लाल गुलाब

Last Updated: Oct 02 2019 2:01AM
Responsive image

ज्ञानेश्‍वर म. कुलकर्णी


‘साहेब, तो तिला कॉलेजात जाताना नेहमी लाल गुलाबाचे फूल भेट देत होता. त्यावरून आम्ही तिला चिडवले होते.’
पोलिसांना धागा मिळाला होता. तो धागा पकडून त्यांनी त्याचा शोध सुरू केला होता. त्याने आपले नाव खोटेच सांगितले होते. 
तिने आज शुभ्र सलवार-कमीज परिधान केली होती. शुभ्र वस्त्रातील पूजा अगदी स्वर्गातून धरतीवर उतरलेल्या परीसारखी दिसत होती. नुकत्याच उमललेल्या गुलाबी फुलासारखी ती टवटवीत दिसत होती. हातातील वही आणि हवेवर उठणारी ओढणी सांभाळत ती झपाझप पाऊले टाकीत कॉलेजला निघाली होती. ती आज खुशीत होती. पुढे काय घडणार आहे याची तिला क्षणभरही कल्पना नव्हती. पुढे काळ रूपाने तिची वाट पाहत तो उभा होता. अगदी सावज टिपण्याच्या तयारीत!
चौकातून ती पुढे आली आणि अचानक तो समोरून आला. तिने त्याला ओळखले. त्याच्या हातातील चाकू पाहून ती प्रचंड घाबरली. काही बोलायच्या अगोदरच त्याने तिच्या पोटात चाकू खुपसला! ती धाडकन् खाली कोसळली आणि त्याने चपळाईने तेथून पलायन केले. सारे काही क्षणातच घडले होते.
आपली लाडकी लेक अशी अचानक गेल्यामुळे तिच्या आईवडिलांना, तिच्या भावाला जबरदस्त धक्‍का बसला होता. तिच्या आठवणीने ते सारे व्याकुळ झाले होते. इन्स्पेक्टर वागळे आणि इन्स्पेक्टर पाटील त्यांच्या घरी चौकशीला आले होते. वागळे म्हणाले,
‘माधवराव, आम्हाला कल्पना आहे तुमच्या  दु:खाची, पण आम्हाला कर्तव्य पार पाडावे लागत आहे. तुमची हरकत नसेल तर प्रश्‍न विचारेन.’
‘वागळे साहेब, तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडा.’
‘मला पूजाच्या मित्र-मैत्रिणींची नावे सांगा. तिच्याशी कोणाचे भांडण झाले होते का?’
‘पूजा आनंदी आणि शांत स्वभावाची होती. मित्र-मैत्रिणीत आनंदात होती. तिला कोणी शत्रू नव्हताच. कोणाशीच ती भांडत नव्हती. हुशार आणि गुणी होती माझी मुलगी.’
आणखी काही माहिती विचारून वागळे आणि पाटील हे पूजाची खास मैत्रीण असलेल्या गौरीच्या घरी गेले. तेथे पूजाचा मित्र अमरसुद्धा आला होता. इन्स्पेक्टर पाटीलनी पूजाविषयी विचारताच अमर म्हणाला,
‘साहेब, आमच्या कॉलेजची शान होती ती. प्रत्येक कार्यक्रमात तिचा सहभाग असायचा.’
‘ती कोणाच्या प्रेमात पडली होती काय?’
‘नाही साहेब, ती सर्वांची मैत्रीण होती. गोड हसायची, गोड बोलायची. दिसायलासुद्धा रुपवान होती पण रूपाचा गर्व नव्हता तिला.’
‘कदाचित त्याच रूपाने तिचा घात केला असावा.’
‘याचा अर्थ नाही समजला साहेब.’
‘अरे काहीवेळा सौंदर्यसुद्धा शाप ठरते मुलींना.’
वागळेंनी गौरीला विचारलेली माहिती तिने सविस्तर दिली होती. ती म्हणाली,
‘साहेब, आमच्या कॉलेजमधील कोणीही असे करणार नाही. एखाद्या माथेफिरूचे हे काम असावे.’
‘आम्ही त्या माथेफिरूला लवकरच शोधून काढू.’
असे म्हणून ते दोघे तेथून बाहेर पडले होते. पूजाच्या मैत्रिणी आणि मित्र यांची भेट घेऊन त्यांनी माहिती मिळवली होती. इन्स्पेक्टर पाटील म्हणाले,
‘वागळे साहेब, ही मुले निरापराधी वाटतात. आपण उलटसुलट प्रश्‍न विचारले पण काहीच उपयोग झाला नाही.’
‘पाटील, त्यांच्या बोलण्यावर जाऊ नका. लोक पद्धतशीरपणे धडधडीत खोटे बोलतात.’
‘पण त्यांच्या चेहर्‍यावरून तरी...’
‘पाटील, लोक चेहरे बदलतात. मुखवटे घालून हिंडणारे अनेक असतात. या मुखवट्याआड लपलेला गुन्हेगार आपणाला शोधायचा आहे.’
सगळीकडे शोधूनसुद्धा गुन्हेगार सापडत नव्हता. नातलग, मित्र, मैत्रिणी, शेजारी असा सर्वत्र शोध घेतला होता पण गुन्हेगार गायब झाला होता. तिचे जे मित्र गावी गेले होते तिथेसुद्धा पोलिस जाऊस पोहोचले होते, पण पदरी निराशाच आली होती.
पुन्हा चौकशी करीत असताना पूजाची मैत्रीण रूपा म्हणाली, 
‘साहेब, ती सहसा चिडत नव्हती. आम्ही खूप चिडवायचो तिला. पण एकदा मात्र चिडली होती.’
‘कशाबद्दल ती चिडली होती?’
‘तिच्या बागेत काम करणारा एक गावंढळ मुलगा पूजाला ती कॉलेजला येताना नेहमी एक लाल गुलाबाचे फूल भेट द्यायचा. त्यावरून आम्ही तिला एकदा-दोनदा चिडवले होते. त्यावेळी ती चिडली होती.’
‘काय म्हणाली होती.’
‘ती म्हणाली, उगाच फालतू बडबडू नका. मला असली चेष्टा आवडत नाही.’
वागळे आणि पाटील पुन्हा पूजाच्या घरी येऊन पोहचले होते. वागळे म्हणाले,
‘माधवराव, तुम्ही अपूर्ण माहिती का दिलीत?’
‘काय झाले? आणखी काय सांगणार आम्ही?’
‘तुमच्या बागेची देखभाल करणारा कोण मुलगा आहे? त्याच्याबाबत सांगा.’
‘अहो तो कर्नाटकातून आलेला गरीब मुलगा आहे.’
‘त्याचे नाव गाव माहीत असेलच.’
‘नाही हो, गाव नाही माहीत. पण त्याचे नाव केशप्पा आहे.’
‘पूर्ण चौकशी न करता बागकाम करण्यासाठी कसे नेमले त्याला?’
‘साहेब, तो अतिशय प्रामाणिक, कष्टाळू तरुण आहे. फारच गुणी आहे तो. सांगेल ते काम करतो.’
‘तो किती गुणाचा आहे ते आम्ही शोधूच. आहे कोठे तो. बोलवा त्याला.’
‘साहेब, तो गावी गेलाय त्याच्या.’
‘कधी गेलाय गावी?’
‘ही दुर्दैवी घटना घडल्याच्या आदल्यादिवशीच गेलाय तो.’
‘असा अचानक का गेला गावी?’
‘साहेब, त्याचे वडील आजारी असल्याचे समजताच तो निघून गेला.’
‘पैसे मागितलेच असणार त्याने.’
‘साहेब, पैशाची गरज होती त्याला. आम्हीच त्याला थोडी जास्तच रक्‍कम दिली होती.’
‘आम्हाला त्याला भेटायचे आहे. पण शोधायचे कोठे? तुम्ही तर त्याचे गावसुद्धा विचारले नाही.’
‘साहेब, तो फारच चांगला मुलगा आहे. शंका घेऊ नका त्याची.’
‘त्याच्या बोलण्यातून गावाचा उल्लेख झाला होता काय?’
‘साहेब, त्याचे गाव ठाऊक नाही. पण बेळगावात शामलाल शेटजींच्या सराफी दुकानात तो कामाला होता असे बोलला होता.’
विलंब न लावता इन्स्पेक्टर वागळे आणि इन्स्पेक्टर पाटील यांनी बेळगाव गाठले. तेथील पोलिसांच्या मदतीने ते शामलाल यांच्या दुकानात गेले. शामलाल म्हणाले,
‘होय, एक महिना होता माझ्या दुकानात झाडलोट करायला. पण याचे नाव केराप्पा नाही. त्याने आम्हाला बाळगोंडा असे नाव सांगितले होते.’
‘तुम्हीसुद्धा त्याची फारशी चौकशी न करता तुमच्या दुकानात कसे काय कामाला ठेवले होते?’
‘साहेब, तो मोठमोठ्यांच्या ओळखी सांगत होता. आमचा नोकर निघून गेला होता म्हणून तात्पुरते त्याला काम दिले होते. पण त्याची भिरभिरती नजर मी ओळखली आणि त्याला कामावरून काढून टाकले होते.’
चौकशी करून शोध घेत घेत वागळे आणि पाटील त्यांच्या गावी येऊन पोहोचले होते. तो गावी येऊन लगेच सोलापूरला गेला होता अशी माहिती मिळाली. इन्स्पेक्टर वागळेंनी सोलापूर गाठले आणि तेथे त्याचा शोध सुरू होता. रात्रीच्या अंधारात सोलापूर स्टेशनवर छापा टाकून पोलिसांनी त्याला पकडले. पोलिसांचा प्रसाद मिळताच त्याने गुन्हा कबूल केला होता.
‘बोल, तू असे का केलेस?’
‘साहेब, मी तिला ठार मारणार नव्हतो. मी तिला नेहमी गुलाबाचे लाल फूल देत होतो. माझ्याशी लग्‍न कर म्हणत होतो. पण हे ऐकून ती माझी चेष्टा करायची. मी दिलेले फूल तिने चुरगाळले. पायाखाली घातले आणि मला स्पष्ट नकार दिला. माझी चूक झाली. मी तिला ठार मारले.’
पोलिसांनी त्याला बेड्या ठोकूनच आणले आणि त्याची रवानगी तुरुगांत झाली. माधवराव  भेटताच इन्स्पेक्टर म्हणाले,
‘माधवराव, आता रडून काय उपयोग? आपल्या घरी किंवा दुकानात एखाद्या नवीन व्यक्‍तीला काम देण्यापूर्वी त्याची सर्व चौकशी करायला पाहिजे. आपण त्याच्या गोड बोलण्यावर विश्‍वास ठेवतो आणि असे घडते. नाव बदलून चोर्‍यासुद्धा करतात हे लोक. समाजात अशा घटना घडतात. यातून समाजाने संदेश घेतला पाहिजे.’ 
माधवरावाना त्यांचे बोलणे पटले होते. पण खूप उशीर झाला होता