Mon, Apr 06, 2020 11:13होमपेज › Crime Diary › गुंता प्रेमाचा

गुंता प्रेमाचा

Last Updated: Mar 04 2020 1:34AM
डी. एच. पाटील, म्हाकवे, कोल्हापूर

यंदा पाऊस भरपूर झाला होता. साहजिकच उसाचे पीक तालेवार आले होते. सगळीकडे उसाचा गळीत हंगाम जोरात सुरू होता. सुधारित जातीचे ऊस चांगल्या प्रमाणात पोसले होते. नानाचा ऊस बावीस पेरापर्यंत वाढला होता. नाना यंदा खूश होता. नाना प्रगतशील शेतकरी असल्याने शेतात वेगवेगळे प्रयोग राबवत होता. आज नानाच्या उसाला तोडणी आली होती. रात्रीच साखर कारखान्याचा चिटबॉय येऊन तोडणीची चिठ्ठी देऊन गेला होता.  बीडवरून आलेली तीन जोड्यांची टोळी होती.

नाना सकाळीच रानात आला. थंडीच्या गारव्यात सकाळी धुके सोनेरी शाल पांघरूण आलेले. नाना रगाची भाळ मारून शेकोटीजवळ शेकत बसला होता. पण अजून तोडणी कामगारांचा पत्ताच नव्हता. थोड्यावेळाने चिटबॉय आला अन् तोड पुढे गेल्याचे त्याने सांगितले. 

तोड रद्द झाल्याने मग ऊस वाळू नये म्हणून शेतात पाणी सोडण्यासाठी नानाने विहिरीवरची मोटर सुरू केली. उंच ऊस असल्याने फडात शिरून पाणी सोडणे अशक्य होते. नानाने बाहेरूनच पाणी सोडले. आतल्या पाटात पाणी मोडत असतानाच एक कोल्हा बाहेर पडला. नानाचे लक्ष जसे आतमध्ये गेले तसा नानाच्या अंगाचा थरकाप उडाला. पाटाचे पाणी पाटातच सोडून नानाने घर गाठले.  

नानाच्या शेतात मृतदेह सापडल्याची बातमी गावभर पसरली.  जो-तो नानाच्या शेताकडे धावू लागला. बघता बघता  सारा शिवार माणसांनी फुलून गेला. नानाच्या शेतात कुणा एका तरुणीचा मृतदेह पडलेला दिसत होता. मृतदेह सडून केवळ हाडाचा सांगाडा दिसत होता; तर अंगावर असणार्‍या साडीवरून तो मृतदेह कुणा बाईचा असल्याचे ओळखत होते. 
आता ऊन बरेच झाले होते. माणसे झाडांची सावली डोक्यावर घेऊन पोलिसांची वाट पाहत होते.

घटनास्थळी पोलिस दाखल झाले. फडात शिरून पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. मृतदेहावर असणारी साडी, कर्णफुले पोलिसांनी जप्त केली. हाडांचा सांगाडा शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. आता फडात पोलिस शोध घेऊ लागले. संपूर्ण फड पोलिसांनी पालथा घातला. उसाची सरी अन् सरी तपासून काढली.  नानाच्या विहिरीजवळ तपासणी केली; पण काहीही हाती लागले नाही. शेजारच्या शेतामध्येही तपासणी केली; मात्र काहीच पुरावा पोलिसांना मिळाला नाही.  

पोलिसांनी गावात येऊन मयत महिलेच्या अंगावर असणारी साडी दाखविली. दोन गल्लीच्या त्या छोट्या गावात ती साडी कुणाच्याही ओळखीची नव्हती. मग जवळच्या पाच-दहा गावात साडी दाखवून मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न केले.  मात्र तिथेही पोलिसांना अपयश आले. चार दिवस होऊनही मृतदेहाची ओळख पटत नव्हती.  वैद्यकीय अहवालानुसार मयत महिलेचा गळा दाबून खून करण्यात आला होता. तर खून होण्यापूर्वी तिचा कुणाशीतरी  शरीरसंबंध झाला होता. यामुळे आरोपी हा मयत महिलेच्या परिचयाचा होता, असा पोलिसांनी अंदाज बांधला. दहा गावातील कोणी महिला बेपत्ता आहे का? कुठे मिसिंग नोंद आहे का? याची चौकशी केली; मात्र कुठेच मिसिंग नोंद नव्हती.

आठवडा उलटला तरी ओळख पटली नाही. पोलिसांनी जप्त केलेली साडी  व  कर्णफुले पुन्हा बारकाईने पाहिली. साडीच्या दुकानात जाऊन चौकशी करण्यात आली.  मात्र सर्वच दुकानदारांनी ‘या प्रकाराची साडी आपल्या भागात भेटत नाही. अशा साड्या परभणी भागात मिळतात.’ असे सांगितले.

कर्णफुले विकणार्‍या दुकानात चौकशी करण्यात आली. तिथेही हा माठ परभणी भागात मिळत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मयत महिला ही ऊसतोड मजूर होती, हे निश्चित झाले. 
पोलिसांनी परभणी गाठली. तिथे प्रत्येक पोलिस ठाण्यात मिसिंग संदर्भात चौकशी करण्यात आली.  सगळ्या पोलिस ठाण्यात अशी कोणतीही महिला बेपत्ता असल्याची फिर्याद नोंद नव्हती. त्यामुळे खबर्‍यामार्फत चौकशी सुरू केली. चार दिवस तळ ठोकूनही पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. पोलिसांनी मात्र धीर सोडला नाही. एका खबर्‍याने मात्र सुमन व अनिता या दोघी बहिणी या रंगाची साडी नेसत असल्याची खबर दिली.  

पोलिसांनी सुमनच्या घरी चौकशी केली. तर दोघी बहिणी व सुमनचा नवरा - रामा कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडणीसाठी  गेले असल्याचे सांगितले. पोलिस पुन्हा माघारी फिरले. सुमनच्या घरी म्हातारे सासू-सासरा होते. पण त्यांना ते कोणत्या कारखान्यात ऊसतोडणीस गेलेत हे माहीत नव्हते. पोलिसांकडून सर्वच कारखान्यांकडे चौकशी केली. मात्र, नेमका ठावठिकाणा पोलिसांना सापडत नव्हता. नजीकच्या सीमाभागातील कारखान्यावर चौकशी केली. त्या वेळी सुमनचा नवरा पालावर आढळून आला. सुमन दिसून आली नाही.  

पोलिस चौकशी करत असतानाच अनिता तिथे पोहोचली. दोघांनाही पोलिसांकडून धारेवर धरले; मात्र दोघेही सुमन गावी गेल्याचे सांगत होती. पोलिसांना संशय आला. जप्त साडी अनिताला दाखवताच तिने ‘ताई’ म्हणून गोंधळ केला.  पोलिसांनी पुन्हा परभणीत तपासणी केली, तर तिथेही सुमन पोहोचली नव्हती. जर परभणीत तिचा घातपात झाला असेल, तर मृतदेह कोल्हापूरला कसा? हा प्रश्न होता.  

पोलिसांनी मृतदेह सापडला तिथे त्यावेळेस कोणत्या कारखान्याची ऊसतोड सुरू होती, याची माहिती गोळा करण्यासाठी पथक नेमले. त्या वेळी वेगळीच माहिती पुढे आली. मुकादमला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या वेळी त्याने सुमन, अनिता व तिचा नवरा सुरेश त्याच टोळीत काम करत होती; मात्र एके रात्री सुमनचा व तिच्या नवर्‍याचा सुरेशचा मोठा वाद झाला. अनिता सुमनला सुरेशसोबत नको त्या अवस्थेत आढळून आली होती. सुमनच्या मागे सुरेशचे अन् अनिताच्या प्रेमाचे चाळे सुरू होते.

पोलिसांनी अनिता व सुरेशला अटक केली. पाहुणचार दिला. मार सहन न झाल्याने ‘होय साहेब, आमच्या प्रेमाखातर आम्हीच तिला मारलं न् मृतदेह उसात टाकला व ती भांडून गावी गेली, असे सांगून या कारखान्यावर तोडणीलाआलो.’

‘मी या वर्षापासून पहिल्यांदाच ऊसतोड मजूर म्हणून सुमनबरोबर आले होते. पुढच्या वर्षी माझे लगीन होणार म्हणून व मला ऊसतोडीची सवय व्हावी म्हणून धाडण्यात आले होते. पण मी दाजीच्या मोहाला फसले अन् प्रेमाच्या गुंत्यात अडकले.’ असे म्हणून अनिता रडू लागली.  
दोघेही जेलची हवा खात आहेत.