Fri, Feb 28, 2020 22:47होमपेज › Belgaon › मुगळीहाळ खुनाबद्दल १३ जणांना जन्मठेप

मुगळीहाळ खुनाबद्दल १३ जणांना जन्मठेप

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

शेतजमिनीवरून उद्भवलेल्या वादात शेतकर्‍याचा खून केल्याबद्दल खानापूर तालुक्यातील मुगळीहाळच्या 13 जणांना प्रथम जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवताना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दोषींमध्ये पाच सख्खे भाऊ, पिता-पुत्र, तसेच आणखी दोन सख्खे भाऊ यांचा समावेश आहे. सर्व 13 जण एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. नागाप्पा रुद्राप्पा हट्ठीहोळी असे खून झालेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. पाच वर्षांपूर्वी 4 मे 2013 रोजी हा खून झाला होता.

जन्मठेपेची शिक्षा झालेल्यांमध्ये रमेश रुद्राप्पा बनोशी (वय 40), अशोक रुद्राप्पा बनोशी (वय 42), सुरेश रुद्राप्पा बनोशी (वय 45), रवी रुद्राप्पा बनोशी (50), बसाप्पा रुद्राप्पा बनोशी (55) हे पाच भाऊ, विठ्ठल इराप्पा बनोशी (40), कलमेश विठ्ठल बनोशी (21) हे पिता-पुत्र, मारुती देवेंद्र बनोशी (55), महाबळेश्‍वर देवेंद्र बनोशी (58), श्रीकांत देमाण्णा बनोशी (40), संजीव मारुती बनोशी (22), विष्णू देमाप्पा बनोशी व महांतेश मल्लाप्पा बनोशी (35, सर्वजण रा. मुगळीहाळ) यांचा समावेश आहे. 

मुगळीहाळ गावातील बनोशी आणि हट्टीहोळी कुटुंबीयांमध्ये बर्‍याच काळापासून 4 एकर शेतजमिनीवरून वाद होता. त्यावरून त्यांच्यात वारंवार खटकेही उडत. त्याबाबतचा दिवाणी खटलाही खानापूर न्यायालयात सुरू होता. तो सुरू असतानाच 4 मे 2013 रोजी हट्टीहोळी कुटुंबातील काही लोक शेताची मशागत करत असताना बनोशी कुटुंबातील 13 जणांनी कुर्‍हाडी, विळे व लाठ्याकाठ्यांनी शेतातच हट्टीहोळी कुटुंबावर हल्ला चढवला. त्यात  नागाप्पा हट्टीहोळी (वय 38)  हा जागीच ठार झाला. तर रुद्राप्पा, ईराप्पा तसेच फिर्यादी मल्लाप्पा हट्टीहोळी यांच्यासह 6 जण गंभीर जखमी झाले.

नंदगड पोलिसांनी या घटनेचा तपास केला. बनोशी कुटुंबातील 13 आरोपींवर भादंवि 143, 147, 148, 323, 324, 302, 341, 447, 307, 504, 506 सहकलम 149 कलमाखाली खटला दाखल होता. खटल्यामध्ये 19 जणांच्या साक्षी नोंदविल्या होत्या. 64 कागदपत्रे व 44 मुद्देमाल सादर 
केले होते. 

सर्व 13 आरोपींवर गुन्हा शाबित झाल्याने प्रथम अतिरिक्‍त जिल्हासत्र न्यायाधीश महंमद गौस पाटील यांनी त्यांना जन्मठेपेची शिक्षा व 2 लाख 84 हजार 500 रु. चा दंड ठोठाविला.  दंडापैकी 2 लाख रुपये मयत नागप्पाची पत्नी रुक्मव्वा हिला व 25 हजार रुपये 5 जखमींना देण्याचा आदेशही न्यायाधीशांनी बजाविला आहे. उर्वरित रक्‍कम सरकारी जमा करण्याचा आदेशात नमूद करण्यात आले आहे. सरकारतर्फे अ‍ॅड. बी. एस. कुगण्णावर यांनी तक्रारदाराची बाजू मांडली.

घटनाक्रम दृष्टिक्षेपात

खानापूर तालुक्यातील मुगळीहाळ गावच्या हट्टीहोळी-बनोशी कुटुंबांमध्ये जमिनीवरून वाद
नागप्पा हट्टीहोळी हा शेतकरी युवक शेतात नांगरणी करत असताना 3 मे 2013 रोजी खून.
खुनासाठी कुर्‍हाडी, काठ्या, विळ्याचा वापर. 
हल्ल्यात आणखी 5 जण गंभीर जखमी; 13 जणांवर खून व हल्ल्याचा गुन्हा.
19 जणांच्या साक्षी, 64 कागदपत्रे, 44 मुद्देमाल न्यायालयासमोर सादर
तेराही जणांना जन्मठेप; 2 लाख 84 हजारांचा दंडही


  •