श्रीराम ग. पचिंद्रे, कोल्हापूर
भयाण अंधार पसरला होता. खरेतर रात्र होती पौर्णिमेची. पण त्या रात्री नभात चमकणार्या तारका या ‘चांदणे’ नव्हत्या. त्या होत्या कराल-विक्राळ दाढा आणि ती पुनवेची रात्र आपला अजस्र जबडा विस्फारून भक्ष्यावर झेपावणार्या एखाद्या महाभयंकर चेटकिणीप्रमाणे पुढे पुढे सरकत होती. वार्याच्या मुखाने भेसूर हसत होती. मानवी जीवनाचे सारे मांगल्य गिळून टाकायला ती सरसावली होती. संजीवनाला स्वाहा करून हलाहलाचा वर्षाव करायला सिद्ध झाली होती.
गावाबाहेरची झोपडपट्टी एखाद्या सुस्त पडलेल्या गलेलठ्ठ अजगराप्रमाणे निपचित पहुडली होती. सारा गदारोळ शांत झाला होता. एक प्रकारचे गूढ वातावरण वस्तीला वेढून राहिले होते. वस्तीला मध्यभागी असलेल्या बाभळीच्या फांदीवर बसून एक घुबड आपले भयानक डोळे विचित्रपणे फिरवीत घूऽऽ घूऽऽ घूऽऽ घूऽऽ करीत होते. त्या बाभळीखालीच एका लहानशा देवळात शेंदूर फासलेला दगड होता. ही मरीमाई, झोपडपट्टीतल्या सगळ्या वडारांचं देवस्थान. याच देवीपुढे कोंबडीपासून रेड्यापर्यंत विविध प्रकारचे बळी दिले जायचे. तेवढ्यासाठीच तिथं बरीच जागा मोकळी सोडली होती. आदल्या दिवशी संध्याकाळी मरीमाईचा उरूस झाला होता. देवीपुढं दोन मस्तवाल रेड्यांचा बळी दिला होता. तिच्यापुढेच रक्ताचे थारोळे आणि हाडांचे सांगाडे पडले होते. दारूची रिकामी पिंपे पडली होती. मरीमाईपुढे एक दिवटी अजूनही ढणढणत होती. त्या उजेडात दिसणारे ते सर्वच द़ृश्य अगदी भीषण दिसत होते. मरीमाईच्या भोवतालची मोकळी जागा संपल्यानंतर समोरच्याच बाजूची पहिली झोपडी रंगीची. या झोपडीत मात्र अजून मध्यरात्र उलटून गेल्यावरही जाग दिसत होती. झोपडीच्या मागच्या बाजूला बरीच दलदल झाली होती. या दलदलीत, एक-दोन दिवसांपूर्वी व्यालेली एक डुकरीण मजेत लोळत होती. तिची पिलावळ तिथेच लोळत होती.
रंगी मोलमजुरी करून आपल्या पोरासह कशीबशी आला दिवस ढकलीत होती. तिचा नवरा मागच्याच वर्षी दारू पिऊन आतड्याला भोक पडल्याने वयाची पस्तिशी उलटण्याच्या आधीच मेला होता. कष्टाची कामे करणार्या रंगीला तीन मुले असूनही तिची सावळी पोप आलेली अंगकांती चांगलीच रससशीत होती. तिचे पिंगट-घारे डोळे सतत एखादा शोध घेत असल्याप्रमाणे विचित्रपणे चमकत असत. तिच्या त्या डोळ्यांत पाहिल्यावर तिच्या अंत:करणात चाललेली खळबळ कुणालाही कळून येई. तिच्या झोपडीच्या पलीकडे थोड्याशा मोकळ्या जागेत काही दिवसांपूर्वी सात-आठ नवीन झोपड्या झाल्या होत्या, जमिनीतून भूछत्रे यावीत तशा. त्यातल्या एका झोपडीत राहणारा काळाप्पा बेरड चांगला धिप्पाड, काळा, राकट, कल्लेदार मिशा असलेला जवान गडी दगड फोडण्याचा भक्कम पोलादी घण घेऊन, तो चालायला लागला म्हणजे बघणार्याला मूर्तिमंत यम असल्यासारखा भासे. हो! तसा काळाप्पा म्हणजे कर्दनकाळच होता. त्याच्या बायकोला क्षय होता. ती लवकर मरत नव्हती म्हणून आपला घण तिच्या डोक्यात घालून तिची त्या रोगातून मुक्तता करूनच हा इकडे आला होता. पोलिसांचा ससेमिरा चुकवत चुकवत.
बस्स् काळाप्पा. या काळाप्पावरच रंगीचा जीव जडला. तिच्या हृदयातील आग उफाळून आली. तिला स्वस्थ बसवेना. वर्षभर दबलेली वासना उसळू लागली. अखेर तिच्या भेदक डोळ्यांनी जादू केली. काळाप्पा तिला वश झाला, पण त्याला ती सर्वस्वी हवी होती. एकटी हवी होती. तिच्या पोराचा उपाशीपोटी केलेला कलकलाट त्याला नको होता. त्याचा आणि रंगीचा बराच खल झाला.
त्या रात्री झोपडीत एक दिवटी ढणढणत होती. मध्यरात्र उलटून गेली तरी रंगी परतली नव्हती. तिची तिन्ही पोरं उपाशी, रडून रडून उघड्या अंगाने जमिनीवर पसरली होती. थंडीने कूडकुडत होती. सकाळपासून पोटात काही नसल्याने झोप येतच नव्हती. मरगळलेल्या अवस्थेत थोरला गोंद्या आपल्या भावंडांना समजूत घालून झोपवताना स्वतःचा हुंदका दाबत होता. आठ-दहा वर्षांचे पोर ते. ते तरी काय करणार? थोड्या वेळाने त्यांचा जरासा डोळा लागला... झोपडीतला अंधार त्यांच्याकडे पाहून स्वतःशीच हसला...
दारात पावले वाजली. रंगी आणि काळाप्पा आले होते. रंगीने दार ढकलले. तीन निरागस पोरं वळवळत होती. गोंद्या झोपेतच हसला. त्याला एक गोड स्वप्न दिसत होते. त्याला पोटभर भाकरी आणि साथीला लाल - लाल चटणी मिळाली होती. त्याने त्यातली थोडी बाजूला ठेवली. एकेक घास तो त्याच्या भावडांना भरवू लागला. पण, स्वप्नच ते, अन् ते स्वप्नही अपुरेच राहिले त्याचे.
रंगी पुढे सरकली. तिच्या मनात एक मोठा झंझावात निर्माण झाला होता. त्या झंझावाताने तिचा पूर्ण ताबा मिळवला होता. तिच्या अंतःकरणात आतल्या बाजूला एक दीप तेवत होता. ती किंचित बावरली. तिचे मन कच खाऊ लागले. तिने क्षणभर काळाप्पाकडे पाहिले. त्याच्या स्थिर आणि निष्ठुर नजरेशी नजर भिडताच रंगी सावरली. मनातील झंझावातामध्ये तो दीप कुठच्या कुठे लुप्त झाला. रंगी पुढे सरकली. तिची नाजूक बोटे यमाचा पाश बनली. हळूहळू पुढे सरकू लागली. अगदी एक वितीचे अंतर... अन् आता गोंद्याचा गळा... रंगीची बोटे...
...आणि झोपडीचे दार उघडून रंगी बाहेर आली. मागे काळाप्पा होताच. एक पोते त्याने फरफटत बाहेर आणले. दार झाकले. तीन निष्प्राण देहांचे मुटकुळे त्याने खांद्यावर घेतले न् तो पुढे निघाला. एखाद्या कळसुत्री बाहुलीप्रमाणे त्याच्या मागे रंगी निघाली.
खांद्यावरचे ओझे अगदी सहजपणाने काळाप्पाने त्या खड्ड्यात भिरकावले. माती लोटली. प्रत्यक्ष जन्मदात्रीने झिडकारलेल्या त्या तीन पोरांना भूमातेने उराशी कवटाळून धरले.
काळ्या आणि रंगी दूरवर निघाले. पूर्वेला तांबडे फुटत होते. ते दोघे पश्चिमेला दूरवर जाऊन दिसेनासे झाले. अंधाराच्या विस्तीर्ण पोकळीत अद़ृश्य झाले.
अगदी अल्पकाळात घडून गेलेली ही एक छोटीशी घटना. पण...? मानवी इतिहासाला रक्तपात ठाऊक आहे. पण ही हत्या क्वचितच. खरेतर ही हत्या झाली कुणाची? रंगीच्या पोरांची? छे, एका आईने केलेली तिच्यातील आईची!