Sat, Oct 24, 2020 09:33होमपेज › Belgaon › सह्याद्रीनगरला तरुणाचा तलावात बुडून मृत्यू 

सह्याद्रीनगरला तरुणाचा तलावात बुडून मृत्यू 

Last Updated: Oct 19 2020 1:22AM
उचगाव : पुढारी वृत्तसेवा 

जेवणानंतर हात धुण्यासाठी गेलेल्या तरुणाला तलावातील शेवाळलेल्या पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे पाय घसरून पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. विठ्ठल रायाप्पा अनगोळकर (वय 32, रा. मरगाई गल्ली, सुळगा हिंडलगा)  असे मृताचे नाव आहे. रविवारी दुपारी दोन वाजता बॉक्साईट रोडवरील सह्याद्रीनगर परिसरात ही घटना घडली. 

एपीएमसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हिंडलगापासून काही अंतरावर असलेल्या सह्याद्रीनगर परिसरातील  एका फार्महाऊस शेजारी खुल्या शेतात विठ्ठलने चरण्यासाठी शेळ्या सोडल्या होत्या. दुपारी  दोनच्या सुमारास जेवण केल्यानंतर तो हात धुण्यासाठी शेजारी असलेल्या तलावात गेला.  या तलावाचा वापर नसल्याने पाणी शेवाळलेले आहे. शिवाय सलग आठवडाभर पाऊस सुरू असल्याने येथील पाण्याची पातळी वाढली आहे.  तलावाचा काठ निसरडा झाल्याने हात धुण्यासाठी गेलेल्या विठ्ठलचा पाय घसरला व तो पाण्यात पडल्याने बुडाला. परिसरात शेळ्या फिरत होत्या. परंतु, त्याचा मालक दिसत नसल्याने आजाबूजाच्या लोकांना संशय आला. तलावाशेजारी त्याची चप्पल आणि टोपी पडलेली दिसल्याने तर संशयात आणखीनच भर पडली. त्यामुळे ही माहिती पोलिसांना कळविली. पोलिस व अग्नीशामक दलाने घटनास्थळी जाऊन शोधाशोध केली असता त्याचा मृतदेह आढळून आला.  त्याच्या पश्चात आई आणि भाऊ असा परिवार आहे. एपीएमसी पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पोलिस निरीक्षक जावेद मुशापुरी अधिक तपास करीत आहेत. 

3 महिन्यांत दुसरा आघात

विठ्ठलच्या वडिलांचे तीन महिन्यांपूर्वी निधन झाले आहे.  आता विठ्ठलही असा अचानक निघून गेल्याने अनगोळकर कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्याच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून एपीएमसी पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे. 

 "