Thu, Sep 24, 2020 11:06होमपेज › Belgaon › हिवाळ्यात मान्सून... ऑक्टोबर की जून?

हिवाळ्यात मान्सून... ऑक्टोबर की जून?

Last Updated: Oct 26 2019 2:00AM
बेळगाव : प्रतिनिधी

शहरात सकाळपासून दिवसभर   पावसाची रिपरिप सुरू होती. सायंकाळी काही वेळ उघडिप दिसत असली तरी पावसाळी वातावरणामुळे हवेत गारवा होता. दिवाळीचा पहिलाच दिवस असल्याने शुक्रवारी भर पावसात बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ दिसत होती.  

संततधार पावसामुळे नागरिकांनी रेनकोट, छत्र्या बाहेर काढल्या. दिवसभर  पावसाची रिपरिप कायम राहिल्याने  शहरातील विविध मार्गावरील रस्त्यावर पाणी साचले होेते.  जुलै महिन्यातील झडीचा पावसासारखेे चित्र परतीच्या पावसात दिसत होते.  

टिळकवाडी, शहापूर, वडगाव, अनगोळ भागातही पावसाची संततधार सुरू होती.   पावसामुळे   गटारी तुडूंब भरून  वाहत होत्या.  शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घरी जाताना छत्र्या व रेनकोटचा आधार घेतला.  रोज दुपारी किंवा सायंकाळी येऊन थांबणारा पाऊस शुक्रवारी मात्र दिवसभर ठाण मांडून होता. 

तालुक्यातील ग्रामीण  भागातही पावसाने झोडपून काढले. या पावसात काही ठिकाणी भात पीक जमिनीवर आडवे झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. उसंत न घेता परतीचा पाऊस रोजच  हजेरी लावत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.  

हवामान खात्याने आगामी तीन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रोजच होत असलेल्या पर्जन्यवृष्टीने पिकांचे नुकसान होत  आहे. काही भागात हातातोंडाला आलेले भात व अन्य पिके  भुईसपाट झाली असून शेतकरी संकटात सापडले आहेत. 

धडाका थांबणार कधी?

शहर परिसरात परतीच्या पावसाचा धडाका सुरूच आहे. ऑक्टोबर महिन्यात पावसाळा संपून कडक ऊन पडते. त्यानंतर थंडीचा महिना सुरू होतो. ऑक्टोबर हिटचा अनुभव यंदा आलाच नाही. निसर्गाचे बदललंले चक्र चर्चेत असले तरी शेतकरीवर्गासाठी मारक आहे. दिवाळी सुरू झाली तरी पावसाने उघडिप न दिल्याने आता चिंता व्यक्त होत आहे.  वरूणराजाचा हा धडाका थांबणार कधी, याकडे लक्ष आहे.
 

 "