Sat, Sep 26, 2020 23:44होमपेज › Belgaon › कचरा डेपोविरुद्ध एल्गार, आ. हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील यांचाही सहभाग 

कचरा डेपोविरुद्ध एल्गार, आ. हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील यांचाही सहभाग 

Last Updated: Dec 28 2019 1:23AM
उचगाव : वार्ताहर

कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी तुरमुरी येथे वाढीव भूसंपादन करण्याचा प्रयत्न करणार्‍या अधिकार्‍यांना ग्रामस्थांनी विरोध दर्शविला, तसेच प्रकल्पासाठी एक इंचही जागा देणार नसल्याचे ठणकावून सांगत अधिकार्‍यांना घेराव घालून सुमारे दोन तास बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावर आंदोलन करण्यात आले. 

कचरा प्रकल्पासाठी वाढीव पाच एकर जमीन संपादित करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, मनपा आयुक्त जगदीश के. एच. प्रदूषण मंडळ अधिकारी गोपाल सनतनगी यांनी शुक्रवारी सकाळी भेट दिली; पण संतप्त ग्रामस्थांनी त्यांना विरोध दर्शवला. कोणत्याही परिस्थितीत वाढीव भूसंपादन करू देणार नाही, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. डेपोला विरोध करण्यासाठी शाळेची मुले व ग्रामस्थ गावाच्या वेशीत हातात फलक घेऊनच उभे होते. त्यांनी सकाळपासून वेशीत गर्दी केली होती. 

गावात अधिकारी येताच आ. हेब्बाळकर यांच्यासह आजी-माजी लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेत भूसंपादन करण्यास विरोध केला.  आ. लक्ष्मी हेब्बाळकर, माजी आ. संजय पाटील, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, ता. पं. सदस्या मथुरा तेरसे, माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्यासह परिसरातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

अधिकारी प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी गेल्याची माहिती कळताच ग्रामस्थांसह आ. हेब्बाळकर यांनी रस्त्यावर ठाण मांडले. त्यानंतर कचरा प्रकल्पाविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. कचरा प्रकल्पाला भेट देऊन अधिकारी टेकडीवरून खाली येत असताना ग्रामस्थांनी त्यांना धारेवर धरले. डेपोमुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. यामुळे नागरिक भयभीत बनले असल्याची व्यथा मांडण्यात आली.

आ. हेब्बाळकर म्हणाल्या, एकीकडे बेळगाव स्मार्ट सिटी करण्यासाठी करोडो रुपयांचा चुराडा करण्यात येत आहे; मात्र  शहराचा कचरा ग्रामीण भागांमध्ये टाकून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्यात येत आहे. प्रशासन अथवा बेळगाव महानगरपालिकेकडून गावासाठी एक रुपयाही खर्च करण्यात येत नाही.

जि.  पं.  सदस्या सरस्वती पाटील म्हणाल्या, डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील कचरा ग्रामीण भागात नको, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल. माजी आ. संजय पाटील म्हणाले, कचरा डेपो हटवण्यासाठी आठ वर्षे सातत्याने लढा देत आहे. भाऊराव गडकरी, आर. आय. पाटील, माजी ता. पं. सदस्य सुरेश राजूकर,  एन. बी. खांडेकर, तुरमुरी ग्रा. पं. अध्यक्ष रामू खांडेकर, उचगाव ग्रा. पं. अध्यक्षा योगिता देसाई, सुळगा ग्रा. पं.  अध्यक्ष संजय पाटील,  बेकिनकेरे ग्रा. पं. अध्यक्ष मल्लाप्पा गावडे, माजी अध्यक्ष नागनाथ जाधव,  लक्ष्मण जाधव, मारुती खांडेकर, वैजनाथ गोजगेकर आदी उपस्थित होते.

आ. मुश्रीफ, आ. सतेज पाटील यांचाही पाठिंबा

बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर आंदोलन सुरू होते. त्यावेळी कोल्हापूरहून चंदगडकडे निघालेले कागलचे आ. हसन मुश्रीफ आणि आ. सतेज पाटील हे आंदोलनस्थळी थांबले. त्यांनी आंदोलनाची माहिती घेतली. येथील नागरिकांच्या हितासाठी कचरा डेपो हटला पाहिजे, असे सांगून त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. 

 "