Sun, Jun 07, 2020 10:50होमपेज › Belgaon › बेळगावात बँक लिपिकाकडून पत्नीचा गळा दाबून खून

बेळगावात बँक लिपिकाकडून पत्नीचा खून

Last Updated: Feb 14 2020 12:44PM
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

बेळगावात पती-पत्नीच्या भांडणात पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आली. कविता परशुराम पिसे (वय ३०, मूळ रा. गुलबर्गा, सध्या रा. विजयनगर, बेळगाव) असे मृत विवाहितेचे नाव आहे. संशयित परशराम पिसे हा एक राष्ट्रीयकृत बँकेत लिपिक म्हणून कार्यरत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परशराम आणि कविता यांचे लग्न होऊन आठ वर्षे झाली. परशराम हा विजापूर जिल्ह्यातील ताळीकोटी येथील असून नोकरीच्या निमित्ताने हे कुटुंब विजयनगर येथे भाड्याने घेतलेल्या घरात राहते. त्यांना सहा वर्षाची आणि सहा महिन्याची मुलगी आहे .

गुरुवारी दुपारी दिडच्या सुमारास पत्नीने परशरामला बँकेतून घरी बोलावून घेतले. एलकेजीमध्ये शिकणाऱ्या मुलीला शाळेतून आणण्यावरून दोघांमध्ये वादावादी झाली. यानंतर दोघांचे भांडण विकोपाला गेले. रागाच्या भरात पतीने पत्नीचा गळा आवळला. दुपारी २ वाजल्यापासून घरी तो आणि सहा महिन्याची चिमुकली होती. पत्नी निपचित पडल्याने तोही अस्वस्थ बनला. सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत तो अशाच स्थितीत घरी बसून होता. बाळाचे रडणे, शाळेतून घरी आलेल्या मुलीचे रडणे असह्य झाल्याने त्याने आपल्या घरी विजापूरला तसेच सासरवाडीला फोन करून पत्नीने झोपेच्या गोळ्या खाल्ल्याचे सांगितले.

यावेळी त्याच्या नातेवाईकांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तो पत्नीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. परंतु डॉक्‍टरांनी मृत्यू झाल्याचे सांगितले. दुपारीच तिचा मृत्यू झाला होता. परंतु घरच्यांच्या सांगण्यानुसार तो हॉस्पिटलला गेला होता.

पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता प्रथमदर्शनीच गळा दाबल्याचे व्रण आढळून आले. आधी पोलिसांनाही तो झोपेच्या गोळ्या खाल्ल्याचेच सांगत होता. परंतु, पोलिसांनी चौकशी केली असता त्याने कबूल केले. त्याला ताब्यात घेण्यात आले असून चौकशी सुरू आहे. प्रभारी निरीक्षक धीरज शिंदे अधिक तपास करीत आहेत.