Sat, Feb 29, 2020 11:20होमपेज › Belgaon › मध्यवर्ती बसस्थानकासमोर भुयारी मार्ग

मध्यवर्ती बसस्थानकासमोर भुयारी मार्ग

Last Updated: Jan 04 2020 1:37AM
बेळगाव : प्रतिनिधी

स्मार्ट सिटी योजनेतून मध्यवर्ती बसस्थानक ते शहर बसस्थानकापर्यंत (सीबीटी) भुयारी मार्ग बांधण्याचा निर्णय शुक्रवारी बैठकीत झाला. त्यानुसार अधिकार्‍यांनी या जागेची पाहणी केली.

स्मार्ट सिटी योजनेतून भुयारी मार्ग उभारणीबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी स्मार्ट सिटी योजना कार्यालयात संयुक्‍त बैठक झाली. बैठकीला महापालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड, सार्वजनिक बांधकाम खाते, पाणीपुरवठा मंडळ, वाहतूक पोलिस, बीएसएनएल, वायव्य परिवहन महामंडळ आणि मेगा इंजिनिअरिंग इन्फ्रा लिमिटेडचे अधिकारी उपस्थित होते. स्मार्ट सिटी योजना व्यवस्थापकीय संचालक शशिधर कुरेर यांनी मध्यवर्ती बसस्थानक ते शहर बस स्थानकादरम्यान होणार्‍या भुयारी मार्गाची माहिती दिली. सध्या नव्याने बसस्थानकांची निर्मिती करण्यात येत आहे. हा भाग मोठ्या वर्दळीचा असून सुरळीत वाहतुकीसाठी भुयारी मार्गाची गरज आहे. त्यामुळेच दोन्ही बसस्थानकांना जोडण्यासाठी भुयारी मार्गाची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व विभागांनी त्या ठिकाणी निर्माण होणारे अडथळे दूर करण्यासाठी एकमेकांशी समन्वय राखावा, असे आवाहन कुरेर यांनी केले.

कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बर्चस्व यांनीही  याबाबत माहिती दिली. डीसीपी यशोदा वंटगोडी यांनी वाहतुकीला कोणताही अडथळा होणार नाही, याची खबरदारी पोलिस खाते घेईल, अशी ग्वाही दिली. महापालिकेकडून अभियंता गंगाधर ई., लक्ष्मी निपाणीकर यांच्यासह स्मार्ट सिटी योजनेतील अधिकारी उपस्थित होते.

जागेची पाहणी

बैठक झाल्यानंतर सर्व खात्यांच्या अधिकार्‍यांनी मध्यवर्ती बसस्थानक आणि शहर बसस्थानक येथील नियोजित भुयारी मार्गासाठी पाहणी केली.