Mon, Jul 13, 2020 22:22होमपेज › Crime Diary › पाब्लोची पिलावळ

पाब्लोची पिलावळ

Last Updated: Dec 11 2019 1:46AM
सुनील कदम, कोल्हापूर

संपूर्ण जगाला हादरवून सोडणार्‍या कोकेन तस्कर पाब्लो एस्कोबारचा उदय कसा झाला,  त्याच्या अफाट संपत्तीच्या अचंबित करणार्‍या कथा,  पैशाच्या जोरावर पाब्लोने कोलंबियाचा राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी केलेला  प्रयत्न, 1990 च्या दशकात पाब्लो एस्कोबारने मांडलेला उच्छाद आपण पूर्वी बघितलाच आहे. आयुष्यभर नरसंहार मांडणार्‍या या नरराक्षसाचा शेवटी अमेरिका आणि कोलंबिया सरकारने 2 डिसेंबर 1993 रोजी संयुक्त कारवाई करून संहार केला. पण बरोबर 26 वर्षांनी पाब्लोपेक्षा कित्येक पटीने मेक्सिकोमध्ये सध्या त्याच्याच पिलावळीने नरसंहार मांडला आहे. त्याची ही कहाणी.... 

पंचवीस वर्षे कोलंबिया आणि अमेरिका सरकारला वेठीस धरणार्‍या आणि जवळपास तीन खंडांतील युवापिढीला कोकेनच्या नशेच्या गर्तेत ढकलणार्‍या पाब्लो एस्कोबार नावाच्या एका नरराक्षसाचा 2 डिसेंबर 1993 रोजी संहार झाला. पाब्लोच्या मृत्यूनंतर त्याच्या सगळ्या कुटुंबाची वाताहत झाली. जगातील कोणत्याही देशाने पाब्लोच्या कुटुंबीयांना थारा दिला नाही. शेवटी पाब्लोच्या चुलतीने कसाबसा त्यांना आसरा दिला, पण तिथूनही त्यांना जीवाच्या आकांताने अज्ञात ठिकाणी पळ काढावा लागला. बायको एकीकडे, मुलगा दुसरीकडे आणि मुलगी भलतीकडेच अशी पाब्लोच्या कुटुंबीयांची त्रेधातिरपीट उडाली. आपल्या नावामागे पाब्लोचे नाव चिकटल्यामुळे आयुष्यभर या लोकांचाही पाब्लोच्या नुसत्या नावाने छळ मांडला होता. अखेर या जगात जिवंत रहायचे असेल, तर पाब्लो नावाचा त्याग करावा लागेल, हे ओळखून त्यांनी त्याच्या नावाचाही त्याग केला. 

आजही पाब्लोची बायको व्हिक्टोरिया, मुलगी ज्युआन आणि मुलगा मॅन्यूएला या जगात वेगवेगळ्या देशांमध्ये राहत आहेत. पण पाब्लोचे जे काही साथीदार होते, त्यांनी मात्र पाब्लोच्या पश्चात त्याच्याच पावलावर पाऊल टाकत कोकेन तस्करीच्या आपापल्या वेगवेगळ्या टोळ्या स्थापन केल्या आणि सध्या याच टोळ्या मेक्सिकन आणि अमेरिकन सरकारची डोकेदुखी ठरलेल्या आहेत. केवळ अमेरिकाच नव्हे, तर संपूर्ण जगालाच या टोळ्यांचा अंमली विळखा ग्रासू पाहत आहे.

पाब्लोच्या पिलावळीच्या या टोळ्यांनी आजकाल संपूर्ण जगभरातील अंमली पदार्थांच्या तस्करीवर कब्जा केलेला आहे. जगभरातील जवळपास 90 टक्के अंमली पदार्थांची तस्करी या टोळ्यांच्या माध्यमातून चालते. या टोळ्यांची कार्यपद्धतीही पाब्लोसारखीच आहे. आपल्या धंद्यासाठी साम, दाम, दंड, भेद या सगळ्या तंत्रांचा वापर करण्यात या टोळ्या पटाईत आहेत. पाब्लोप्रमाणेच आपल्या धंद्याच्या आड येणार्‍यांचा मुडदा पाडायचा, हे काम या टोळ्या सहजासहजी पार पाडतात. केवळ मेक्सिकोच नाही, तर अमेरिकेसह युरोप आणि आशिया खंडांतीलही सर्वसामान्य नागरिक आणि शासकीय यंत्रणाही या टोळ्यांच्या दहशतीखाली असल्याचे जाणवते. 

जगभरातील अनेक देशांच्या उलाढालीपेक्षा या टोळ्यांची आर्थिक उलाढाल मोठी आहे. यापैकी काही टोळ्यांनी आपापले खासगी संरक्षण दल उभारल्याचीही चर्चा आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीतून मिळविलेल्या अमाप पैशांच्या जोरावर आजकाल या टोळ्या संपूर्ण जगाला आव्हान देण्यास सज्ज होऊ पाहत आहेत.

पाब्लोने आपल्या आयुष्यात तस्करीच्या धंद्यात सर्वसामान्य नागरिक, पोलिस, शासकीय अधिकारी आणि न्यायाधीशांच्या मिळून जवळपास पाच हजार हत्या केल्या. पण पाब्लोचा हा नरसंहार क्षुल्लक वाटावा इतक्या प्रचंड प्रमाणात गेल्या काही दिवसात त्याच्या पिलावळीने मेक्सिकोमध्ये नरसंहार सुरू केला आहे. सध्या मेक्सिकोमध्ये पाब्लोच्या पिलावळीच्या जवळपास दहा टोळ्या कार्यरत आहेत. अमेरिकन संसदेने जाहीर केलेल्या अहवालानुसार, या टोळ्यांनी गेल्या केवळ दहा महिन्यांमध्ये 29 हजार 414 मेक्सिकन आणि अमेरिकन नागरिकांच्या हत्या केल्या आहेत. यामध्येही प्रामुख्याने सर्वसामान्य नागरिक, पोलिस, शासकीय अधिकारी आणि न्यायाधीशांचाच समावेश आहे. आणखी एका अहवालानुसार, या टोळ्यांनी गेल्या  बारा वर्षांच्या कालावधीत दीड लाख लोकांच्या हत्या केल्या आहेत. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या टोळ्यांना आंतरराष्ट्रीय अंमली दहशतवादी घोषित करून त्यांच्याविरुद्ध उघड संघर्ष सुरू केला आहे. 

गेल्या काही वर्षांमध्ये जगभरात वेगवेगळ्या देशांमध्ये जी काही छोटी-मोठी युद्धे झाली, त्यामध्ये बळी पडलेल्या लोकांपेक्षा पाब्लोच्या पिलावळीने अधिक मुडदे पाडलेले आहेत. यावरून या टोळ्या किती क्रूर आहेत, त्याचा अंदाज येण्यास हरकत नाही.

गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाब्लोच्या पिलावळीच्या या दहा टोळ्यांना ‘आंतरराष्ट्रीय अंमली दहशतवादी’ घोषित करून मेक्सिकन सरकारने त्यांच्याविरुद्ध युद्ध छेडावे, अशी सूचना केली. त्याचप्रमाणे या कारवाईत अमेरिका मेक्सिकन सरकारला पूर्ण सहकार्य करील अशीही ग्वाही दिली. पण या इशार्‍यामुळे पाब्लोची पिलावळ चवताळली असून त्यांनी चक्क मेक्सिकन सरकारविरुद्धच युद्ध छेडले आहे. गेल्या आठवड्यात या टोळ्यांच्या शे-पाचशे ड्रग माफियांनी मेक्सिकोमधील अनेक शासकीय कार्यालयांवर हल्ला चढविला. प्रत्युत्तरादाखल मेक्सिकन पोलिसांनीही त्यांच्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. आजपर्यंत या कारवाईत पोलिस आणि ड्रग माफियांसह डझनावारी लोकांचा बळी गेला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून हा संघर्ष सुरूच आहे. या संघर्षा दरम्यान याच ड्रग माफियांनी कित्येक लोकांचे अपहरण केले असून कित्येक लोक बेपत्ता झाले आहेत. त्यामध्येही प्रामुख्याने शासकीय अधिकार्‍यांचाच समावेश आहे.

पाब्लो एस्कोबारने आपली हयात शासकीय यंत्रणांशी संघर्ष करीतच घालवली. हजारो लोकांच्या मुडद्यांच्या राशीवर पाब्लोने आपल्या अंमली पदार्थांच्या तस्करीचे साम्राज्य उभा केले. अफाट पैशाच्या जोरावर पाब्लोने हे सगळे रेटून नेण्याचा प्रयत्न केला  पण अखेरीस शासकीय कारवाईत त्याचा खात्मा झाला. पाब्लोची पिलावळही आजकाल त्याच मार्गावरून वाटचाल करीत आहे. नव्वदच्या दशकात एकट्या पाब्लोबरोबर टक्कर घेताघेताच अमेरिकेसह कोलंबिया आणि मेक्सिकन सरकार डबघाईला आले होते. इथे तर पाब्लोसारख्या दहा-दहा टोळ्यांचा सामना करायचा आहे. त्यामुळे हा संघर्ष अधिकच खडतर असल्याचे जाणवते. मात्र अमेरिकेसह युरोप आणि आशिया खंडाला अंमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवायचे असल्यास काहीही करून पाब्लोच्या या पिलावळीच्या नांग्या ठेचाव्याच लागतील.