले. 

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ह्या पीडित व्यक्‍ती मदतीची याचना करत ओरडत होते. पण गावातील कुणाही व्यक्‍तीने हल्लेखोरांना रोखले नाही किंवा त्यांना रोखण्याची गरजच कोणालाही वाटली नाही. या भागातील लोक शिक्षणापासून लांब आहेत का, जाणीव जागृतीच्या पातळीवर इतके मागासलेले आहेत का, की त्यांना या घटनेत हस्तक्षेप करावा असे वाटू नये किंवा ही घटना रोखणे आपली जबाबदारी आहे असे वाटू नये. या घटनेची माहिती पोलिसांना कळल्यावर त्यांनी काही लोकांना अटक केली मात्र बाकीचे लोक पळून गेले. 

काहींना अटक झाली. इतरांचा शोध घेतला जाईल मात्र जाणीवजागृती आणि माहितीचा अभाव असल्याने लोकांमध्ये अंधश्रद्धा वाढते आणि लोक संशयावरून कोणालाही मारहाण करतात, अगदी त्याचा जीव घेतात. त्यांच्याशी अमानवी वर्तणूक करतात, या सर्वाला कोण जबाबदार आहे? पण वास्तव वेगळेच आहे. जादूटोणा केला किंवा काळी जादू केली या संशयातून एखाद्या व्यक्‍तीवर हल्ला करणार्‍या व्यक्‍तींना असे कृत्य केल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल आणि त्यांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल, याची काही फिकीर नसते किंवा चिंता नसते. 

अर्थात इतर कोणत्याही गुन्ह्यामध्ये गुन्हेगाराला कायद्याची भीती असतेच असे नाही. मात्र वरील प्रकारच्या घटनांमध्ये जादूटोणा करणे, जाखीण, डाकीण असणे या गैरसमजुतीतून होणार्‍या गुन्ह्यांच्या घटनांचे कारणच अंधविश्‍वास आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की इतर गुन्ह्यांमध्ये होते तशी कायदेशीर कारवाई या प्रकरणांमध्येही होते पण या अंधविश्‍वासाच्या मुळावर घाव घातला जात नाही. जेणेकरून भविष्यात लोक त्यापासून मुक्‍त होतील. अनेक राज्यांमध्ये अंधश्रद्धाविरोधी कायदे आहेत. मात्र जोपर्यंत लोकांमध्ये याविषयीची जाणीवजागृती होत नाही तोपर्यंत यावर कोणताही ठोस उपाय करणे अवघड आहे. 

देशातील विविध भागांमध्ये अंधश्रद्धेतून होणार्‍या अमानवी घटना आणि गुन्हे समोर आले आहेत, येतही आहेत. मात्र हे गुन्हे थांबवण्यास पोलिस आणि सरकार या दोघांनाही अपयश येत आहे. सामाजिक पातळीवर काही ठोस परिणाम होईल, लोकांना कायद्याचे भय वाटेल असे कोणतेच पाऊल का उचलले जात नाही. काही संघटना अंधश्रद्धेविरोधात लोकांमध्ये जाणीव जागृती निर्माण करण्याचा प्रयत्नही करतात. मात्र त्यांच्याही काही मर्यादा असतात. आपल्याकडे आजही धर्म, परंपरा, रूढी किंवा श्रद्धा यांच्या नावाखाली अंधश्रद्धेचा बाजार भरवला जातो. त्याचा त्रास समाजातील दुर्बल वर्गातील काही लोकांना भोगावा लागतो. दुर्दैवाची गोष्ट अशी की विकास झाल्याचे दावे केले जात असताना आजही समाजात अशा प्रकारच्या घटना घडताहेत. त्या पाहता वैज्ञानिक द‍ृष्टिकोन, जाणीव निर्माण करणारी शिक्षण प्रणाली आणि जाणीवजागृती कार्यक्रम एखादे अभियान स्वरूपात देशभर राबवावे याची सरकारला गरज वाटत नाही. वास्तविक जाणिवेच्या पातळीवर समाजातील हा मागासलेपणा आपण गाठलेला विकास आणि सर्व शैक्षणिक प्रगतीला निरर्थक ठरवत आहे.