Sun, Sep 27, 2020 00:37होमपेज › Belgaon › डीसीपी कोण? अद्यापही गुलदस्त्यात 

डीसीपी कोण? अद्यापही गुलदस्त्यात 

Last Updated: Jan 04 2020 1:37AM
बेळगाव : प्रतिनिधी

डीसीपी सीमा लाटकर यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी सकाळी एकाची नियुक्‍ती झाल्याचा आदेश आला. परंतु, सायंकाळी दुसर्‍याच व्यक्‍तीच्या नियुक्‍तीचा आदेश आला. परंतु, आता त्यांचीही बदली रद्द झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे बेळगावचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी कोण? हे अद्याप तरी गुलदस्त्यातच  आहे. 

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कायदा व सुव्यवस्था विभागाच्या डीसीपी सीमा लाटकर यांची बदली झाल्याचा आदेश आला. सकाळी आलेल्या आदेशात लाटकर यांची बंगळूरला नागरी हक्क अंमलबजावणी विभागाकडे बदली, तर त्यांच्या जागी सिमी मरियम जॉर्ज यांची नियुक्ती झाल्याचे नमूद होते. परंतु, दुपारपर्यंत अशी काही चक्रे फिरली की कार्यभार स्वीकारण्यासाठी आलेल्या सिमी जॉर्ज यांना परत बोलावून या ठिकाणी चिकोडीला एएसपी म्हणून काम केलेले. जी. के. मिथुनकुमार यांची नियुक्ती केल्याचा दुसरा आदेश आयुक्तालयाला प्राप्त झाला. मंगळवारी व बुधवारी सायंकाळपर्यंत मिथुनकुमार हे रूजू होणार अशी चर्चा होती. परंतु, अचानक मिथुनकुमार यांचीही बेळगावची बदली रद्द केली. त्यामुळे सध्या तरी या जागेवर कोणाचीही नियुक्ती केलेली नाही. 

आपल्या प्रामाणिक सेवेमुळे बेळगावकरांच्या मनात घर केलेल्या सीमा लाटकर यांच्याकडेच सध्या तरी कार्यभार आहे. संवेदनशील बेळगावला कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी सशक्त अधिकारी हवा, असे वरिष्ठ पोलिस अधिकारी व काही राजकारण्यांना वाटते. लाटकर यांच्यानंतर हे पद सांभाळण्यासाठी नवखे नव्हे, तर अनुभवी अधिकारी हवा, असा सूर निघाल्यामुळे दोन्ही नवख्या अधिकार्‍यांची नावे मागे पडली आहेत. सध्या सीमाप्रश्‍ना वरील वक्तव्यामुळे बेळगावातील वातावरणही तप्त बनत आहे. अशावेळी येथे अनुभवी अधिकार्‍याची गरज आहे. गेल्या अडीच वर्षात डीसीपी लाटकर यांनी संपूर्ण बेळगाव पिंजून काढलेले आहे. त्यामुळे त्यांनाच काही महिने कायम ठेवावे, असे मत काही राजकारणी व्यक्त करत आहेत. आता तिसरा अधिकारी या पदावर येणार की पुढील काही महिने सीमा लाटकर याच या पदावर राहणार, हे पाहवे लागणार आहे. 

 "