Wed, Apr 01, 2020 00:57होमपेज › Belgaon › ‘माध्यान्ह’ स्वयंपाक्यांना मिळणार पेन्शन

‘माध्यान्ह’ स्वयंपाक्यांना मिळणार पेन्शन

Published On: Sep 26 2019 2:21AM | Last Updated: Sep 25 2019 8:51PM
बेळगाव ः प्रतिनिधी

माध्यान्ह आहार योजनेंतर्गत शाळांमध्ये सेवेत असणार्‍या स्वयंपाकी आणि साहाय्यकांना निवृत्तीवेतन देण्यात येणार आहे. याबाबतचा आदेश कामगार खात्याने जारी केला आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेंतर्गत स्वयंपाक्यांना निवृत्तीवेतन मिळणार आहे.

पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये दुपारचे जेवण दिले जाते. अनेक ठिकाणी शाळांमध्येच स्वयंपाक केला जातो. त्याकरिता मुख्य स्वयंपाकी आणि साहाय्यक सेवेत आहेत. त्यांना मासिक मानधन दिले जाते. शाळांमधून योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून योजनेची लोकप्रियता वाढत आहे. याकरिता नियुक्‍त स्वयंपाक्यांना सेवा सुरक्षा म्हणून निवृत्तीवेतनाची सोय करण्यात आली आहे.
असंघटित कामगारांसाठी केंद्राने श्रमयोगी मानधन योजनेची घोषणा मागील अर्थसंकल्पात केली होती. विविध क्षेत्रातील कामगारांचा या योजनेत समावेश केला जात आहे. कर्नाटकातही योजना लागू होत असून स्वयंपाक्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. योजनेंतर्गत 60 वर्षांनंतर मासिक 3 हजार रुपये निवृत्तीवेतन मिळणार आहे. येत्या डिसेंबरपर्यंत सर्व स्वयंपाक्यांना याचा लाभ मिळण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याची सूचना शिक्षण खात्याचे आयुक्‍त डॉ. जे. जगदीश यांनी अधिकार्‍यांना दिली आहे.

शिक्षण खात्याकडून मासिक मानधनाच्या आधारावर शाळांमध्ये स्वयंपाक्यांची नियुक्‍ती करण्यात येते. त्यांना मिळणारे मानधन पुरेसे नाही. शिवाय सेवा सुरक्षा नसल्याने स्वयंपाक्यांसमोर अडचण निर्माण झाली होती. याविरोधात अनेकदा आंदोलने झाली. तहसीलदार, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री पंतप्रधानांना निवेदने देण्यात आली होती. कामगारांच्या लढ्याला यश मिळाले असून लवकरच निवृत्तीवेतनाचा लाभ स्वयंपाक्यांना मिळणार आहे.