संबरगी : प्रतिनिधी
कागवाड विधानसभा मतदार संघाजवळ असलेल्या सांगली- मिरज- कुपवाड महापालिका निवडणुकीत भाजपला दणदणीत विजय मिळाल्याने याचा परिणाम सीमाभागातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीवर होणार आहे.
सांगली शहर महाराष्ट्रात असले तरी सीमाभागातील नागरिकांची कोट्यवधी रुपयांची उलाढाल सांगली मार्केटमध्ये आहे. अथणी, कागवाड, रायबाग व कुडची मतदारसंघ कर्नाटकात असले तरी याचे संंबंध महाराष्ट्राशी आहेत. महापालिका निवडणुकीच्या प्रचारास काँग्रेस, भाजप आणि निजदचा ताफा तिकडे गेला होता. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेवर भाजपने सत्ता काबिज केली आहे. याचा परिणाम आता होणार्या नगरपालिका, नगरपरिषदा निवडणुकीवर होणार आहे. अथणी, रायबाग, कुडची, चिकोडी या नगरपालिकांच्या निवडणुकीवर संभवतो. महाराष्ट्रात भाजपने आघाडी मारली आहे. याचा परिणाम सीमाभागातील संस्थांवर होणार आहे.
चिकोडी जिल्ह्यात झालेल्या पीकेपीएस संघांच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर झाल्या नसल्या तरी भाजपचे कोणते कार्यकर्ते आहेत, हे ओळखून भाजप कार्यकर्त्यांना मतदारांनी मतदान केले आहे. महाराष्ट्राचे वारे आता कर्नाटकात वाहू लागले आहे. काँग्रेसची पीछेहाट झाली आहे. याचा विचार पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी करणे आवश्यक आहे.
अथणी तालुक्यात काँग्रेसला धोबीपछाड झाला आहे. सीमाभागात भाजप आघाडीवर आहे. याचा परिणाम सर्वच निवडणुकीत होणार आहे. चिकोडी जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.