Thu, Sep 24, 2020 07:10होमपेज › Belgaon › हुक्केरी कागवाड, कागे अथणीतून?

हुक्केरी कागवाड, कागे अथणीतून?

Last Updated: Nov 15 2019 11:19PM
बेळगाव : प्रतिनिधी

काँग्रेसच्या बंडखोर अपात्र आमदारांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. गोकाक, अथणी आणि कागवाड या तीन मतदारसंघांमध्ये मातब्बर नेत्यांना उतरवण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहेत. कागवाडमधून माजी खासदार,माजी पालकमंत्री प्रकाश हुक्केरी, अथणीतून माजी आ. राजू कागे लढण्याची शक्यता आहे. तर गोकाकचा उमेदवार ठरवण्याची जबाबदारी सतीश जारकीहोळी ठरवतील.

बेळगाव जिल्ह्यातील या तीन मतदारसंघांसह एकूण 7 मतदारसंघांतील उमेदवारांची यादी काँग्रेसने अजून निश्‍चित केलेली नाही. ती येत्या दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. 5 डिसेंबरला होणार्‍या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख सोमवार 18 नोव्हेंबर आहे.

गोकाकमधून रमेश जारकीहोळी, कागवाडमधून श्रीमंत पाटील आणि अथणीतून महेश कुमठळ्ळी यांनी  बंडखोरी केल्यानंतर या तिघांनाही त्याच मतदारसंघांतून भाजपने उमेदवारी दिली आहे. हे तिघेही शेवटच्या दिवशीच अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसने कागवाडमधून प्रकाश हुक्केरी आणि अथणीतून राजू कागे यांना उतरवण्याचा विचार चालवला आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत कागवाडमधून काँग्रेस उमेदवार असलेले श्रीमंत पाटील यांच्याकडून भाजप उमेदवार असलेले राजू कागे थोडक्या मतांनी पराभूत झाले होते. आता कागे काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांना कागवाडमधूनच उमेदवारी द्यावी का, असाही विचार काँग्रेसमध्ये चालला आहे. तसे झाल्यास प्रकाश हुक्केरी अथणीतून कुमठळ्ळींच्या विरुद्ध लढतील. 

कागे काँग्रेसमध्ये 

कागवाड मतदारसंघातून चारवेळा निवडून आलेले राजू कागे यांनी  गुरुवारी रात्री काँग्रेसमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला. भाजप उमेदवारी मागितली तरी त्यांना नाकारण्यात आली होती. काँग्रेस नेत्यांनी त्यांना कागवाड किंवा अथणीतून उमेदवारीचे आश्‍वासन देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरातील केपीसीसी कार्यालयात प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडुराव यांनी पक्षाचा ध्वज देऊन त्यांचे स्वागत केले.

गोकाकमध्ये कोंडी

गोकाकमध्ये मात्र काँग्रेसची कोंडी झाली आहे. आ. सतीश जारकीहोळी यांनी रमेश यांच्याविरुद्ध लखन जारकीहोळी यांना उतरवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून त्यांना हिरवा कंदील मिळालेला नाही. लखन यांना उमेदवारी द्यावी की भाजपमधून काँग्रेसच्या वाटेवर असलेले अशोक पुजारी यांना द्यावी, या द्विधा स्थितीत काँग्रेस आहे. या द्विधा स्थितीमुळेच पुजारी यांचा काँग्रेस प्रवेश थांबला आहे.

 "