Tue, Aug 04, 2020 14:10होमपेज › Belgaon › शिवरायांचा अपमान, कॉमेडियन अग्रिमा जोशुआवर कारवाई करा 

शिवरायांचा अपमान, कॉमेडियन अग्रिमा जोशुआवर कारवाई करा 

Last Updated: Jul 11 2020 1:55PM
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा 

स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ सध्या चर्चेत आली आहे. एका शोमध्ये तिने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. समस्त सीमा भागातील शिवप्रेमींनी या व्हिडिओवर आक्षेप घेत अग्रिमा जोशुआ हिच्यावर टीका केली आहे.

एका शोमध्ये अग्रिमा जोशुआ हिने मुंबईत अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाबद्दल वादग्रस्त व्यक्तव्ये केली आहेत. या वक्तव्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेखही तिने केला आहे. त्यामुळे समस्त शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून तिच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

एका स्टँडअप शोदरम्यान अग्रिमा जोशुआने शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित पुतळ्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. जोशुआचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अग्रिमा जोशुआचा हा व्हिडिओ पाहून सीमाभागातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून तिला कठोर शिक्षा करण्यात यावी, असे म्हटले जात आहे. अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या शिवरायांचा असा अपमान कोणीही सहन करणार नाही. तिच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी करण्यात येत आहे.

तसेच शिवजयंती चित्ररथ महामंडळ बेळगावचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी लोकांच्या भावना अग्रिमा जोशुआच्या स्टँडअप कॉमेडीने दुखावल्या असून तिच्याविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबई पोलिस आयुक्त यांच्याकडे ट्विटरवरून केली आहे.

अग्रिमा जोशुआला तत्काळ अटक करण्याची सेनेची मागणी 

शिवरायांबद्दल वादग्रस्त विधानाप्रकरणी शिवसैनिक आक्रमक झाले असून शिवसेनेने तिला तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. शिवरायांवरील आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करून अपमान केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. 

दरम्यान, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. अग्रीमा जोशुआला तत्काळ अटक करण्यासंदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

अग्रिमा जोशुआने केले ट्विट 

महान छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक अनुयायांच्या भावना दुखावल्याबद्दल मला वाईट वाटते. त्या महान महाराजांचे मी मनापासून आदर करते. त्यांच्या अनुयायांच्या भावना दुखावल्या. याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते...