लिफ्ट

Last Updated: Mar 17 2020 8:17PM
Responsive image


ज्ञानेश्वर म. कुलकर्णी, कोल्हापूर.

‘हँडसम आहेस, कोणीही सुंदर तरुणी तुझ्यावर फिदा होईल. नाव काय रे तुझे?’
‘मी मोहन. हेच माझे नाव.’
‘अय्या! मी राधा. राधा-मोहन जोडी कशी वाटते?’
‘मस्त आहे जोडी. तुला कोठे सोडू ते सांग.’

रात्रीचे आठ वाजून गेले होते. रस्त्यावर वाहतूक वाढली होती. ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. गर्दीतून वाट काढणे अवघड होत होते. ऑफिसे, कारखाने, छोटे-मोठे उद्योगधंदे, शाळा, कॉलेजेस सुटल्यानंतर बाहेर पडणारे लोंढे गर्दीमध्ये मिसळत होते आणि हा गर्दीचा प्रवाह सर्वत्र वाहत होता.

किशोर या गर्दीतून वाट काढीत आपली कार पुढे नेत होता. तो ऑफिसर होता. स्वतःच्या कर्तबगारीवर पुढे आला होता. आता तो एका मोठ्या इंडस्ट्रिजमध्ये सेल्स डिपार्टमेंटचा प्रमुख झाला होता. तो प्रामाणिक होता. धाडसी होता. कर्तव्यदक्ष होता. सुनंदासारखी सुंदर पत्नी आणि संतोषसारखा गोंडस मुलगा लाभल्याने तो आपल्या कुटुंबात सुखी होता. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्याने कार खरेदी केली होती.

किशोरने आपली कार शहरातील गर्दीतून बाहेर काढली आणि तो वेगाने आपल्या छोेटेखानी बंगल्याकडे निघाला. त्याचा बंगला शहराबाहेरच्या उपनगरात होता. आता गर्दी नव्हती. शांतता होती. गाणे गुणगुणत तो निघाला होता आणि एका वळणावर त्याला ‘ती’ दिसली!

अगदी आधुनिक ड्रेस परिधान केलेली. सिनेमात हिरॉईन शोभावी अशी सुंदरी. ती हातवारे करून लिफ्ट मागत होती. एक सुंदर तरुणी एकांत रस्त्यावर आपल्याकडे लिफ्ट मागते आहे म्हटल्यावर तरुणांची जी अवस्था होते, तीच अवस्था किशोरची झाली. त्याने गाडी थांबविली आणि ती सुंदरी मोकळेपणाने बोलत होती. अवखळपणे हसत होती आणि आपल्या मोहक हालचाली करीत होती. ती किशोरला अगदी चिकटून बसली होती. किशोरची सगळी माहिती गोडगोड बोलून तिने काढून घेतली आणि एकदम तिने आपले रूप बदलले.
‘साहेब, माझी आई आजारी आहे. तुमच्याकडे असणारी सगळी रक्कम मला द्या.’
‘मी तुला मदत करतो.’
त्याने पाकीट काढताच तिने झडप घालून पाकीट आपल्याकडे घेतले आणि ती म्हणाली,
‘आता तो मोबाईल, घड्याळ आणि गळ्यातील चेन माझ्या स्वाधीन करा. हातातल्या सगळ्या अंगठ्यासुद्धा द्या.’
‘असा डाव आहे तर. म्हणजे तू चोर आहेस.’
‘बरोबर ओळखलं. आता सर्व माझ्या हाती द्या, नाहीतर मी ओरडेन. दंगा करेन. लोक जमा होतील आणि तुम्हाला बदडून काढतील. मी तुमच्यावर केस करीन. तुमची नोकरी जाईल.’
किशोर घाबरला. तिची मागणी त्याने पूर्ण केली. मग ती तरुणी खाली उतरली आणि हसत हसत निघून गेली. अनोळखी व्यक्तीस लिफ्ट दिल्याची शिक्षा त्याने भोगली होती.

किशोरने हे सर्व आपल्या पत्नीस सांगितले. तिचा आपल्या पतीवर विश्वास होता. विचार करून त्यांनी याविरुद्ध आवाज उठवायचा निर्णय घेतला. ते पोलिस ठाण्यामध्ये आले आणि घडलेला सर्व प्रकार इन्स्पेक्टर लिमये यांना सांगितला.
ते म्हणाले, ‘तुम्ही दोघांनी तक्रारी नोंदवली हे फार योग्य झाले. अनेकजण असे लुटले गेले आहेत. पण काहीजणांनीच तक्रार नोंदवली आहे. आम्ही अशा लोकांना पकडण्याचा प्रयत्न करीत आहोत. तुम्ही त्या तरुणीचे अचूक वर्णन सांगा. पुन्हा सर्व तपशील सांगा.’

किशोरने सर्व माहिती पुन्हा दिली. तरुणीचे वर्णनसुद्धा सांगितले.  त्यानंतर किशोर आपल्या पत्नीसह तेथून बाहेर पडला. आता त्याला मोकळे मोकळे वाटत होते.
पोलिस तपास चालू होता परंतु हाती यश येत नव्हते. लिफ्ट मागून लुटण्याचे प्रकार सुरूच होते. कधी सुंदर तरुणी लिफ्ट मागून लुटत होती, तर कधी दमदाटी करून रस्ता अडवून टवाळ गुंड लोकांना गाठून लुटत होते. पोलिससुद्धा चक्रावले होते.

...आणि एकदा पुन्हा एक तसाच प्रकार घडला. रात्रीच्या वेळी तो तरुण आपल्या महागड्या कारमधून एकटाच घरी निघाला होता. शहराबाहेरच्या दूरच्या रस्त्याने तो निघाला होता. रस्त्यावर मिणमिणता प्रकाश होता आणि अचानक एका वळणावर उभी असलेली ती रूपवती तरुणी त्याला दिसली. ती लिफ्ट मागत होती. त्या तरुणाने गाडी थांबविली आणि तरुणीला आत घेतले. त्याच्याशी संभाषण सुरू केले. 
ती म्हणाली, ‘हँडसम आहेस, कोणीही सुंदर तरुणी तुझ्यावर फिदा होईल.नाव काय रे तुझे?’
‘मी मोहन. हेच माझे नाव.’
‘अय्या! मी राधा. राधा-मोहन जोडी कशी वाटते?’
‘मस्त आहे जोडी. तुला कोठे सोडू ते सांग.’

‘मला पकडण्याआधी सोडायचा विचार करतोस? ठीक आहे. इथेच मी उतरते. त्या आधी तुझ्याकडे असलेले पैसे, मोबाईल, अंगठ्या, गळ्यातील सोन्यातील चेन माझ्या स्वाधीन कर.’
‘आणि मी ते दिले नाहीतर..!’
‘मग मी मोठ्याने ओरडेन. पुढे गाव आहे. लोक जमा होतील आणि तुला ठोकून काढतील. मी अब्रुनुकसानीचा दावा ठोकेन.’
मोहनने खिशातील पाकीट आणि गळ्यातील चेन तिला दिली. तेवढ्यावर तिचे समाधान झाले नाही. ती म्हणाली,
‘मोबाईल आणि अंगठ्या मुकाट्याने दे.’
‘त्या मिळणार नाहीत.’
‘मग मी खरोखर आरडाओरडा करेन.’
‘काय वाट्टेल ते कर.’

त्या तरुणीने आरडाओरडा सुरू केला. त्या गावातील लोकांनी तरुणीचा आवाज ऐकला आणि रस्त्यावर गाडीसमोर येऊन गाडी अडवली. तरुणीने आपले कपडे फाडले होते. ती ओरडत होती.
‘याने माझ्या अंगावर हात टाकला. गुंड आहे हा.’

काहीही न ऐकता लोक मोहनच्या अंगावर धावून आले. मोहन ओरडून म्हणाला,
‘माझे जरा ऐका. हिनेच मला लुटले आहे.’
ती तरुणी किंचाळली आणि म्हणाली,
‘हा खोटे बोलतो आहे. मी कशी लुटेन या तरुणाला? माझी ताकद तरी आहे का एवढी? यानेच मला लुटले आहे. माझ्याशी फारच वाईट वागला हा.’
लोक मोहनला मारू लागले तेव्हा तो मोठ्यांदा ओरडला, 
‘कोणाला मारत आहात तुम्ही? डोकं ठिकाणावर आहे काय? मी कोण आहे ठाऊक आहे?’
एकजण ओरडला, ‘असा कोण लागून गेलास तू? कोण आहेस तू?’
‘मी पोलिस इन्स्पेक्टर मोहन लिमये! हे बघा माझे आयकार्ड, आता खात्री पटली?’

लोक मागे सरले. तेवढ्यात ती तरुणी मागच्या बाजूने पळत सुटली होती. मोहन तिच्या मागे पळाले. काही लोकसुद्धा त्या बाजूने धावले. सर्वांनी तिला पकडले. आता तिला घाम फुटला होता. ती म्हणू लागली.
‘मला सोडा. मी पुन्हा असे नाही करणार.’
‘असे कितीजणांना लुटले आहेस तू?’
‘साहेब, चूक झाली माझी.’
‘शिकलेली दिसतेस. का करतेस हे उद्योग?’
‘पैशासाठी, फक्त पैशासाठी. मी चोर्‍या कबूल करते. पण मला आता सोडा.’
‘तुझ्या साथीदारांची नावे सांग.’
‘माझे कोणी साथीदार नाहीत.’

‘तू अशी कबूल होणार नाहीस. तुला तुरुंगाची हवा खावी लागणार आहे आता.’
ती तरुणी सुटण्यासाठी धडपड करीत होती. तेवढ्यात त्या ठिकाणी मोटारसायकलीवरून दोन महिला इन्स्पेक्टर तेथे आल्या. इन्स्पेक्टर लिमये म्हणाले,
‘एकजण या तरुणीला घेऊन माझ्या कारमध्ये बसा.’ नंतर ते म्हणाले, ‘इन्स्पेक्टर पाटील, तुम्ही मोटारसायकलीवरून पोलिस ठाण्यामध्ये या.’
ते सर्व जण थोड्याच वेळात पोलिस ठाण्यामध्ये येऊन पोहोचले. इन्स्पेक्टर लिमयेंनी त्या तरुणीचा कबुलीजबाब घेतला. त्यानंतर ते म्हणाले,
‘आता तुझ्या सर्व साथीदारांची नावे आणि पत्ते दे. हे बघ, तू जर पोलिसांना मदत केलीस तर तुझी शिक्षासुद्धा कमी होईल.’
‘साहेब, मी सर्व माहिती देते, पण मला सोडा. मी चांगल्या कुटुंबातील मुलगी आहे. घरचे काय म्हणतील मला.’

‘हे तुला आता सुचते आहे. अनेक तरुणांना तुम्ही लोकांनी लुटले आहे. त्यांचा अपराध काय होता? त्यांनी तुम्हाला लिफ्ट दिली हाच. त्यांचा गुन्हा झाला? यामुळे कोण कोणाला लिफ्ट देईल का?’
‘साहेब, चुकले माझे. पैशासाठी केले सारे.’
‘अगं, पण पैसा कशाला हवा होता तुला?’
‘चैनीची सवय लागली होती. फॅशनचे कपडे, दागिने, हॉटेलिंग या सार्‍यांची चटक लागली होती.’
‘तू गुन्हा केलास. आता त्याची शिक्षा तुला भोगावीच लागेल. तुझे साथीदार सुद्धा आम्ही शोधून काढू.’
ती तरुणी रडू लागली. पण तिने मागितलेली ‘लिफ्ट’ तिला माफ करणार नव्हती...  

टीम ‘जो बायडेन’मध्ये भारतीय वंशाचे २० जण


जो बायडन अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष; कमला हॅरीस उपराष्ट्राध्यक्ष


धनंजय मुंडे बलात्कार प्रकरण ः शरद पवार म्हणाले, 'धनंजय मुडेंवरील बलात्काराच्या आरोपांवर माझा मूळीच विश्वास नाही'


IPL 2021: संजू सॅमसन ‘राजस्थान रॉयल्स’चा कर्णधार


'एमपीएससी'च्या याचिकेमुळे संताप! अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी


शेतकरी आंदोलन : केंद्राची लवचिक भूमिका; शेती सुधारणा कायदे २ वर्षापर्यंत स्थगित ठेवण्याचा केंद्राचा प्रस्ताव!


मराठा आरक्षणावर राज्य सरकार टोलवाटोलवी : आ.शिवेंद्रराजे भोसले यांचा घणाघाती आरोप


हिंगोली : डिग्रसवाणी गावात वंचितने दिला फाॅरेन रिटर्न पीएचडी स्काॅलर उमेदवार अन् आख्खं पॅनेलच गावानं निवडून दिलं


सातारा : वादग्रस्त दगडी खाण अखेर झाली सील


अच्छा चलतै हे हम! अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडले