Sat, Jul 11, 2020 10:15होमपेज › Belgaon › यळेबैलच्या महिलेसह तिघांना कोरोना

यळेबैलच्या महिलेसह तिघांना कोरोना

Last Updated: Jul 01 2020 8:04AM
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

पुण्याहून परत आलेल्या यळेबैल (ता. बेळगाव) येथील महिलेसह जिल्ह्यातील तिघांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यातील 329 जणांना बाधा  झाली असून, 23 जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मंगळवारी चौघे जण कोरोनामुक्‍तही झाले.

जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने दिलेल्या माहितीनुसार, यळेबैल येथील 25 वर्षीय महिला 16 जून रोजी पुण्याहून आली होती. ती गरोदर असल्यामुळे जिल्हा रुग्णालयात तिच्या घशातील द्राव घेण्यात आले होते. 26 जून रोजी ती प्रसूत झाली; पण मंगळवारी आलेल्या अहवालात ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

अथणी आणि कित्तूर येथील दोघा पुरुषांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. कित्तूर येथे सापडलेला रुग्ण हा मूळचा धारवाड येथील आहे; पण तो कित्तूर येथे क्‍वारंटाईन होता. त्यामुळे त्यालाही जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. एकीकडे तीन जणांना कोरोनाची लागण झाली असली तरी, आज दिवसभरात चौघे कोरोनामुक्‍त झाले आहेत.

 वडगाव, हुक्केरी येथील दोघे आणि चिकोडी येथील दोघे असे चार जण कोरोनामुक्‍तझाले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले.जिल्ह्यात 329 जण कोरोनाबाधित असून 307 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 23 जणांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रकृती चांगली

यळेबैल येथील महिलेला कोरोनाची बाधा झाली असली तरी, तिच्या बाळाची आणि तिची प्रकृती चांगली आहे. महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.