Thu, Sep 24, 2020 08:36होमपेज › Belgaon › बेळगाव : संपत्तीसाठी मुलाने केला डॉक्टरचा खून

बेळगाव : संपत्तीसाठी मुलाने केला डॉक्टरचा खून

Published On: Feb 02 2018 10:47AM | Last Updated: Feb 03 2018 10:13AMबेळगाव ः प्रतिनिधी 

कामधंदा न करणार्‍या युवकाने मालमत्तेसाठी आपल्या डॉक्टर बापाच्या डोक्यात सळीने वार करून खून केल्याचा प्रकार गुरुवारी रात्री अंजनेयनगरमध्ये घडला. महत्त्वाचे म्हणजे 70 वर्षे वयाचा असलेला डॉक्टर बाप अजूनही स्वतः काम करून घर चालवत होते. डॉ. उमाकांत दंडावतीमठ (वय 70) असे मृत डॉक्टरचे नाव असून, त्यांच्या मुलाचे नाव रवी (वय 36) असे आहे.

डॉ. उमाकांत हे बैलहोंगल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रोजंदारीवर वैद्यकीय सेवा बजावीत होते. त्यांचा मुलगा रवी विवाहित आहे. मात्र, तो काहीच काम करत नसल्याने बापˆलेकात वारंवार खटके उडत होते. रवीने वैद्यकीय शिक्षणही अर्ध्यावरच सोडले होते. लग्नानंतरही रवी काहीच काम न करता घरातच दुर्गामंदिर बांधून पूजा करत होता. यावरूनही बाप-लेकात खटके उडत होते.

गुरुवारी डॉ. उमाकांत हे बैलहोंगल येथील काम आटोपून बेळगावला आपल्या घरी परतले. त्यानंतर रवीने त्यांच्याशी मालमत्तेवरून भांडण उकरून काढले. बापˆलेकातील वाद विकोपास गेला. रागाच्या भरात रवीने लोखंडी सळीने डॉ. उमाकांत यांच्या डोक्यात घाव घातला. त्यामुळे डोक्यातून मोठा रक्तस्राव सुरू झाला. त्याबरोबर रागाच्या भरातून बाहेर आलेल्या रवीने आरडाओरडा सुरू केला. डॉ. उमाकांत यांच्या घरात सुरू असलेल्या वादाचा आवाज शेजार्‍यांना ऐकू गेला होताच. त्यात रवीने आरडाओरडा करताच शेजारी गोळा झाले. त्यानंतर जखमी डॉक्टरना लागलीच जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; परंतु त्यांचा मृत्यू झाला. डॉ. उमाकांत यांच्या पश्‍चात एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. 

हल्ल्यानंतर काही वेळातच माळमारुती पोलिसांना घटनेची माहिती कळविण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर रवीने त्यांनाही चोरट्यांनी आपल्या वडिलांवर हल्ला केल्याची बतावणी केली; पण घटनास्थळाची पाहणी आणि शेजार्‍यांकडून माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी  रवीला ताब्यात घेतले.  शुक्रवारी दुपारी शवचिकित्सा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.