Tue, Sep 22, 2020 05:45होमपेज › Crime Diary › भुते आली भुतेऽऽ

भुते आली भुतेऽऽ

Last Updated: Jun 02 2020 9:56PM
ज्ञानेश्‍वर म. कुलकर्णी, कोल्हापूर

दोन पांढरी भुते त्याच्या समोरून रस्ता ओलांडून गेली. भिकू ओरडला आणि मागे पळाला.  मागे पाहतो, तर काय? त्याच्या मागे तीन पांढर्‍या आकृत्या उभ्या होत्या!
भिकू घाबरला आणि पुढे धावत सुटला. एका भुताला धडकून तो खाली पडला!

दिवस मावळताच शेतात काम करणार्‍या मजुरांनी काम थांबवले होते. दिवसभर शेतात राबून त्यांचे अंग मोडून गेले होते. आज शनिवारचा दिवस होता. आज त्यांच्या पगाराचा दिवस होता. शेतमालक त्यांना आठवड्याचा पगार प्रत्येक शनिवारी न चुकता देत होता. कोणाला गरजेसाठी आगावू पैसेसुद्धा देत होता. सदाशिवरावांनी माणसे जोडली होती. त्यांना मजुरांची  उणीव कधी भासली नव्हती. भिकू सदाशिवरावांचा मर्जीतला गडी होता. इतर मजुरांच्या कामावर तोच लक्ष ठेवत असे. मालकांची घरची कामेसुद्धा तो करीत असल्याने मालक त्याला जादा मजुरी देत असत. भिकूला मालकांनी जेवायलाच  थांबवले होते. पोटभर जेवण झाल्यावर भिकू तेथून बाहेर पडणार होता. मालक म्हणाले, ‘भिकू, अरे रात्रीचे दहा वाजलेत. अंधारातनं कुठं जातोस तंगड्या तोडत. आज रहा इथंच. सकाळी लवकर जा चहा घेऊन.’
‘नको  मालक, बायकू वाट बघत असंल. पोरंबी वाट बघतील. मला आता परवानगी द्या.’
‘अरे पण अंधार पडलाय.’
‘रोजचा रस्ता हाय. जातो बिगीबिगी.’
‘तुझी मर्जी, उद्या सुट्टी घ्यायची नाही. लवकर ये.’
‘व्हय मालक.’ भिकू तेथून बाहेर पडला आणि गावाच्या दिशेने निघाला. मालकाचे कौलारू घर मळ्यात होते. त्यामुळे ते तेथेच राहत होते. गावात भिकूला सरपंचांनी आपल्या वाड्याजवळच्या दोन खोल्या रहायला दिल्या होत्या. त्यातच भिकूने संसार थाटला होता. सरपंचाच्या घरची कामे भिकू मोबदला न घेता करायचा. त्याची बायको पारूसुद्धा त्यांच्याकडे धुणे-भांडी करायची. भिकूचा पोरगा आता शाळेत जाऊ लागला होता.
मालकांनी जास्त पैसे दिल्यामुळे भिकू खूश होता. पाऊलवाटेने तो निघाला होता. रात्र असली तरी चांदण्याच्या प्रकाशात तो सावधपणे निघाला होता. पांदीतून जाताना त्याला जरा भीती वाटली. या पांदीमध्ये झाडांची दाटी होती. झाडांची कमान झाल्यासारखी वाटत होती. येथे भुते येऊन नाचतात, असे गावकरी म्हणायचे. पण भिकूला आतापर्यंत तसा अनुभव आला नव्हता. तो पांदीतून जपून सावधपणे जात होता... आणि तेवढ्यात चमत्कार घडला!  दोन पांढरी भुते त्याच्या पुढून रस्ता ओलांडून गेली! 
भिकू घाबरून ओरडला आणि मागे पळाला. मागे पाहतो, तर काय? त्याच्या मागे तीन पांढर्‍या आकृत्या  उभ्या होत्या! भिकू फारच घाबरला आणि पुढे धावत सुटला. एका भुताला धडकून तो पडला! पुन्हा उठून ओरडत धावत सुटला. घरात येईपर्यंत तो ओरडत होता. शेजारी जागे झाले. भिकूने सारा प्रकार सांगितला. गावकरी आश्‍चर्यचकित झाले होते. त्यानंतर पंधरा दिवस भिकू आजारी पडला. रमेशचा मात्र या भुताखेतांवर विश्‍वास नव्हता. रमेशचा जिवलग मित्र अजय हा भुताखेतांवर विश्‍वास ठेवत होता. रमेश आणि अजय जिल्ह्याच्या ठिकाणी नोकरी करीत होते. दोघांना चांगला पगार होता. अनेकवेळा ते मिळूनच गावी यायचे. त्या दोघांनी जिल्ह्याच्या ठिकाणीच संसार थाटला होता; पण दोघांचीही शेती आणि घरे गावाकडे होती.
रविवारी सुट्टी असल्यामुळे त्या शनिवारी अजय आपल्या कारमधून एकटाच गावी निघाला होता. रमेश आज गावी येऊ शकत नव्हता. अजयला तेथून निघायला उशीर झाला होता. जेवण उशिरा झाल्यामुळे निघायला उशीर झाला होता. तो निघाला तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते. पौर्णिमेची रात्र आहे हे नंतर अजयच्या लक्षात आले. त्याचे मन भयभीत झाले होते. बायको ‘थांबा’ म्हणत असूनही आई-वडिलांना भेटण्यासाठी तो गावी निघाला होता. तो गावओढ्याजवळ पोहोचला, तेव्हा तो फारच घाबरला. येथे भुते नाचतात, असे लोक म्हणत होते. गावओढ्याला गुडघाभर पाणी होते. त्याची कार ओढ्यातून जाताना एकदम थांबली. ओढ्यात मोठमोठे दगड पडलेले असल्याने कार तेथे अडकली. अजय कार पुन्हा सुरू करू लागला आणि एकदम त्याचे लक्ष समोर गेले. कारच्या समोरच्या काचेसमोर एक हडळ त्याला दिसली. त्या हडळीचे भयानक तोंड आणि पांढर्‍या रंगाचे केस पाहून तो ओरडला आणि कारचे दार उघडून बाहेर पडला आणि ओरडतच धावत सुटला! त्याच्या मागे पाठलाग करीत दुसरे भूत आले आणि त्याचे पाय पकडून त्याला तोंडावर पाडले. मान वळवून अजयने त्या भुताकडे पाहिले आणि तो बेशुद्ध होऊन पडला.
सकाळी कामावर जाणार्‍या शेतकर्‍याने ओढ्यात अडकलेली कार पाहिली. पुढे येऊन अजयला पाहिले आणि तो ओरडतच गावात आला. तो रमेशच्या घरासमोर आला आणि ओरडू लागला. रमेशच्या वडिलांनी दरवाजा उघडली आणि ते म्हणाले,
‘काय रे किसन, असा का ओरडतोस सकाळी सकाळी.’
‘मालक, घात झालाय. रमेशरावांचा दोस्त अजय गाववड्यात मरून पडलाय.’
‘अरे, काय सांगतोस काय?’
‘मालक, त्यांची मोटारबी हाय ततं. बघातरी जाऊन.’
मग गावकरी तेथे गेले. पोलिस पाटील गेले. त्यांनी इन्स्पेक्टर मोहितेंना तातडीने बोलावून घेतले. फोटो काढले. फिंगर प्रिंटस् घेतले. पंचनामा उरकून घेतला. आता तपासाची जबाबदारी इन्स्पेक्टर मोहिते आणि इन्स्पेक्टर पाटील यांच्यावर आली होती. इन्स्पेक्टर पाटील म्हणाले, ‘मोहितेसाहेब, आतापर्यंत भुताटकीच्या पाच घटना घडल्या आहेत. खरोखर भुते असतील काय?’
‘पाटील, अहो कुठल्या युगात वावरताय तुम्ही? भुतांवर माझा विश्वास नाही.’
‘पण साहेब, या भुतांनी गावकरी घाबरलेत. या पंचक्रोशीत वेगवेगळ्या गावात भुतांचा संचार सुरू आहे. लोकांनी भुतांना पाहिले आहे. ते तशी साक्ष देत आहेत. भिकू थोडक्यात वाचला, पण अजय मरण पावला.’
‘हीच गंभीर बाब आहे. या भुतांचा शेाध लावलाच पाहिजे.’
‘साहेब, एखादे भूत आपल्याच मानगुटीवर बसायचे!’
‘एवढे घाबरता भुताला? तुम्ही पोलिस आहात हे विसरलात काय?’
‘साहेब, मी भुताला नाही घाबरत. समोर आले भूत तर चारी मुंड्या चीत करीन!’
‘शाब्बास!! आता खरे पोलिस इन्स्पेक्टर शोभता. चला, लागू या आपण कामाला.’
इन्स्पेक्टर मोहिते आणि पाटील हे दोघे धाडसी होते. दोघे मित्र होते. ते कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक होते. चार सहा गावांच्या टप्प्यात हा भुताटकीचा प्रकार सुरू होता. लोक घाबरले होते. तुटले जात होते. भुतांचा पत्ता लागत नव्हता. दोन महिने उलटून गेले होते. भुतांचा सुळसुळाट पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी सुरू होता. परंतु या दोघांना भुते भेटत नव्हती. पाटील म्हणाले, 
‘साहेब, भुते  म्हणे आपल्या वाट्याला जात नाहीत?’
‘पाटील, भुते बिलंदर नाहीत, भित्री आहेत. आपणास ती घाबरतात.’
‘आपण काय देव लागून गेलोय!’
‘मग आपण थोडावेळ वर्दी उतरून ठेवू. मगतरी भेटतील की नाहीत भुते?’
‘आता कसं मुद्द्याचं बोललात.’
त्यानंतर इन्स्पेक्टर मोहिते-पाटील सिव्हिल डे्रस परिधान करून तपास करीत होते. एके दिवशी अगदी ठरवून ते दोघे साध्या वेषात आणि साधी कार घेऊन तयारीनिशी अजयच्या गावी निघाले होते.
टिपूर चांदणी रात्र होती. अकरा वाजून गेले होते. थंडगार वारा सुटला होता. रस्त्यावर चिटपाखरूसुद्धा नव्हते. रात्र भयंकर होती. ते जेव्हा गावओढ्याजवळ पोहोचले तेव्हा बारा वाजून गेले होते. त्यांची कार ओढ्यात शिरली आणि समोर रचलेल्या दगडांना थडकून थांबली.
त्याचवेळी एक भूत टपावर चढले आणि लांब पांढरे केस खिडकीकडे येऊन खिड्ड खिड्ड करून हसायला  लागले.
ते दोघे गाडीतून खाली उतरले. गाडीच्या मागेपुढे पांढर्‍याशुभ्र वस्त्रात नाचत असलेली भुते त्यांनी पहिली.आतापर्यंत अशी भुते पाहून लोक ओरडत पळत सुटायचे, पण मोहिते-पाटील घाबरले नाहीत. ते दोघे भुतांना पकडण्यासाठी धावले. मग मात्र त्या भुतांनी त्यांना गराडा घातला आणि किंकाळ्या फोडू लागले. आता ती भुते दोघांच्या अंगावर तुटून पडली. इन्स्पेक्टर पाटील भुतांना धरून आपटत होते, पण त्यांना चार भुतांनी पकडले. मग मारामारी थांबवून इन्स्पेक्टर मोहितेंनी खिशातून पिस्तूल काढले आणि बार उडवला. भुते मागे वळून पळून जाऊ लागली. मोहितेंनी दोन भुतांच्या पायांवर गोळ्या झाडून त्यांना खाली पाडले. उरलेल्या चार भुतांना हातातील दांड्याने ठोकून काढले आणि जेरबंद केले. त्यांना बेड्या ठोकूनच पोलिस ठाण्यामध्ये आणण्यात आले. ऐनवेळी पोलिस गाडी मागवायला मोहिते विसरले नव्हते. गाडी ओढ्यात बंद पडताच त्यांनी पोलिस गाडी मागवली होती.
पोलिस स्टेशनमध्ये आल्यावर त्या भुतांचे खरे चेहरे समोर आले. त्या सहा तरुणांपैकी दोघे जण अल्पवयीन होते. मोहितेंनी विचारले,
‘बोला, तुम्ही असे का करीत होता? आमचा मार तुम्ही खाल्‍ला आहेच. आणखी मार नको असेल, तर कबुली द्या.’
त्यांच्यातला प्रमुख होता राकेश तो म्हणाला,
‘साहेब, आम्ही फक्‍त लोकांना भीती दाखवत होतो. आम्हाला मजा वाटत होती.’
‘साहेब, आम्हाला माफ करा.’
‘तुम्ही लोकांना भीती दाखवली. आजारी पाडले. लूटमार केली आणि त्या अजयचा मृत्यूसुद्धा झाला. तुम्हाला कसं माफ करणार?’
‘साहेब, आमच्यातले दोघे अल्पवयीन आहेत. आम्ही कॉलेजात शिकतो. चांगल्या घरचे आहोत.’
‘म्हणून हे उद्योग करता? लूट केली आहे तुम्ही. तुमच्यामुळे एकाचा मृत्यू झालाय. अल्पवयीन म्हणून तुमची दया कोण करेल? चला आता तुरुगात. बाहेर पडलात तर लोकच तुम्हाला ठार मारतील.’
भुते गजाआड झाली आणि लोकांनी संकट टळले म्हणून गावभर मिठाई वाटली.

 "