Thu, Sep 24, 2020 07:41होमपेज › Belgaon › निपाणी पाणीप्रश्‍नी सोशल मीडियावर ‘तू तू-मै मै’

निपाणी पाणीप्रश्‍नी सोशल मीडियावर ‘तू तू-मै मै’

Published On: Jun 27 2019 1:31AM | Last Updated: Jun 27 2019 12:14AM
निपाणी : राजेश शेडगे

शहराच्या पाणीप्रश्‍नावरून भाजप व काँग्रेस नगरसेवकांमध्ये तू तू -मैं मैं सुरू आहे. सोशल मिडीयावर याचीच अधिक चर्चा रंगली आहे. निपाणीकर नागरिक 24 तास पाण्यापासून वंचित आहे. पाच-सहा दिवसांतून एकदा  मिळणार्‍या पाण्याकडे डोळे लावून आहेत. श्रेयवादापेक्षा निपाणकरांना कायमस्वरुपी पाणी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नांची गरज असल्याचे बोलले जात आहे.

दोन महिन्यापासून पालिकेतर्फे  पाच दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. काँग्रेसचे नगरसेवक विलास गाडीवड्डर यांनी 24 तास पाणी योजनेचे घाईगडबडीने उद्घाटन  झाल्याने पाणीटंचाई उद्भवल्याचा आरोप करीत आहेत. पालिकेवर प्रशासकीय राजवट असल्याने आ. जोल्ले या पदसिद्ध नगरसेवक म्हणून  पालिकेच्या आधिकार्‍यांकडून कामे करवून घेतली पाहिजेत, असे गाडीवड्डर यांनी सांगितले आहे.

भाजप नगरसेवकांनी आमदारांनी वेळोवेळी पालिका आधिकारी, केयुआयडीएफसी व जैन इरिगेशनच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन पाणीप्रश्‍नी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय लोकसभेची आचारसंहिता असताना  जिल्हाधिकारी आर. विशाल यांना एसएफसी व 14 व्या वित्त आयोगातील निधीतून पाणीप्रश्‍नी आवश्यक निधींची तरतूद करावयास लावल्याचे सांगितले आहे.

जवाहरलाल वॉटर वर्क्स येथील वीज वाहिनी खराब झाल्यावर त्याच्या जोडणीसाठी आपणच खटपट केल्याचे श्रेय गाडीवड्डर व भाजप नगरसेवक घेत आहेत. यावरून निपाणीत राजकीय वातावरण तापत आहे. विलास गाडीवड्डर यांच्या नगराध्यक्षपदाच्या काळात वायफळ निधी खर्च झाल्याने कामगारांना पगार देण्यास पैसे नसल्याचा आरोप होत आहे. प्रशासकीय राजवटीत आमदारांनी विधानसभेत आवाज उठवून अनुदान का आणले नाही. असा सवाल केला जात आहे.

सोशल मिडीयावर फोटो टाकून आपणच कामे केल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्हीकडून पत्रकार परिषदा होत आहेत. पण जवाहरलाल तलावातील पाणीपातळी वाढविण्यासाठी कोणते प्रयत्न होणार, शहराला पाणीटंचाई  न भेडसावण्यासाठी नियोजन याबाबत बोलले जात नाही. अधिकार्‍यांवर वचक नसल्याने शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तलावात 29 फूट 9 इंच पाणीसाठा आहे. वेदगंगा नदी निपाणकरांची वरदान ठरली आहे. शहराला कायमस्वरुपी पाणीपुरवठा होण्यासाठी नियोजन व उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

कायमस्वरूपी पाण्यासाठी प्रयत्न आवश्यक

नदीतील पाण्याचा अखंड उपसा सुरू आहे. 18 इंच पाईपलाईनमधून  केवळ 9 इंच पाणी तलावात पडत आहे. पूर्ण क्षमतेने पाणी येण्यासाठी उपाययोजना करण्यावर लोकप्रतिनिधी, नगरसेवकांतून प्रयत्न आवश्यक आहेत. 24 तास  पाणी सुरळीत मिळण्याच्या प्रयत्नापेक्षा काँग्रेस व भाजपमध्ये स्टंटबाजीचा वॉर सुरू आहे.