Mon, Jan 20, 2020 18:35होमपेज › Crime Diary › चोरी आणि इनाम

चोरी आणि इनाम

Last Updated: Jan 14 2020 8:10PM
सत्यजित दुर्वेकर

आपण श्रीमंत व्हावं, असं कुणाला वाटत नाही? सगळ्यांनाच वाटतं; पण एखाद्याला श्रीमंत व्हावं असं का वाटतं, हा प्रश्‍न विचारला तर बर्‍याच जणांना पटकन उत्तर देता येणार नाही. आपल्याला कोणत्याही अडचणी येऊ नयेत, सर्व सुखोपभोग घेता यावेत, मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, पुढच्या पिढीचं आयुष्य सुखाचं जावं, यासाठी श्रीमंत व्हावंसं वाटणं स्वाभाविक आहे; पण श्रीमंतीची इच्छा बाळगण्याचं आपल्याकडे आणखीही एक विचित्र कारण आहे. ते म्हणजे, श्रीमंतीचं प्रदर्शन करावंसं वाटणं. सगळ्यांनी आपला थाटमाट पाहावा, असं वाटणं. श्रीमंती वंशपरंपरेनं आली असेल, तर तिचं प्रदर्शन करण्यात संबंधितांना फारसा रस वाटत नाही. परंतु, नवश्रीमंतांना किंवा ध्यानीमनी नसताना अचानक घबाड सापडून श्रीमंत झालेल्यांना ही इच्छा फार! अशा व्यक्तींना मग कोणत्या कारणासाठी किती खर्च करावा, याचं भान राहत नाही. 

चैनीच्या वस्तू गरजेच्या वाटू लागणं एकवेळ आपण समजू शकतो. परंतु, गरजेच्या वस्तूही अशा मंडळींना चैनीच्या वाटू लागतात. वस्तूचा उपयोग काय आहे आणि आपण करतो कशासाठी, हेही त्यांना कळेनासं झालेलं असतं. आता हेच पाहा ना, सामान्यतः घरात पैसाअडका, सोनंनाणं, महागमोलाच्या चीजवस्तू असतील, तर लोक आपल्या घराची सुरक्षितता भक्कम करतात, चांगल्या प्रतीची कुलपं लावतात, सिक्युरिटी गार्डची नियुक्ती करतात किंवा मग एखादा गलेलठ्ठ कुत्रा पाळतात.

कुत्रा पाळण्यामागं सामान्यतः ‘सुरक्षितता’ हाच हेतू असतो. किंबहुना तो असणं अपेक्षित असतं. परंतु, अनेकजण शौक म्हणून कुत्रा पाळतात. त्यालाही हरकत असण्याचं कारण नाही. मांजरी ज्याप्रमाणं शोभेसाठी पाळली जाते, तसा कुत्रा पाळणंसुद्धा गैर नाही. परंतु, चोरांपासून घराची राखण करणं हा मूळ हेतू दूर ठेवला तरी खुद्द कुत्राच चोरीला जाऊ नये, एवढी तरी अपेक्षा करावी की नाही? हल्ली कुत्र्यांच्या वाढलेल्या किमती आणि त्यांच्या खरेदी-विक्रीचा विस्तारलेला व्यवसाय हा स्वतंत्र विषय आहे; पण कुत्रा (नव्हे कुत्री) हरवल्यानंतर शोधून देणार्‍याला एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर झाल्याचं वाचून खरोखर धक्का बसला. संपूर्ण बातमी वाचल्यावर हे लाखाचं इनामसुद्धा किरकोळच वाटू लागलं. 

कारण, हरवलेल्या कुत्रीची किंमत आहे तब्बल आठ कोटी रुपये! बेंगळुरू शहरातल्या एका शौकिनाची ही कुत्री आहे. ती त्यानं खास चीनमधून आणलीय म्हणे! खरेदी केल्यावर त्यानं ती दुसर्‍या एका शौकिनाला सांभाळायला दिली. या दोघांमध्ये झालेला करारसुद्धा अजबच! संबंधित कुत्रीला पिलं झाल्यानंतर सांभाळणार्‍यानं त्यातलं एक पिलू स्वतःकडे ठेवायचं आणि उर्वरित पिल्लं मूळ मालकाला द्यायची. कारण तिच्या पिलांनासुद्धा प्रत्येकी दोन लाख रुपये किंमत मिळते म्हणे! 

चीनमधून आणलेली अलास्कन जातीची ही महागडी कुत्री कुणी चोरून नेली, याचा छडा अजून लागलेला नाही; पण या प्रजातीच्या कुत्र्यांची किंमत काय असते, असं विचारणारा एक फोन आल्याचं मालकानं सांगितलं. फोन करणार्‍याला कुत्री सापडली असेल आणि मालकानं त्याला खरी किंमत सांगितली असेल, तर लाखाचं इनाम गेलं पाण्यात! देशात अधूनमधून दिल्या जाणार्‍या स्वदेशीच्या नार्‍यांच्या पार्श्‍वभूमीवर परदेशी वस्तू आणि परदेशी कुत्र्या-मांजरांबद्दलचं हे श्रीमंती प्रेम थक्क करणारं!