हुक्क्याला लगाम लावण्यासाठी...

Published On: Sep 11 2019 2:32AM | Last Updated: Sep 11 2019 2:32AM
Responsive image


संजीव आचार्य

दम मारो दम... या गाण्यावर झिंगणारी तरुण पिढी पाहिली की, पालकांच्या मनात कालवाकालव होते. देशातील बहुतांश महानगरात पंचतारांकित हॉटेल्स, पब, क्रुझ सफारी आदी ठिकाणी हुक्कासेवन, नशापान सर्रास आढळून येते. त्यामुळे तरुण पिढी हातची निघून जात असल्याचे विदारक द़ृश्य दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारच्या माध्यमातून युवा पिढी बरबाद करणार्‍या घटकांवर निर्बंध आणले जात आहे. त्याचबरोबर जनजागृती करणेही तितकेच महत्त्वाचे ठरत आहे. अशा स्थितीत हरियाणात हुक्कासेवनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता इएनडीएसवर संपूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अशा प्रकारच्या निकोटिनचे सेवन करताना आढळून आल्यास संबंधिताला तीन वर्षांपर्यंत शिक्षा भोगावी लागणार आहे.

हरियाणात इलेक्ट्रॉनिक निकोटिन डिलिव्हरी सिस्टीमवर संपूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जर एखादा व्यक्ती या प्रकारचे हुक्कासेवन करत असेल तर त्याला तुरुंगावास भोगावा लागणार आहे. त्याचबरोबर एक लाखांच्या दंडाचीही तरतूद केलेली आहे. या अगोदर काही महिन्यांपूर्वी तंबाखू उत्पादनावर बंदी घालण्यात आली होती. असे असतानाही हुक्का प्रथेवर बंदी घालण्यासाठी हरियाणाने केंद्राचे दार ठोठावले होते. त्याचवेळी तंबाखू नियंत्रण मंडळाला पत्र लिहून औषध विभागाने चीनकडून आयात केल्या जाणार्‍या हुक्क्यांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. राज्य औषध नियंत्रक नरेंद्र आहुजा यांनी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय परिषदेतही हरियाणातील वाढत्या हुक्का संस्कृतीची माहिती सादर केली होती. युवकांमध्ये इ-सिगारेटसंदर्भात वाढती क्रेझ लक्षात घेता या प्रकरणात हरियाणाने या प्रवृत्तीला बंदी न घालणार्‍या राज्यालाही जबाबदार धरले होते. कारण या राज्यातूनच हरियाणात मोठ्या प्रमाणात हुक्का पोचवला जातो. प्रारंभीच्या काळात बहुतांश युवक ए-सिगारेट आणि इ-हुक्का याचा वापर केवळ देखाव्यासाठी करतात. अन्य अंमली पदार्थ किंवा तंबाखूच्या तुलनेत इ-सिगारेट किंवा हुक्का कमी हानिकारक आहे, असा काहींचा भ्रम आहे. त्यामुळे काही युवक इ-सिगारेटच्या आहारी जातात. परिणामी ए सिगारेटपासून सामान्य सिगारेटकडे ते वळतात. एका संशोधनानुसार इ-सिगारेटने लोकांत अस्थमा, फुफ्फुसामध्ये संसर्ग, हदयविकार, कर्करोग यासारखे जीवघेणे आजार बळावतात.  

27 टक्के उत्पादनात शरीराला हानिकारक ठरणारे अँडोटॉक्सिन आढळून आले आहे. हे एक मायक्रोबियल एजंट आहे. 81 टक्के उत्पादनात ग्लूकनचे कण आढळून आले असून ते बहुतांश फंगसच्या कोशिकांमध्ये आढळून येतात. यावरून इ-सिगारेटची भयानकता लक्षात येते. या अनुषंगाने गेल्यावर्षी केंद्र सरकारने सर्व राज्यांंना सूचना देत इ-सिगारेट, इ-शीशा आणि फ्लेवर्ड हुक्का विक्री, उत्पादन आणि परिवहनावर बंदी घालण्याचे निर्देश दिले होते. सरकारकडून अंमली पदार्थ, हुक्का, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांना पायबंद घालण्याचे प्रयत्न केलेले जात असताना पालकांनीही जागरूक राहणे तितकेच गरजेचे आहे. आपल्या पाल्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवल्यास त्याचे पाय वाकडे पडणार नाहीत. तसेच तरुणांनीही समाजातील अपप्रवृत्तींपासूनच चार हात दूर राहण्याबाबत सजग असणेही तितकेच गरजेचे आहे. ‘नाइट लाईफ’ जगतानाही जबाबदारीने वागणे तेवढेच आवश्यक आहे.